औषध खरेदी तरी किमान भ्रष्टाचारमुक्त करा! -ते शक्य आहे!

At least make the purchase of medicines corruption-free! -That's possible!

दै.लोकमत

औषध खरेदी तरी किमान भ्रष्टाचारमुक्त करा! -ते शक्य आहे!

-डॉ. अमोल अन्नदाते

औषध खरेदीचे ‘तामिळनाडू प्रारूप महाराष्ट्रात यावे यासाठी राज्याने प्रयत्न केल्यास या प्रक्रियेला किमान शिस्त लागेल आणि गोरगरिबांचे औषधांविना तडफडणे थांबेल !

अलीकडेच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी शासकीय रुग्णालयात रांगेत कॅल्शियमची गोळी मागितली व त्यांना ती मिळाली नाही. २०१६ साली राज्याच्या तत्कालीन आरोग्य मंत्र्यांनीच २९७ कोटींचा औषध खरेदी घोटाळा झाल्याचे विधिमंडळात मान्य केले होते. गेली कित्येक वर्षे औषध खरेदी हे भ्रष्टाचाराचे कुरण आहे हे सत्ता वर्तुळातील उघड गुपित आहे.

१९८५ साली जे. जे. रुग्णालयात सदोष ग्लिसरीनच्या वापरामुळे रुणांचे डोळे गेले तेव्हा प्रथमच निकृष्ट औषधाच्या भ्रष्ट खरेदीचा प्रकार चव्हाट्यावर आला. त्यानंतर पारदर्शक औषध खरेदी प्रक्रियेसाठी जस्टीस लिन्टन आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाच्या शिफारशी कधीच बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्या. आता तर तो अहवाल रद्दीतही गेला असेल.

२००० पासून देशात सर्वात पारदर्शक व परिपूर्ण समजले जाणारे औषध खरेदीचे तामिळनाडू प्रारूप नावारूपाला आले. आजवर अनेक आरोग्यमंत्री व त्यांच्या शिष्टमंडळांनी या प्रारूपाचा अभ्यास करण्यासाठी तामिळनाडू दौरे केले; पण तशा प्रकारची पारदर्शक व गरजेनुसार औषध खरेदीची कायमस्वरूपी यंत्रणा राज्याला उभी करता आलेली नाही. ९० च्या दशकात मोठा औषध खरेदी घोटाळा उघडकीस आल्यावर १९९४ साली निग्रहाने तामिळनाडू वैद्यकीय सेवा कॉर्पोरेशन या स्वायत्त आयोगाची औषध खरेदीसाठी स्थापना केली. कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाविना हा आयोग स्वायत्त राहील याची राज्यकर्त्यांनी काळजी घेतली.

जिल्हावार, विभागवार औषधांची गरज वेगळी असू शकते. त्यासाठी तामिळनाडूमध्ये प्रत्येक आरोग्य केंद्राला एक पासबुक दिलेले असते. त्या पासबुकमध्ये कुठल्या औषधांची गरज आहे याच्या नोंदी वैद्यकीय अधिकारी परिचारिका ठेवतात व त्या एकत्रित करून औषध खरेदी आयोगाला कळवल्या जातात. १० टक्के खरेदी अशा प्रकारे केली जात असली तरी १० टक्के खर्चाचे व खरेदीचे अधिकार जिल्ह्याला दिले जातात. या विकेंद्रीकरणामुळे जिल्ह्याला आवश्यक असलेली खरेदी करता येते. मागच्या वर्षीच्या औषधांची गरज लक्षात घेऊन अर्थसंकल्पात तशी तरतूद करण्यात येते. त्यातून २६० अत्यावश्यक औषधांची खरेदी ई टेंडरिंगच्या माध्यमातून होते.

महाराष्ट्रात मागील काही वर्षांत बाजारात मिळणाऱ्या किमतीपेक्षा जास्त किमतीत औषधे खरेदी करण्याचे प्रकार घडले आहेत. तामिळनाडू औषध खरेदी आयोग फक्त खरेदीवरच थांबत नाही, तर कमीत प्रमाणात वाटपही होते. केरळने हे प्रारूप आणखी कार्यक्षम बनवले. केरळमध्ये औषध वापरले गेले की ते औषध साठ्याच्या सॉफ्टवेअरमधून लगेच वजा होते व नवीन मागणी त्वरित नोंदवता येते. तामिळनाडू औषध खरेदी आयोगात फक्त प्रशासकीय अधिकारीच नाहीत तर या व्यवस्थेची पारदर्शकता तपासण्यासाठी समाजातील अशासकीय ज्येष्ठ सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. किंमत व गरजच नव्हे, तर औषधांच्या दर्जावरही आयोग लक्ष ठेवून असते.

महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण, आरोग्य, आदिवासी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण अशी पाच खाती स्वतःची औषधे खरेदी करतात. पैकी आरोग्य खाते हे हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळाच्या माध्यमातून खरेदी करते; पण हाफकिनकडे एवढ्या मोठ्या प्रक्रियेसाठी पुरेसे मनुष्यबळ व माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा नाहीत. हाफकिनकडून होणाऱ्या औषध खरेदीत कुठलीही सुसूत्रता नसल्याने १२४४ कोटींची खरेदी होऊनही बऱ्याच आरोग्य केंद्रांवर आवश्यक औषधेही उपलब्ध नाहीत. आरोग्य विभागाकडून २७१२ कोटींचा औषध खरेदीचा प्रस्ताव असून हाफकिन व आरोग्य विभागात कुठली औषधे व कधीपर्यंत हवीत याविषयी समन्वय नाही.
कोट्यवधी रुपयांची औषधे खरेदी होऊनही जर ती तळागाळात पोहचत नसतील तर औषध खरेदी व्यवस्थाच नव्याने मांडण्याची गरज आहे. तामिळनाडू प्रारूपाचे आपल्याला साजेसे प्रतिरूप राबवायला हवे; पण यासाठी मोठी राजकीय इच्छाशक्ती हवी, ती कुठून येणार? किमान औषध खरेदी, एवढा एक तरी मुद्दा आपण भ्रष्टाचारमुक्त करू शकू का? याचा विचार राज्याच्या राज्यकर्त्यांनी जरूर करावा!

डॉ. अमोल अन्नदाते
dramolaanadate@gmail.com
www.amolannadate.com
Whatsapp:- 9421516551

महत्व ठाम पालकत्वाचं

The Importance of Strong Parenting

*दै. दिव्यमराठी* (मधुरिमा)

*महत्व ठाम पालकत्वाचं*

*-डॉ.अमोल अन्नदाते*

‘स्पेस’च्या नावाखाली पाल्यांना अति स्वातंत्र्य देणं जसं चुकीचं तसंच पाल्य बिघडेल म्हणून त्याच्यावर अवाजव बंधनं घालणंही चुकीचंच… नुकत्याच घडलेल्या हिंसाचाराच्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर, लोकशाहीवादी ठाम पालकत्वाची आवश्यकता प्रतिपादित करणारा लेख…

आपल्या मुलींच्या सुरक्षिततेच्या बाबतीत प्रत्येक पालकाच्या मनात धडकी भरवणाऱ्या श्रद्धा वालकरच्या हिंस्त्र हत्येची चर्चा हो या हत्येचा घटनाक्रम, त्यातील थरारकता, गुन्हेगारी मानसिकता,कौर्य या घटनेतील जातीचे संदर्भ या अंगाने होते आहे. पण याही पलीकडे ही घटना वर्णाच्या पतकत्वाशी व पालकत्वाच्या दीर्घर्कालीन प्रक्रियेशी निगडीत आहे हे समजून घेणे गरजेचे असते. पालकत्व म्हटले कि आपल्याला रांगणारे बाळ, शाळकरी मुलं किंवा कुमार वय समोर येते, पण पालकत्व, पाल्य व पालक दोहौंसाठी जन्मल्यापासून ते आयुष्यभर चालणारी ही प्रक्रिया आहे. मुलं वयात आल्यानंतरच्या पालकत्वावर तर पाल्याचे सगळे भवितव्य अवलंबून असते हा धडा श्रद्धा पालकर हत्येसारख्या घटनांतून प्रकर्षांने पुढे येतो.

जागतिकीकरणाच्या रेट्यात पालकत्वाविषयीच्या संकल्पना बदलणे अपरिहार्य होते. त्यातच लिबरल पेराटिंग म्हणजे उदारमतवादी पालकत्व असे पालकत्व जे जास्त पाल्य सहिष्णू, – पाल्यांच्या बाजूने झुकणारे, त्यांना अधिक मुक्तता, स्पेस देणारे असावे असे काहीसे पाश्चिमात्य मत प्रवाह समाजात, कुटुंबा कुटुंबात रुजू लागले. बापासमोर उभेही राहण्याची हिंमत नसणारी पिढी पालकाच्या भूमिकेत आली तेव्हा हे पचणे जड असले तरी व्यावसायिकदृष्ट्या ही पिढी आजच्या युगातील अत्यंत व्यस्त, महत्त्वाकांक्षी आणि काम करणारी जोडीदार ( वकिंग मदर ) असलेली आहे. म्हणून पाल्यांना स्पेस देणारे हे पाश्चिमात्य प्रारूप पालकांच्या पथ्यावर पडणारे व सोयीचे होते म्हणून ते पटकन स्वीकारलेही गेले. मुलांना वेळ देण्याची या पिढीची व्याख्या मुलांना अंघोळ घालणे, बापाने मुलीची वेणी घालणे अशी कधीच नव्हती म्हणून आई-बापाच्या रूपाने विरुद्ध लिंगी प्रेमाचा, वात्सल्याचा, मायेचा स्पर्श काय असतो या मानसिक स्पर्श ज्ञानाला ही पिढी पारखी राहिली. वेळ घालवण्याच्या गिल्टमधून परदेशी किंवा पर्यटन स्थळी जाणाऱ्या पालकांच्या पिढीमध्ये या स्पेसचा पुढचा टप्पा लिव्ह इनच्या रूपाने डोके वर काढू लागला. लिव्ह इन चूक कि बरोबर या नैतिक पेचात न पडता आपण पालकत्वाच्या आज आवश्यक असलेल्या बुद्धिप्रामाण्यवादी प्रारूप, पालक व पाल्य दोघांनाही स्वीकारु शकतील असा मध्यम मार्ग शोधणे व स्वीकारणे आवश्यक आहे. डेमोक्रेटिक पेराटिंग हा तो मध्यम मार्ग असू शकतो.

डेमोक्रेटिक अर्थात लोकशाहीवादी ठाम पालकत्व म्हणजे नेमके काय? लोकशाही असलेल्या देशात तुम्हाला जसे व्यक्तीस्वतंत्र्य असते पण तरी ते घटनेने आखून दिलेल्या कायद्याच्या चौकटीत असते. तसेच कुटुंबात असायला हवे. आम्ही डॉक्टर म्हणून पालकांना पाल्यावर विश्वास ठेवा असे जरुर सांगतो, पण आंधळा विश्वास ठेवा असे सांगत नाही. विश्वास ठेवताना डोळे उघडे ठेवा असेही सांगतो. स्वातंत्र्य देताना काही ठाम सीमा रेषा पाल्यांना आखून देणे हे पालक नाही तर कोण करणार? ज्या डोहामध्ये पोहताना अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत नेमके त्याच डोहात मुलाला पोहण्याची परवानगी कशी देणार? घरातील या सीमा ठरवताना काही गोष्टी वय वाढेल व मुलाची समज जोखून त्यात चर्चा करून थोडी फार शिथिलता आणता येऊ शकते, काही गोष्टींना मात्र झिरो टॉलरन्स हे पाल्यांना ठामपणे सांगणारे ठाम पालकत्व आवश्यक असते. त्यातच असुरक्षित जागा व असुरक्षित व्यक्तीपासून लांब ठेवण्याचा व्हेटो पालकांनी त्यांच्या हातात ठेवणे गरजेचे आहे.

पालकत्वाची निर्णायक भूमिका तेव्हा सुरु होते जेव्हा मुले एखाद्या नात्यात मानसिकदृष्ट्या अडकून पडतात. जन्मलेली प्रत्येक व्यक्ती ही मानसिक, भावनिकदृष्ट्या असुरक्षित (वलनरेबल) असतेच, पण हे भावनिक, मानसिक विरेचन तिथेच हवे जिथे शोषण होणार नाही. अशा सुरक्षित जागांचे, व्यक्तीचे ज्ञान हे कुटुंबातच द्यायला हवे. उपभोगापासूनच रोखण्यापेक्षा शोषण विरहित उपभोगाचे ज्ञान पाल्यांना देणे आवश्यक आहे. कुमारवयात एखादी भिन्न लिंगी व्यक्ती आवडण्याला कुमारवयीन मानसशास्त्रात काफ लव (calf love) असे म्हणतात. याची हाताळणी कशी करावी हे उपजत ज्ञान कुठल्याच पालकाला नसते. यासाठी प्रशिक्षित समुपदेशक व मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे असते. नुकतेच १६ व १७ वर्षांचे एक ओळखीचे प्रेमीयुगुल घर सोडून पळून गेले. परतल्यावर त्यांच्याशी रीतसर संवाद झाल्यावर मुलीने याचे कारण सांगितले की, ‘मला एक मुलगा आवडतो, हे घरी सांगण्याची हिंमत झाली नाही.’ तुम्हाला कोणाविषयी प्रेम वाटत असल्यास यात काही चूक नाही, पण ते तुम्ही आम्हाला आवर्जून सांगा, त्यातील महत्त्वाच्या गोष्टी समजून घेण्यास आम्ही तुम्हाला मदत करु हा आत्मविश्वास पालकांनी पाल्यांना द्यायला हवा. आपल्या व्यक्तिगत भावनिक गोष्टी घरात सांगण्यास पाल्यांना लाज किंवा भीती वाटता कामा नये हे पुढील धोके टाळण्यास आवश्यक आहे.

मुले मोठी झाली, मग ती लग्न किंवा इतर कुठल्याही नात्यात असतील व त्यांच्यावर हिंसाचार होत असल्याचे धोक्याच्या घंटा (रेड फ्लॅग) दिसत असतील तर कौटुंबिक पातळीवर मुलांच्या मागे उभे राहत त्याचा प्रतिकार करण्यासाठी सर्व बळ मुलांनाआयुष्यभर देणे गरजेचे आहे. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही भावनिक व शारीरिक हिंसाचार इतरांवर करणे किंवा इतरांचा सहन करणे आम्हाला मान्य नाही हे धडे कुटुंबात वारंवार गिरवणे गरजेचे आहे. आई-वडिलांच्या भीतीने किंवा त्यांचे मन जपण्यासाठी हिंसाचार सहन करत आयुष्य काढण्याची गरज नाही हा स्पष्ट संदेश पालकांकडून मुलांना गेला पाहिजे.


-डॉ. अमोल अन्नदाते
dramolaannadate@gmail.com
www.amolannadate.com
संपर्क :9421516551

रेमडेसिव्हिर गायब का होते?

रेमडेसिव्हिर गायब का होते

रेमडेसिव्हिर गायब का होते? रेमडेसिव्हिर हे औषध लाल फितीत अडकत चालले आहे. रुग्णांना ज्या पहिल्या नऊ दिवसांत किंवा डॉक्टरांचा निर्णय झाल्यावर त्वरित मिळणे अपेक्षित आहे, नेमके तेव्हा ते मिळत नाही. गैरव्यवस्थापन, काळा बाजार व प्रशासकीय खाक्यामुळे हे औषध देण्याचा सुवर्णकाळ हातून निसटतो आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण व नातेवाइकांना ज्या गोष्टींमुळे मानसिक-आर्थिक मनस्ताप झाला, त्यापैकी एक म्हणजे रेमडेसिव्हिरचा तुटवडा व काळाबाजार. ‘लवकरच रेमडेसिव्हिर मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल,’ हे सरकारने सांगूनही आता काही महिने झाले. रेमडेसिव्हिरच्या आधी दोन लाख ६९ हजार व नंतर चार लाख ३५ हजार कुप्या मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभारही मानले. एवढे होऊनही सरकारने ठरवून दिलेल्या किमान ९०० ते कमाल ३५०० रुपये या किमतीत ते किती रुग्णांना मिळाले? अनेकांना ते ‘काळ्या बाजारात’ २५ हजारांपासून ते एक लाखापर्यंत प्रती व्हायल इतक्या चढ्या दराने घ्यावे लागत आहे.

गरज असलेल्या रुग्णांपैकी केवळ पाच टक्के रुग्णांना रेमडेसिव्हिर मूळ किमतीत मिळते आहे, उर्वरित ९५ टक्के ग्राहकांना काळ्या बाजारात चढ्या दराने घ्यावे लागते आहे. तीन महिने उलटूनही सरकारला या औषधाची विक्री सुरळीत का करता आली नाही, काळ्या बाजाराची पाळेमुळे का खणून काढता आली नाही, या प्रश्नांच्या उत्तरातच दुसरा प्रश्न उपस्थित होतो, रेमडेसिव्हिर मिळणे दुरापास्त झाले, की मुद्दाम तसे केले गेले?

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

रेमडेसिव्हिर गायब का होते? रेमडेसिव्हिरच्या तुटवड्यावर सरकारने दोन तोडगे शोधले. पहिला, नेहमीप्रमाणे अन्न व औषध प्रशासन आयुक्तांची बदली. ‘गरज नसलेल्या रुग्णांना हे लिहून दिले जाते आहे,’ हे कारण सांगत सरकारने यावर अजब शक्कल लढवली. औषध कंपन्यांकडून मिळणारे सर्व रेमडेसिव्हिर हे अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतले. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून थेट रुग्णालयांना पुरवठा सुरू झाला. त्यानंतरही काळा बाजार थांबला नाही; कारण रुग्णालयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मागणी केलेली संख्या व त्यांना कार्यालयाकडून मिळणाऱ्या कुप्यांची संख्या यात मोठी तफावत असल्याने मागणी व पुरवठा यातील अंतर वाढले व काळा बाजार कायम राहिला. रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यात मागणी व पुरवठा असमतोल का निर्माण झाला, हे समजून घेणेही गरजेचे आहे. एकीकडे राज्य सरकार व टास्क फोर्सने ठरवून दिलेल्या उपचारांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मध्यम व तीव्र, म्हणजे ढोबळपणे ऑक्सिजनची पातळी ९४च्या खाली असल्यास रेमडेसिव्हिर सुरू करण्याचे निर्देश आहेत. याशिवाय ठरवून दिलेल्या पाच प्रमुख स्थितीतच रेमडेसिव्हिर वापरावे, असे निर्देशही डॉक्टरांना आहेत. सध्या राज्यातल्या सहा लाख ९८ हजार ३५४ रुग्णांपैकी २० ते ३० टक्के रुग्णांना प्राणवायू व मार्गदर्शक तत्त्वांनुसार रेमडेसिव्हिर देणे आवश्यक ठरते. सध्या गंभीर व मध्यम स्वरूपाचे रुग्णच रुग्णालयात दाखल आहेत. यातील बहुतेकांना रेमडेसिव्हिर देणे आवश्यक आहे; पण अन्न व औषध प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला, रुग्णालयात दाखल असलेल्या सक्रिय रुग्णांपैकी दहा टक्के रुग्णांसाठी प्रत्येकी एक व्हायल देण्याचा आदेश दिला आहे. बऱ्याचदा यापेक्षाही कमी व्हायल मिळतात. दाखल रुग्णांपैकी १० टक्के रुग्णांना रेमडेसिव्हिर हे सूत्र उपचारांच्या मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत तर नाहीच; पण सौम्य रुग्ण कोव्हिड केअर सेंटरला आणि मध्यम; तसेच गंभीर रुग्ण डेडिकेटेड कोव्हिड रुग्णालयात या आरोग्य खात्याने ठरवलेल्या धोरणाचा संपूर्ण विसर अन्न-औषध प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयांना पडलेला दिसतो.

आरोग्य खात्याने ठरवून दिलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हिर नाकारून, सरकारने त्याच्या काळ्या बाजाराला एक कारण मिळवून दिले. सध्या सौम्यच काय, मध्यम व गंभीर रुग्णांनाही कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यास जागा नाही. यावरून रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण रेमडेसिव्हिरची गरज असलेले की नसलेले, हा किमान सोपा अंदाज तरी सरकारने बांधावा. गरजेपेक्षा कमी रेमडेसिव्हिर मिळाल्यानंतर घडणारे प्रकार जास्त संतापजनक आहेत. ‘तुमच्या रुग्णासाठी आमच्याकडे रेमडेसिव्हिर नाही,’ असे रुग्णालयाने सांगितल्यावर, ज्यांच्या ओळखी आहेत ते आपले संपर्कजाळे वापरून जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळवतात, असे दिसून आले आहे. अशा प्रकारे कमी गरज असलेल्यांची नावे रेमडेसिव्हिर मिळालेल्यांच्या ‘गुणवत्ता यादीत’ कधी कधी झळकतात व तातडीची गरज असलेल्या रुग्णाचे नाव यादीत नसते. सर्व रेमडेसिव्हिर जर सरकारच्या व अन्न-औषध प्रशासनाच्या ताब्यात असेल, तर ते काळ्या बाजारात येते कुठून? गळती कुठे आहे, हे अनाकलनीय आहे. काळा बाजार करणाऱ्यांचे फोन नंबर, संपर्क खुलेआम उपलब्ध असणे, ५० टक्के रेमडेसिव्हिर काळ्या बाजारात विकले जात असूनही त्याचा कुठेही मोठा साठा जप्त न होणे, हे सगळे प्रकार कमालीचे संशयास्पद आहेत. ते मिळणे दुरापास्त झाले की केले गेले, हा प्रश्न विचारणे म्हणूनच भाग पडत आहे.

‘रेमडेसिव्हिरने मृत्यूदरात काहीही फरक पडत नाही, हे क्लिनिकल ट्रायल्समध्ये समोर आले आहे, तरीही डॉक्टर उगाच रेमडेसिव्हिर लिहून देतात,’ असा प्रचार हे एकच वैज्ञानिक अर्धसत्य वापरून केला जातो. रेमडेसिव्हिरच्या तुटवड्याबाबत, ते लिहून देणाऱ्या डॉक्टरांकडे बोट दाखवून पळ काढता येणार नाही. रेमडेसिव्हिर पूर्णपणे निरुपयोगी असते, तर ते सरकार व टास्क फोर्सच्या मार्गदर्शक तत्त्वांचा भाग राहिले नसते. या औषधाने अतिदक्षता विभागातील एक व वॉर्डमधील तीन दिवस कमी होतात, हे काहींबाबत सिद्ध झाले आहे. असा कमी झालेला प्रत्येक दिवस रुग्णाच्या मृत्यूची शक्यता कमी करतो. शिवाय, आज रुग्णशय्यांचा तीव्र तुटवडा असताना व रुग्ण प्राणवायूच्या प्रतीक्षेत रस्त्यावर प्राण सोडत असताना, रोज ६० हजार रुग्णांचे पाच दिवस कमी झाले, तर प्रतीक्षा रांगेतील हजारो रुग्णांना खाटा मिळतील आणि त्यांचे प्राण वाचतील. हा या औषधाचा व्यापक परिणाम आहे. रेमडेसिव्हिर हे रामबाण नसले, तरी गंभीर रुग्णांच्या उपचारातील महत्त्वाचा बाण जरूर आहे. हा उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा व्यावहारिक अनुभव दुर्लक्षून चालणार नाही. काही विशिष्ट रुग्णांना याचे चांगले परिणाम अनुभवास येत आहेत.

म्हणूनच सध्या कुठल्या रुग्णांना रेमडेसिव्हिर द्यायचे या विषयी, अन्न-औषध प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टरांवर विश्वास ठेवला पहिजे. हे औषध सरकारी खाक्याप्रमाणे लाल फितीत अडकत चालले आहे; त्यामुळे रुग्णांना ज्या पहिल्या नऊ दिवसांत किंवा हे औषध देण्याचा डॉक्टरांचा निर्णय झाल्यावर लवकरात लवकर मिळणे अपेक्षित आहे, नेमके तेव्हा मिळत नाही. रेमडेसिव्हिर उपलब्ध असूनही गैरव्यवस्थापन, काळा बाजार व प्रशासकीय खाक्यामुळे हे औषध देण्याचा सुरुवातीचा सुवर्णकाळ अनेकदा हातून निसटतो. शिवसेनेसारखा आक्रमक बाण्याचा, रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या असलेला व राष्ट्रवादी काँग्रेससारखा चाणाक्ष, प्रशासकीय खाचाखोचा माहिती असलेला पक्ष सत्तेत असूनही, एका साध्या औषधाचा काळा बाजार सरकार थोपवू शकत नाही, हे आश्चर्य आहे.

सदरील माहिती आपण महाराष्ट्र टाईम्स मध्येही वाचू शकता.

बावीस गेले, अजून किती?

बावीस गेले, अजून किती?

बावीस गेले, अजून किती ?

नाशिकमध्ये ऑक्सिजन लीक

२२ जीव गेले , द्या ना पाच लाख प्रत्येकी

प्रेतं जाळायला सरपण कमी पडू देणार नाही

किंबहुना प्रेतांना सरपण मिळायलाच हवं, मिळेलच , का मिळू नये ?

ऑक्सिजन पाहिजे ? लष्कराचं विमान येईल ना

ऑक्सिजन प्लांट लावा , ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घ्या म्हणताय ?

घेऊ ना लवकरच,

आधी कॅबिनेट बैठक संपू द्या

मग अधिकाऱ्यांची मीटिंग ,

मग टेंडर ,

मग खरेदी

तो पर्यंत किती बरे झाले?

ते पण एकदा बघा ना

रेमडीसिवीर?

अरे आहे ना

काळ्या बाजारात मिळतंय की हवं तेवढं

बेड मिळत नाही?

मग लॉकडाऊन लावू या ना

पंढरपूर निवडणुकीची सभा तर संपू द्या

बेडसाठी कडक निर्बंध लावू ना

आयसीयू बेड वाढवायचे ?

कशासाठी ? अरे हा मर्दांचा महाराष्ट्र आहे …

डॉक्टरांच्या रिक्त जागा भरायच्या ?

स्मशानजोग्यांच्या ही भरुया …

किंबहुना भरायलाच हव्या

बोलूया ना फेसबुक लाइव्ह मध्ये

अॅम्बुलन्सची कमतरता

तोच अभ्यास करायला तर आमदारांना मोफत लॅपटॉप दिले

भूमिपूजन , झालं ना … पुतळा तर कधीच झाला ..

कोरोना मृतांचं स्मारक त्याहून मोठं करू

ऑक्सिजन अभावी गेलेल्यांना त्यात विशेष जागा देऊ

निवडणूक या मुद्द्यावर होईल असं वाटत नाही

बराच वेळ आहे अजून

तोपर्यंत घडेल काही तरी मुद्द्यांचं , तेव्हा ठरवू काही करायचं का …

नाशिक ऑक्सिजन मृतांच्या

जाती बघायच्या राहिल्या

पत्रकार परिषदेत तोच मुद्दा उचला

पॉलिटिकल नॅरेटिव्ह एवढ्या वर्षात कसा कळत नाही तुम्हाला

अहो हा शाहू, फुले, आंबेडकर , शिवरायांचा महाराष्ट्र आहे

ऑक्सिजन , बेड , रेमडीसीवीर येईल कि दुसऱ्या राज्यातून

“लवकरच”

तोपर्यंत तीन नियम विसरू नका

निर्लज्जपणाचा मास्क लावा , जमेल तस दुसर्या लाटेत वारंवार हात धुवून घ्या, समाज,

समस्या आणि उपायांपासून सामाजिक अंतर पाळा

बाकी चालू द्या…

ए स्कोर काय झाला रे?

आज आयपीएलच्या दोन मॅच आहेत ना??

डॉ अमोल अन्नदाते

आधी आरोग्यमंदिरे उभारा

आधी आरोग्य मंदिरे उभारा

आधी आरोग्यमंदिरे उभारा सध्या उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्या विषयी सर्वत्र चर्चा सुरु आहे. कुठल्या पक्षाचा राजकीय अजेंडा काय असावा हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. पण सध्या शिवसेनेकडे असलेले आरोग्य खाते , गेल्या काही वर्षात दुर्लक्षित असलेले महाराष्ट्राचे आरोग्य क्षेत्र हे सगळे पाहता शिवसेनेकडे इतर सर्व खाती बाजूला ठेवली तरी केवळ या एका खात्यामध्ये काम करण्यासाठी सर्वाधिक वाव आहे असे शिवसेनेला आणी पक्षश्रेष्ठींनी का वाटू नये याचे आश्चर्य वाटते. धार्मिक , भावनिक, मराठी अस्मिता इत्यादी मुद्द्यांच्या तुलनेत आरोग्याच्या प्रश्नांवर कधीच राजकारण होत नाही आणी राजकीय पटलावर कधीच आरोग्याचे प्रश्न प्राधान्याचे ठरत नाहीत. याचा दोष याची मागणी न करणाऱ्या जनतेमध्ये आहे कि पक्षाची धोरण – दिशा ठरवणार्या ‘ हाय कमांड’ मध्ये कि यावर सतत आवाज उठवणारी माध्यमे , आरोग्य अभ्यासक वा अॅक्टीविस्ट कमी पडतात याचे निदान करायला हवे. महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्राच्या फाटलेल्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत राम मंदिराचा लढा देण्यास निघालेल्या उद्धव ठाकरे यांना आवर्जून सांगेवेसे वाटते कि अयोध्येत राम मंदिर उभारा किव्हा नका उभारू पण त्या आधी काही प्राथमिक आरोग्य केंद्रांना , उप जिल्हा रुग्णालयांना , शासकीय रुग्णालयांना जरूर भेटी द्या . देव महत्वाचा आहेच पण हाल अपेष्टा सहन करणारा रुग्णही तितकाच महत्वाचा आहे.
महाराष्ट्रात १८१६ प्राथमिक आरोग्य केंद्रे , ४०० हून अधिक ग्रामीण रुग्णालये , ७६ उपजिल्हा रुग्णालये व २३ सिविल हॉस्पिटल्स अशी अवाढव्य पायाभूत सुविधा आहे. एवढे मोठे यंत्रणेचे जाळे हे गृह विभाग सोडले तर इतर कुठल्याही विभागाकडे नाही. पण या सुविधा गैर व्यवस्थापन , अत्यंत दुर्लक्षित मानव संसाधन व्यवस्थापन , डॉक्टर, नर्स अश्या बौद्धिक संपदेचा तुटवडा आणी आरोग्य क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलायचाच आहे या इच्छाशक्ती अभावी केवळ निरुपयोगी इमारती मध्ये रुपांतरीत झाल्या आहेत. याचे सगळ्यात म्हत्वाचे कारण म्हणजे धोरण लकवा आणी कुठलेही निश्चित वेळेचे बंधन असलेले ध्येय नसणे . कुठल्या दिशेने कसे जायचे आहे याचे काही धोरण ध्येय नसल्याने तात्कालिक दिखाऊ योजनांचे साजरिकरण एवढेच काय ते आरोग्य विभागात होते आहे. आज आरोग्य क्षेत्रात जी काही पाऊले उचलली जात आहेत ती केवळ एखाद्या मोठ्या घटनेला आणी माध्यमात गवगवा झालेल्या समस्येला तात्पुरत्या मलमपट्टया व त्याही ही दिखाऊ अंगविलेपन स्वरुपाच्या प्रतिक्रिया आहेत . उदाहरणार्थ नाशिक ला अधिक बालमृत्यू झाले कि त्या रूग्णालया पूर्ती खरेदी किव्हा पदे भरणे . राज्यातील प्राधान्याने लक्ष देण्याच्या पहिल्या दहा समस्या कुठल्या . त्यातही उपचारार्थ आणी प्रतिबंधनात्मक असे वर्गीकरण केलेली प्राधान्य कुठली. याचे सविस्तर रूट कॉज अॅनॅलीसीस करून दूरागामी प्रभाव टाकू शकतील अशा उपाययोजना व त्यांची तळा गळा पर्यंत अमलबजावणी अशी विचार प्रणाली एकाही आरोग्य समस्ये बद्दल दिसून येत नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

आधी आरोग्यमंदिरे उभारा आज आरोग्य विभागातील डॉक्टरांसह १५,२९४ पदे रिक्त आहेत . ही पदे भरली गेली तरी त्यातून फार काही निष्पन्न होईल असे वाटत नाही. याचे कारण त्यांच्यावर वचक ठेवणारी सगळी यंत्रणा दिशाहीन व काही प्रमाणात भ्रष्ट आहे. आज शासकीय आरोग्य व्यवस्थेत बौद्धिक संपदेचा तुटवडा आहे हे मान्य पण दुसरीकडे खाजगी क्षेत्रात मात्र डॉक्टरांचे प्रमाण वाढत चालले आहे. चांगले डॉक्टर , परिचारिका शासकीय सेवेकडे का आकर्षित होत नाहीत याचे कारणही आपण शोधू शकलो नाही. ग्रामीण भागात डॉक्टर यायला तयार नाही, एवढ्या निष्कर्षावर आम्ही हातावर हात ठेऊन बसू शकत नाही. आज अरब देश , ऑस्ट्रलिया , न्यूझीलँड येथील अति दुर्गम भागातील आरोग्य सेवा ही भारतीय डॉक्टर उत्तम रित्या चालवत आहेत . विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील बहुसंख्य डॉक्टर आहेत . व्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव असून ही मंडळी इथे काम करत आहेत पण स्वतःच्या राज्यात त्यांना काम करण्याची इच्छा होत नाही. याचे कारण आहे सेवेचा योग्य आर्थिक आणी त्याहून महत्वाचा मानसिक मोबदला न मिळणे . कामाचे वातावरण , निश्चित असलेले कामाचे तास , आपल्या वर काम करत असलेली नियोजन व सुसूत्रता असलेली भ्रष्टाचार विरहीत यंत्रणा या सगळ्या गोष्टी डॉक्टर, परिचारिकांना दुसरीकडे आकर्षित करतात . परदेश सोडाच पण ग्रामीण भागात चालत असलेली खाजगी रुग्णालयांना किव्हा समुद्रावर खाजगी तेल रिफायनरीज लाही डॉक्टर मिळतात पण शासकीय सेवेत मिळत नाहीत . याचे मूळ कारण शासकीय आरोग्य यंत्रणेत मोठा क्रायसिस ऑफ ओनरशिप म्हणजे मालकी हक्काचा पेच आहे. आज शासकीय आरोग्य यंत्रणेत स्वच्छता कर्मचाऱ्यांपासून वर पर्यंत काम करणारी यंत्रणा कोणाला ही उत्तरदायी नाही. त्यांच्या कामाचे कुठलेही ऑडीट नाही. डॉक्टरने ठरवले तरी तो शासकीय यंत्रणेत रुग्णांवर नीट उपचार करू शकत नाही. कारण मोठ्या तर सोडाच साध्या तापाच्या औषधांचा शासकीय रुग्णालयांमध्ये तुटवडा आहे. एका गंभीर रुग्णावर उपचार करता येतील अशी सामग्रीची व्यवस्था नाही. निधीचा तुटवडा आहे हे मान्य पण जो आहे त्या निधीचा विनियोग कसा व्हावा याचा ही साधा विचार नाही. खरेतर निधी तुटवडा तिढा ही सुटू शकतो. एकतर अपव्यय होणारा खर्च वाचवून आणी वैद्यकीय मेडिकल व पॅरामेडीकल शिक्षणातून . इतर अनेक मार्गातून शासकीय आरोग्य व्यवस्था स्वतःचा निधी उभारू शकते . शिवाय कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाचा निधी आहेच.

महात्मा फुले जन आरोग्य योजना हे शासकीय आरोग्य यंत्रणेचा त्यातच चांगला आणी यशस्वी भाग असला तरी ती विमा योजना आहे. फक्त गंभीर आजारांचे उपचार करणारी विमा योजना ही यशस्वी असली तरी पुरेशी नाही.इतर नवीन योजना उपलब्ध निधीचा कुठला ही पुढचा मागचा दूरागामी विचार न करता आखल्या जात आहेत. उदाहरणार्थ बाईक अम्ब्युलन्स सेवा फक्त मुंबईच्या काही भागा पुरत्या सुरु केल्या . त्यातही फक्त १० बाईक अम्ब्युलन्स या मुंबईच्या १.५ कोटी लोकसंख्येला कशा पुरणार. त्या गल्ली बोळात जाऊन प्राथमिक उपचारा पुरत्या ठीक आहेत. असेच हवाई अॅम्ब्युलन्स चा शासनाचा मानस आहे. निधीचा तुटवडा असताना प्राथमिक आरोग्य सुधारायचे सोडून हेलीकॅपटर , त्या साठी लागणारे इंधन , स्टाफ ही यंत्रणा शासने कडे आहे का. बरे या एअर अॅम्ब्युलन्स मधून जमिनीवर रुग्ण न्यायचे कुठे. तशी रुग्णालये आपल्या कडे आहेत का ? सायकल अॅम्ब्युलन्स हा तर यातील कळस आहे. पूर्ण मोडकळीला आलेल्या आरोग्य सेवेला शेवटच्या घटकेला अशा सायकल अॅम्ब्युलन्स तारू शकणार नाहीत व इतर प्राधान्य सोडून त्यावरील खर्च तिजोरीत खडखडाट असताना परवडणारा नाही. टेली कन्सल्टेशनचा गाजावाजा करत लावलेले मोठे युनिट्स आज शासकीय रुग्णालयांमध्ये तसेच पडून आहेत.
आधी आरोग्य मंदिरे उभारा आज परदेशातील यशस्वी शासकीय आरोग्य सेवांचा अभ्यास केल्यास लक्षात येईल की तिथे प्रतीबांधावर मोठ्या प्रमाणात खर्च व तळागाळात काम होते. त्याचे मोजता येतील असे आरोग्यावर होणारे परिणाम दिसून येतात व ते टार्गेट आधीच ठरवले जातात. लसीकरण तक्त्या सारख्या साध्या गोष्टींचे पाच वर्षांपूर्वी आलेल्या बदलांचे शासकीय यंत्रणेला सोयरसुतक नसते. गेल्या दशकात वाढत्या लोकसंख्ये बरोबर आजार , त्यांच्यासाठीचे उपचार, त्यावर होणारे संशोधन हे वेगाने वाढले आहे. खाजगी डॉक्टरला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या बाबत सतत जागरूक रहावे लागते . पण या उन्नतीकरणाशी शासकीय आरोग्य यंत्रणेला काही देणेघेणे नसते. शासकीय रुग्णालयाचे प्रिस्क्रिप्शन कधी काळी लिहिले असेल असे असते . राज्यामध्ये हँन्ड फुट माउथ डिसीज , रीकेटशीयल फिवर या साथी सुरु आहेत. पण हे शब्द ही शासकीय आरोग्य यंत्रणेच्या गावी नाहीत.
वाय. एस राजशेखर रेड्डी या आंध्रप्रदेशच्या दिवंगत मुख्यमंत्र्यांनी केवळ चांगल्या आरोग्य सुविधा देऊन अनेक वर्षे लोकांच्या मनावर राज्य केले . त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यावर दुखावेगात आत्महत्या केलेले अकरा जन हे त्यांच्या आरोग्य योजनांचे लाभार्थी होते. महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात काम करायला एवढा वाव आहे कि इथला आरोग्य मंत्री नोबेल चा मानकरी ठरू शकतो .आरोग्यात क्रांती घडवून आणणाऱ्याला लोक स्वतःहून भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांना डोक्यावर घेतील . जो आरोग्य देईल त्याचेच सरकार अशी लोकांनी तरी भूमिका घ्यावी. बाळासाहेबांची लोकांच्या मनावर राज्य करण्याची आपली वेगळी तऱ्हा आणी शैली होती व तो काळ ही वेगळा होता .इतर कुठल्या मंदिरांपेक्षा मोडकळीला आलेली आरोग्य मंदिरे बांधून उद्धव ठाकरे यांनानव्या युगाचे महाराष्ट्राचे ह्र्दयसम्राट होता येईल.

सदरील माहिती आपण लोकसत्ता मध्येही वाचू शकता

क्रिकेट बॉल, नोटा व पान उलटताना थुंकीचा वापर नको

क्रिकेट बॉल, नोटा व पान उलटताना थुंकीचा वापर नको

” क्रिकेट बॉल, नोटा व पान उलटताना थुंकीचा वापर नको अनेक वर्षांच्या सवयीप्रमाणे अनेक कारणांसाठी थुंकीचा वापर करण्याची आपल्याला सवय लागली आहे. पण कोरोनानंतर आता ही सवय बदलावी लागणार आहे. याचे कारण थुंकीतून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो आणि ज्या गोष्टीसाठी थुंकी वापरली ती कोरोना पसरवण्यासाठी वाहक ठरू शकते. पुढील गोष्टी करताना थुंकीचा वापर थांबवा.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • क्रिकेट बॉल, नोटा व पान उलटताना थुंकीचा वापर नको क्रिकेट खेळताना सुरुवातीच्या ओव्हर्स संपल्यावर चेंडू प्रभावी पणे रिवर्स स्विंग व्हावा म्हणून खेळाडू चेंडू चमकवण्यासाठी घाम किंवा थुंकीचा वापर करतात. यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो म्हणून आयसीसीने चेंडू चमकवण्यासाठी थुंकी किंवा घामाचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. या ऐवजी ओव्हर संपल्यावर अम्पायर समोर चेंडू चमकवन्यासाठी कृत्रिम पदार्थ उपलब्ध करून देण्याची तयारी आयसीसीने केली आहे. त्यामुळे खेळाडूंनी असा  थुंकी व घामाचा वापर चेंडू चमकावण्यासाठी बंद करावे. अंतरराष्ट्रीयच नव्हे तर स्थानिक व गल्लीत मुले खेळत असलेल्या क्रिकेट मध्येही हा नियम पाळला जावा. अंतरराष्ट्रीयच क्रिकेट मध्ये मोठ्या खेळाडूंनी हे करणे थांबवले की इतर ठिकाणी हे अपोआप थांबेल. कारण बऱ्याचदा छोट्या प्रमाणावर खेळताना असे नक्कल म्हणून केले जाते.
  • बँके मध्ये किंवा घरात नोटा मोजताना थुंकीचा वापर करू नका.
  • पाकिटे, पोस्ट स्टॅम्प, कोर्टातील फी स्टॅम्प चिटकवण्यासाठी थुंकीचा वापर नको. दिल्ली हायकोर्टाने कोर्टात थुंकीचा वापर न करण्या विषयी आदेश काढला आहे.
  • यासाठी बँकेत, कोर्टात, मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत, वाचनालये उघडल्यावर तिथे ही प्रत्येक टेबल समोर स्पंजचे तुकडे ओले करून ठेवायला हवे. हे स्पंज ओले करण्यासाठी पाण्याऐवजी  हँड सॅनीटायजर चा वापर करता येईल.  

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

जेष्ठांसाठी लसीकरण

जेष्ठांसाठी लसीकरण

जेष्ठांसाठी लसीकरण आपल्याला आजवर लहान मुलांसाठी लसीकरण माहित आहे. पण लसीकरण हे ज्येष्ठांसाठी ही असते याबद्दल कोणाला माहिती नसते. त्यातच कोरोना सारख्या साथीमध्ये या लसीकरणाला वेगळे महत्व आहे. पुढील लसी ६० वर्षा पुढील व ६० वर्षा खाली मधुमेह, किडनीचे आजार, कॅन्सरचे रुग्ण व  आधी कॅन्सरची औषधे घेतलेले ६० वर्षा खालील ज्येष्ठ आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन लसी घेऊ शकतात .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

या लसी पुढील प्रमाणे आहेत

  • दर वर्षी फ्लू म्हणजे सर्दी, खोकल्याची लस
  • न्यूमोकोकल लस – दोन प्रकारच्या, एकदाच – एक डोस
  • टायफॉईड – एक डोस
  • कावीळ बी – आधी घेतला नसल्यास तीन डोस – पहिला, त्यानंतर १ व सहा महिन्यांनी
  • कावीळ ए – २ डोस
  • टीटॅनस व डीपथीरीया- टीडी दर १० वर्षातून एकदा

या लसी घेण्याचे फायदे –

  • जेष्ठांसाठी लसीकरण वया मुळे कमी झालेल्या प्रतिकारशक्ती मुळे हे जंतुसंसर्ग टळतील
  • हे आजार कमी झाल्यामुळे कोरोना मुळे तणावाखाली असलेल्या आरोग्य व्यवस्थे वरचा ताण कमी होईल
  • कोरोना झाला तर न्युमोकोकल लसीमुळे त्यासोबत होणार्या बॅक्टेरियल जंतूसंसर्गाची शक्यता कमी होईल
  • कुठल्या ही आजारा नंतर प्रतिकारशक्ती कमी होते व आजार नंतर काही दिवस कोरोनाच नव्हे तर इतर सर्व व्हायरल आजारांची शक्यता वाढते. लसींमुळे आजार कमी झाल्या मुळे कोरोनच नव्हे तर इतर व्हायरल आजारांची जोखीम वाढवणारे घटक कमी होतील
  • आजारी रुग्णाला तपासताना व कोरोनाचे निदान करताना लस घेतली असल्याने ‘हे आजार नाही’ हा निष्कर्ष काढणे सोपे जाईल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

उगीचच मल्टी व्हिटामीनच्या गोळ्या घेऊ नका

उगीचच मल्टी व्हिटामीनच्या गोळ्या घेऊ नका

उगीचच मल्टी व्हिटामीनच्या गोळ्या घेऊ नका सध्या कोरोनाच्या भीती पोटी अनेक जन रोज मल्टी व्हिटामीनच्या गोळ्या घेत आहेत. औषध दुकानांवर या गोळ्यांचा खप प्रचंड वाढला आहे. व्हिटामीन  डी व शाकाहारी लोकांना व्हिटामीन   बी १२ , फोलिक अॅसिड सोडले तर इतर सर्व व्हिटामीन   हे मुबलक प्रमाणात फळे , भाज्या, खाद्य पदार्थांमध्ये असतात. त्यामुळे तुम्ही स्वस्थ असाल व तुमचा आहार चांगला असेल तर तुम्हाला मल्टीव्हिटामीनच्या गोळ्यांची गरज नाही. सध्या अशा मल्टी व्हिटामीन   गोळ्या जाहिराती ही वाढल्या आहेत. एक मोठा हिंदी चित्रपट स्टार जिंसिंग सह मल्टीव्हिटामीन च्या महागड्या  गोळीची जाहिरात करतो जी वारंवार दाखवली जाते आहे. काही जाहिरीतींमध्ये आता कोरोनाचे संदर्भ दिले जात आहेत. अशा जाहिरातींना कोणीही भुलू नये.बरेच जन व्हिटामीन   सीच्या गोळ्यांचे ही सेवन करत आहेत. तुम्ही रोज अर्धे  लिंबू पाण्यात पिळून घेतले तरी तुम्हाला पुरेसे व्हिटामीन सी मिळते. तसेच चांगला आहार असणार्यांच्या शरीरात व्हिटामीन सी चा साठा चांगला असतो म्हणून रोजच लिंबू पाण्यात घ्यायला हवे असाही काही नियम नाही. आपण आपल्या नियमित आहारात अधू मधून लिंबू पिळून घेतोच. तेवढे ही पुरेसे ठरेल. तसेच प्रोटीन सप्लीमेंट्स घेण्याची ही गरज नाही.

मल्टीविटामिन गोळ्या सल्ल्याशिवाय घेतल्याने विटामिन ए सारख्या काही विटामिन्सचा ओवर डोस ही होऊ शकतो. त्यामुळे इतर वेळीही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वितामिनच्या गोळ्या घ्याव्या. या शिवाय स्पिरुलीना , प्रतिकारशक्ती वाढवणारे हर्बल औषधे या ही कोरोना टाळण्यासाठी घेण्याची गरज नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

        उगीचच मल्टी व्हिटामीनच्या गोळ्या घेऊ नका व्हिटामीन डी मात्र सगळ्यांना घेण्याची गरज असते. हे  सोडून दुसरी घेण्याची गरज पडू शकते अशी गोष्ट म्हणजे लोह म्हणजे आयर्न. डॉक्टरांच्या परवानगीने फक्त पुढील काही जणांना काही सप्लीमेंट्सची गरज पडू शकते.  –

  • लहान मुले –आयर्न , कॅल्शियम
  • गरोदर माता – फोलिक अॅसिड , आयर्न , कॅल्शियम
  • गुटका , तंबाखू खाणारे – फोलिक अॅसिड
  • शाकाहारी – व्हिटामीन   बी १२
  • मद्यपान करणारे – फोलिक अॅसिड, व्हिटामीन   बी ६, ए , थायमिन
  • मधुमेह , किडनीचे आजार आणी कॅन्सर – यांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार

म्हणजेच आजार असले तरी सर्वच नव्हे तर प्रत्येक आजारा प्रमाणे नेमक्या स्प्लीमेंट्सची आवश्यकता असते. म्हणूनच नियमित आहार घेणार्यांनी कुठले ही स्प्लीमेंट्स घेण्याची गरज नाही. आजार असणार्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने नेमकी औषधे घ्यावी. 

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

फक्त गरम किंवा कोमट पाणी हे कोरोना वर उपचार नव्हे!

फक्त गरम किंवा कोमट पाणी हे कोरोना वर उपचार नव्हे!

फक्त गरम किंवा कोमट पाणी हे कोरोना वर उपचार नव्हे! नुकताच कोरोना सदृश लक्षणे व मधुमेह हा कोरोनाची शक्यता वाढवणारा घटक असलेल्या एका रुग्णाचा संपर्क झाला. शासनाच्या फिवर क्लिनिकला जाऊन तपासणीचा सल्ला देऊनही अशा वेळी फक्त शक्य तितके गरम पाणी प्या असा सल्ला वाचल्याने एवढेच करून मी ठीक होईल अशा या रुग्णाच्या हट्टामुळे जवळचे नातेवाईक ही वैतागले. कोमट / गरम पाण्यासह अनेक उपचारांबद्दल समाज माध्यमांवर सल्ले दिले जात आहेत. कुठल्या ही ताप, खोकला, सर्दीच्या रुग्णाने शासनाच्या जवळच्या फिवर क्लिनिक किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन दाखवावे. तसेच संशयित व कोरोना बाधित लक्षण विरहीत तसेच लक्षणांसह असलेल्या रुग्णाचे नेमके काय उपचार करायचे हे मार्गदर्शक तत्वांप्रमाणे अॅलोपॅथीचे उपचार ठरलेले आहेत . गरम पाणी, आयुर्वेद, होमिओपथी हे प्रतिबंधासाठी ठीक आहेत व त्यासाठी जरूर वापरावे  तसेच उपचार म्हणून ही सोबत घेण्यास हरकत नाही. आयुष चे काय उपचार अॅलोपॅथी सोबत घ्यायचे आहेत हे ठरवण्यासाठी शासनाने एक कृती गट ही स्थापन केला हे व तो लवकरच या विषयी निर्णय घेईल . पण हे इतर व आयुष  उपचार सुरु करायचे म्हणजे अॅलोपॅथीचे उपचार बंद करायचे असे नाही. तसेच डॉक्टरांच्या माहिती शिवाय समाजमाध्यमांवर सांगितले जाणारे घरगुती उपचार अॅलोपॅथीचे उपचार बंद करून घेऊ  नये. फक्त घरगुती उपचार  घेत घरी बसने  खूपच धोका दायक ठरू शकते .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

      फक्त गरम किंवा कोमट पाणी हे कोरोना वर उपचार नव्हे! हे सर्व कोरोनावर अॅलोपॅथी मध्ये उपचारच नाहीत या गैरसमजा पोटी होते आहे. उपचार नाहीत असे म्हणण्यापेक्षा हा व्हायरल आजार असल्याने इतर कुठल्याही व्हायरल आजरा प्रमाणे वेळेप्रमाणे आपोआप बरा होणारा आजार आहे. पण आजार बरा होत असताना शरीराला,  फुफ्फुस व इतर आजारांना  इजा होऊ नये म्हणून रुग्णाचे निरीक्षण आवश्यक असते. तसेच कोरोनावर उपचार ही आहेत व काहीं उपचारांवर संशोधन सुरु आहे . बरीच औषधे ही काही प्रमाणात विषाणूची संख्या कमी करतात व ती वापरली जात आहेत. तसेच संसर्गा नंतर शरीराला इजा होण्याची चिन्हे दिसत असली तर ती इजा कमी करणारी किंवा रोखणारी औषधे ही दिली जात आहेत. काही रुग्णांना केवळ ऑक्सिजन कमी पडते व तेवढे काही दिवस दिले तरी ते बरे होतात. म्हणूनच उपचार नाहीत या भ्रमात केवळ घरगुती उपाय करत कोणीही घरी थांबू नये.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य

कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य

कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी आपले नाक व तोंड हा मुख्य मार्ग आहे. जर आपले मौखिक आरोग्य चांगले असेल तर आपल्याला कोरोनाचा धोका कमी संभवू शकतो. त्यामुळे कोरोन साथीच्या काळात मौखिक आरोग्य चांगले ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील काही महत्वाच्या गोष्टी

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  1. कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य घरातील सर्व व्यक्तींचे टूथब्रशेस एकाच ठिकाणी ठेवले जातात परंतु कोरोनाच्या वातावरणात ब्रश प्रत्येकाचे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात यावे. रोज टूथब्रश बॉक्स किंवा प्लास्टिक बॅग ठेवावा लहान मुलांच्या ब्रश ची विशेष काळजी घेण्यात यावी.
  2. सर्व सदस्यांसाठी एकच टूथपेस्ट वापरली जाते, त्याऐवजी शक्य झाल्यास वेगवेगळ्या स्मॉल साइज टूथपेस्ट वापराव्यात.
  3. दात कोरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टूथ पिक्स पेपर मध्ये गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात टाकाव्यात,  बऱ्याचदा उघड्यावर टाकण्यात येतात.
  4. घरातील प्रत्येकासाठी डेंटल फ्लॉसच्या  वेगळ्या बॉक्सेस चा वापर करण्यात यावा व पेपरमध्ये गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात टाकावे.
  5. घरातील एखाद्या व्यक्तीला सर्दी-खोकला झाला असल्यास त्यांनी वेगळ्या  बेसिनचा वापर करावा. 
  6. जीभ स्वच्छ करण्याचे टंग क्लीनर , इंटर डेंटल ब्रश  वापरल्यावर गरम पाण्यात बुडवून ठेवावे व नंतर  बंद कंटेनरमध्ये  ठेवावे
  7. कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य दंततज्ञ डॉ. अनघा राजवाडे यांच्या वृद्धांनी काढता येणारी कवळी  रात्री झोपताना कवळी बॉक्समध्ये पाण्यात काढून ठेवताना रोज dentures cleaning tablet वापरावी ( इतर वेळी आठवड्यातून एकदा वापरली जाते ) कवळी स्वच्छ करण्यासाठीचा ब्रश  पण रोज वेगळ्या डब्यात ठेवावा. लहान मुलांनी काढलेल्या कवळीला हात लावू नये  याची काळजी घ्यावी.घरातील सर्वजण वापरत असलेल्या कॉमन बेसिन जवळ कवळी  ठेवू नये. स्वतंत्र कप्पा करावा.
  8. दंत तज्ञांकडे उगीचच जाऊ नये. जर तातडीचे उपचार गरजेचे असतील तरच जावे. फोन वर सल्ला घेऊन पुढे ढकलण्या सारखी प्रोसीजर असेल तर पुढे ढकलावी.
  9. रूट कॅनाल उपचार किव्हा इम्प्लांट टाकण्याची प्रोसिजर सुरु असेल  अश्या रुग्णांनी विशेष स्वच्छता ठेवावी, किडलेल्या दाता मध्ये अन्न अडकून राहू नये म्हणून प्रत्येक जेवणानंतर ब्रश करणे गरजेचे आहे
  10. सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे अनिवार्य आहे.
  11. सुजलेल्या हिरड्या व तापमानाची संवेदना वाढली असेल तर घरा बाहेर पडून मेडिकल वरचे  महागडे mouthwash, mouth rinse  वापरण्यापेक्षा मीठ + हळद यांचे कोमट मिश्रण वापरून खळखळून गुळण्या करणे आवश्यक आहे. कोरोना  संसर्ग रोखण्यासाठी साध्या पाण्याने  दिवसातून एकदाच नव्हे तर प्रत्येक जेवणानंतर चूळ व गुळण्या करणे आवश्यक आहे.
  12.  लहान मुलांना रात्रीच्या वेळी वापरायची काढता येतील अशी आपलायन्स  दिली जातात त्यांची विषय स्वच्छतेच्या दृष्टीने काळजी घ्यायला हवी.

    सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता