तापात येणारे झटके वयाच्या सहाव्या महिन्यापासून पाच वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींमध्ये १००.४ डिग्री फॅरनहाईटच्या पुढे ताप आल्यास मेंदूशी निगडित इतर जंतुसंसर्ग नसताना येणारे झटके, म्हणजे तापात येणारे झटके. जवळपास २ ते ५ % मुलामुलींना ६ वर्षांपर्यंत एकदा तरी तपात झटका येतो
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
तापातील झटक्यांचे प्रकार
साधे म्हणजे सिंपल आणि गुंतागुंतीचे म्हणजे कॉम्प्लेक्स असे दोन प्रकार असतात.
तापातील साधे झटके म्हणजे १५ मिनिटांपेक्षा कमी काळ चालणारे, पूर्ण शरीराला २४ तासांत एकदाच येणारे असतात.
गुंतागुंतीचे झटके १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालतात. ते शरीराच्या एका भागावर २४ तासांत वारंवार येतात.
हे प्रकार जाणून घेणे महत्वाचे का?
तापातील झटके हे साधे आहेत की गुंतागुंतीचे, यावर गुंतागुंतीचे प्रमाण व आयुष्यात पुढे सहाव्या वर्षानंतर झटक्यांचा त्रास म्हणजे अपस्मार (इपिलेप्सी) होईल का, हे ठरते. साध्या तापातल्या झटक्यांमध्ये पुढे इपिलेप्सीचा त्रास होण्याचे प्रमाण १% तर कॉम्प्लेक्समध्ये ६% असते. तसेच, साधे झटके ५ वर्षांपर्यंत आले तरी, त्याचा पुढील आयुष्यावर काही परिणाम होत नाही.
झटके परत येण्याची शक्यता किती ?
पहिल्यांदा झटके आल्यावर ३०% मुलांमध्ये आणि दुसऱ्यांदा आल्यावर ५०% मुलांमध्ये तापात परत झटके येण्याची शक्यता असते.
पुन्हा झटके येण्याची शक्यता वाढविणाऱ्या गोष्टी
वय एक वर्षापेक्षा कमी असणे.
झटके आले तेव्हा ताप १००.४ ते १०२.२ अंश असणे.
घरात झटक्यांचा वैद्यकीय इतिहास असणे.
कुठल्याही पालकाला लहानपणी तापात झटक्यांचा त्रास असणे.
मुलांमध्ये मुलींपेक्षा परत झटके येण्याचे प्रमाण जास्त.
६ वर्षानंतर उपचार घ्यावे लागण्याची शक्यता किती?
२ ते ७ % मुलांना ५ वर्षांनंतर नियमित झटक्यामुळे उपचार लागतात.
इपिलेप्सीचा त्रास होऊ शकतो. पण अभ्यास करण्याची क्षमता, वर्तणुक नॉर्मल राहते.
तापातील झटक्यांचा पुढील आयुष्यावर विशेष परिणाम होत नाही.
उपचार काय?
झटके आल्यावर बाळाला एका बाजूला, कुशीवर झोपवावे.
तोंडासमोर कांदा, चप्पल हुंगायला देणे, तोंडात चमचा टाकणे, हातबोटांचा वापर आदी गोष्टी पूर्णपणे टाळाव्यात.
फक्त जीभ दातांमध्ये येत असल्यास ती बोटाने दातातून बाजूला करावी.
डोके झटक्यामुळे हलत असल्यास इजा होऊ नये म्हणून डोक्याभोवती उशी ठेवावी.
त्वरित बालरोगतज्ज्ञांकडे न्यावे.
बालरोगतज्ज्ञ तापाची व त्वरित झटके थांबवणारी औषधे सलाईनद्वारे देऊन पुढील उपचार करतील.
प्रतिबंध कसा करावा? तापात येणारे झटके अशा मुलांना परत झटके येऊ शकतात. म्हणून आधी तापात झटके आलेल्या मुलांना ताप आल्यावर लगेच तापाचे औषध देऊन डॉक्टरांकडे जाण्याआधीच उपचार सुरू करावेत. यासाठी ‘पॅरॅसीटॅमॉल’ हे औषध १५ मिलीग्राम प्रती किलो या डोसप्रमाणे मुलाला द्यावे किंवा आपले तापाचे औषध मुलांना ताप आल्यास किती द्यावे, हे आपल्या डॉक्टरांना विचारून लिहून ठेवावे. त्याप्रमाणे द्यावे.
ताप आल्यावर यासोबतच पूर्ण अंग पुढून व मागून ओल्या कपड्याने पुसून घ्यावे. (डोक्यावर ओल्या कपड्याच्या पट्ट्या ठेवू नयेत. त्यामुळे ताप कमी होत नाही.)
यानंतर प्रत्येक वेळी ताप आल्यावर बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने ‘क्लोबाझाम’ हे औषध तीन दिवस द्यावे.
सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता