संसर्ग, साथींवर पावसाळ्याचा काय परिणाम होतो? “उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे कोरोना संसर्ग कमी होईल, असे बोलले जात होते; पण तसे काही झाले नाही व साथ उन्हाळ्यात वाढलीच. आता अनेकांच्या मनात प्रश्न आहे की,पावसाळ्याचा कोरोनावर काही परिणाम होतो का? कुठल्याही विषाणूच्या प्रसारावर सहसा तीन गोष्टींचा परिणाम असतो. हवामानातील बदल, मानवाचे वर्तन तसेच आणि विषाणूमध्ये होणारे जनुकीय बदल व संक्रमण.आयआयटी मुंबईमधील एका प्रयोगात दिसून आले की, पावसाळ्यातील दमट हवामान कोरोनासाठी पोषक असून संसर्ग वाढवणारे ठरू शकते.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
संसर्ग, साथींवर पावसाळ्याचा काय परिणाम होतो? हे ठामपणे सांगण्यास व सिद्ध करण्यास हा एक अभ्यास पुरेसा नाही. यासाठी एक ते दोन वर्षे कोरोना विषाणू संक्रमित होतो का व त्यांनतर प्रत्येक ऋतूमध्ये त्याचे वर्तन कसे असेल या अभ्यासानंतरच हे ठामपणे सांगता येईल. पण सर्दी-खोकला, आरएसव्ही हे सर्व विषाणू पावसाळ्यात जास्त प्रमाणात पसरतात. हे गृहीत धरून पावसाळ्यात जास्त सतर्क राहण्याची गरज नक्कीच आहे. पावसाळ्यामध्ये मानव वर्तणुकीवर असे काही परिणाम होतात, ज्यामुळे संसर्गसाखळी तोडण्यास मदतही होऊ शकते. ते म्हणजे इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात लोक जास्त घरात राहतात. बाहेर पडत नाहीत. यामुळे गर्दीचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे इतरांशी कमी संपर्क येऊन संसर्गाचे प्रमाण कमी होण्याचा फायदा होऊ शकतो.पावसाळ्यातील एक गोष्ट मात्र कोरोनाची गुंतागुंत वाढवते. पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस हे आजारही वाढतात. त्यामुळे तापाचे रुग्ण पावसाळ्यात जास्त असतात. या इतर आजारांच्या वाढलेल्या प्रमाणामुळे तापाचा रुग्ण कोरोनाचा की इतर आजारांचा, हे निदान करताना गोंधळ उडतो. म्हणून या काळात आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून, छतावर किंवा घराभोवती पाणी तुंबू न देता डासांना अटकाव करायला हवा. म्हणजे इतर आजार कमी होतील. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी होईल.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.