धार्मिक स्थळी जाताना जरा जपून!

धार्मिक स्थळी जाताना जरा जपून!

धार्मिक स्थळी जाताना जरा जपून! “लॉकडाऊन ५ मध्ये सर्वधर्मीय धार्मिक तीर्थस्थळ आणि प्रार्थनास्थळ खुली केली असली तरी काही निर्णय जनतेने स्वत: घ्यायला हवे. केंद्र सरकारने धार्मिक स्थळ व प्रार्थनास्थळ खुली करताना ६५ वर्षांवरील, १० वर्षांखालील, गर्भवती स्त्रिया, सर्व वयोगटात मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, कॅन्सर व असे मोठे आजार असलेल्यांनी धार्मिक स्थळी जाऊ नये असे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने एवढ्यांनाच सतर्क केले असले तरी लक्षणविरहीत (कुठले ही लक्षण नसलेले) कोरोनाबाधितांची संख्या पाहता आजार असो व नसो तसेच सर्वच वयोगटाच्या व्यक्तींनी धार्मिकस्थळी व प्रार्थनास्थळांना जाणे कोरोना संसर्गाची जोखीम वाढवणारा महत्त्वाचा घटक ठरू शकतो. कोरोनाच नव्हे इतर जंतुसंसर्ग पसरण्यासाठी गर्दीमुळे तीर्थस्थळे व धार्मिकस्थळे मोठे कारण ठरले आहे व कोरोनाच्या बाबतीतही हे खरे ठरू शकते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

राज्यात व देशात दरवर्षी गावोगावी भरणाऱ्या ग्रामदैवताच्या पूजेनिमित्त भरणाºया जत्रा या ही स्थानिक पातळीवर नागरिकांनी एकत्रित निर्णय घेऊन रद्द केलेल्या चांगल्या. अशा जत्रा झाल्या तरी सध्या तरी तिथे जाणे टाळावे. पुजारी किंवा त्या स्थळाची जबाबदारी असणाऱ्यांनी मास्क, फेस शिल्ड वापरावे व मुख्य देव्हारा व दर्शनच्या जागेत किमान ८ फूट अंतर ठेवावे. धार्मिक स्थळाची जबाबदारी असणाºयांना ताप, सर्दी, खोकला झाल्यास त्यांनी १४ ते २० दिवस मंदिरात इतरांच्या संपर्कात येऊ नये.
धार्मिक स्थळी जाताना जरा जपून!अशा ठिकाणी गर्दी खूप असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे शक्य नसे तरी हे नियम पाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा व दर्शन रांगेत ६ फुटांचे गोल आखून घ्यावे व त्यातच दर्शनासाठी आलेल्यांनी उभे राहावे. मंदिरात येताना प्रत्येकाला मास्क अनिवार्य असावा व त्याशिवाय कोणाला ही बाहेर सोडू नये. मंदिराबाहेर हात धुण्यासाठी बेसिन व लिक्विड सोप शक्यतो अ‍ॅटोमेटेड (आपोआप सोप हातावर पडेल असे सेन्सर असलेले) सोय असावी. तीर्थक्षेत्र यांच्याशी एक मोठे अर्थकारण निगडित असले व हा सगळ्यांच्याच भावनेचा प्रश्न असला तरी साथ रोखण्याच्या दृष्टीने वर्षभर तरी धार्मिक स्थळी न जाता घरच्या घरीच पूजा अर्चा केलेली योग्य ठरेल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोनाग्रस्त किंवा बरे झालेल्यांवर सामाजिक बहिष्कार नको

कोरोनाग्रस्त किंवा बरे झालेल्यांवर सामाजिक बहिष्कार नको

कोरोनाग्रस्त किंवा बरे झालेल्यांवर सामाजिक बहिष्कार नको सध्या मुंबईत व राज्यात इतरत्र ही कोरोनामधून बरे झालेले, संपर्क आलेल्यांना घरीच विलगीकरण (होम क्वारंटाइन) किंवा विलगीकरण (आयसोलेशन) सांगितले आहे. पण अशा अनेकांना राहत्या घराजवळ सोसायटीमध्ये सामाजिक बहिष्काराचे वाईट अनुभव आले. एकदा बऱ्या झालेल्या रुग्णांकडून किंवा विलगीकरणाचा कालावधी संपल्यावर इतरांना या व्यक्तीकडून संसर्गाचा कुठला ही धोका नसतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

फिजिकल डिस्टन्सिंग म्हणजे बहिष्कार नव्हे
कोरोनाग्रस्त किंवा बरे झालेल्यांवर सामाजिक बहिष्कार नको आपल्या सोसायटी किंवा निवासी जागेतील एखादा रुग्ण परत आल्यावर तो दिसला कि लगेच घाई घाईने लांब जाणे, त्याच्याशी न बोलणे, जाताना त्याच्याकडे न बघणे असे वर्तन करू नका. फिजिकल डिस्टन्सिंग जरूर ठेवावे. पण ते ठेवत असताना लांबून संवाद साधता येतो. तसेच अशा कुटुंबाला किंवा घरात एकट्याने विलगीकरणात असलेल्यांना काय हवे ते बाहेरून आणून देण्यासाठी मदत करा. तसेच त्यांच्याशी खिडकीतून, गॅलरीतून, फोनवरून बोलून त्यांना मानसिक आधार द्या.

रुग्णांबद्दल बोलताना, समाज माध्यमांवर व्यक्त होताना भान ठेवा
एखादा रुग्ण आपल्या भागात सापडला की त्याला रुग्णवाहिकेतून नेतानाचे फोटो टाकणे, त्याला नेत असताना पार्श्वसंगीत किंवा गाणी टाकून व्हिडीओ बनवून फोनवर शेअर करणे असे करू नये व हे वैद्यकीय नीतीमूल्यांच्या विरोधात आहे. रुग्णाचे नाव घेऊन त्याला उचलले, पकडले, धरून नेले असे शब्द वापरून रुग्णांबाबत चर्चा करू नये.

सहवेदना बाळगा
आपण स्वत: सोडून इतर सर्वांना कोरोना होण्याची शक्यता आहे, असे कोणीही वागू नये. ही महामारी असल्याने प्रत्येक नागरिकाला संसर्गाची समान जोखीम आहे. म्हणून प्रत्येक कोरोनाग्रस्तांसाठी सहवेदना म्हणजे त्याचा त्रास हा जणू आपला ही त्रास आहे, असे समजून वागले पाहिजे. साथीच्या या वातावरणात कोरोनाचा संसर्ग कोणाला ही होऊ शकतो. म्हणून चांगुलपणाची देवाणघेवाण ही गरजेचा आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

श्वास रोखून धरण्याची सवय

श्वास रोखून धरण्याची सवय

श्वास रोखून धरण्याची सवय पहिल्यांदा श्वास रोखून धरल्यावर मूल कितीही लहान असले तरी त्याला हे कळते, की असे केल्यावर पालक घाबरतात व नंतर हवे ते देतात. म्हणून याचा वापर मुलाकडून हवे ते मिळवण्यासाठीही होऊ लागतो. रडत असताना श्वास रोखून धरण्याची सवय ६ महिन्यांपासून ते १८ महिन्यांपर्यंतच्या मुलांना असते. सहसा हट्टी मुले आपल्या मनाप्रमाणे गोष्टी न झाल्यास, एखादे खेळणे किंवा गोष्ट हवी असल्यास सतत रडून असे करतात. याला वैद्यकीय भाषेत ‘ब्रेथ होल्डिंग स्पेल’ असे म्हणतात. 

कारणे 
श्वास रोखून धरण्याची सवय आपल्या शरीरात अंतर्गत अवयवांवर नियंत्रण ठेवणारे आणि मेंदूला ‘लढावे की पळावे’ हा निर्णय घेण्यास मदत करणरे एक नसांचे जाळे असते. याला ‘ऑटॉनॉमिक नर्व्हस सिस्टम’ असे म्हणतात. लहान मुलांमध्ये ही अजून विकसित झालेली नसल्याने त्यांना राग आल्यावर कसेवागावे, हे नीट कळत नाही. पालकांवर अधिक दबाव टाकण्यासाठी ते अजाणतेपणाने मोठे व लांब उसासे घेऊन रडू लागतात, पण असे करताना एखाद्या लांबलेल्या उसाशाने त्यांचा श्वास अडखळतो आणि तो तसाच रोखलेला राहतो. यामुळे मुलगा बेशुद्ध होऊन काळानिळा पडतो. यात मेंदूला काहीवेळ रक्तप्रवाह खंडित झाल्यामुळे झटके येऊ शकतात. तोंडातून फेस येऊ शकतो. या मानसिक कारणांसोबतच श्वास रोखून धरणाऱ्या मुलांमध्ये शरीरात लोहाची (आयर्न) कमतरता असते. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मुलांनी श्वास रोखण्याची कारणे 
सहसा असे करणारी मुले एकुलती एक किंवा दोन असल्यास इतरांपेक्षा अधिक लाडकी असतात. पहिल्यांदा श्वास रोखून धरल्यावर मूल कितीही लहान असले तरी त्याला हे कळते, की असे केल्यावर पालक घाबरतात व नंतर हवे ते देतात. म्हणून याचा वापर मुलाकडून हवे ते मिळवण्यासाठीही होऊ लागतो. 

उपचार 
पालकांनी घाबरून न जाता खंबीर राहणे तसेच श्वास रोखून धरण्याची सवय ही तात्पुरती आहे, हे ओळखणे सर्वांत महत्त्वाचे. याने मुलाच्या जीवाला कुठलाही धोका नाही, तसेच श्वास रोखून धरल्यावर झटके आल्यास पुढे आयुष्यात झटके येत नाहीत. हे पालकांनी समजून घेतले नाही, तर या सवयीमुळे घाबरलेल्या पालकांचे मुलांकडून मानसिक, भावनिक ब्लॅकमेलिंग निश्चित आहे. 

पालकांनी पुढील गोष्टी कराव्यात 
-आपण घाबरलो आहोत, हे मुलाला मुळीच जाणवू न देणे. 
– मुलाचे कपडे सैल करणे. 
– घरच्यांनी मुलाभोवती गर्दी करून गोंधळ करू नये. 
– मुलाला सरळ करावं, शांततेत त्याच्या चेहऱ्यावरून ओला हात फिरवावा. 
– पायावर टिचकी मारून हलवून श्वास पुन्हा चालू करावा. 
– एकदा श्वास सुरू झाला की, दुर्लक्ष करून आपले इतर काम सुरू करावे. 
– मूल हट्ट करून श्वास रोखण्याची शक्यता वाटली की, आधी मुलाचे लक्ष इतर ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न करा. ते शक्य झाले नाही तर दुर्लक्ष करा. फक्त श्वास रोखून धरण्यास सुरुवात होते आहे का, यावर आपले घरातील काम मुलाच्या नकळत सुरू ठेवा. 
– श्वास रोखून धरल्यामुळे मुलाचा हट्ट पूर्ण करू नका. 
– यासाठी टाइम आउट ही कृती सुचवतो. खेळाताना एखादा खेळाडू चुकीचा खेळला की, त्याला थोडा वेळ खेळू देत नाहीत. तसाच मुलांचा श्वास पूर्ववत झाला की लगेचच १ ते ५ मिनिटे त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावे. 

औषधोपचार – 
श्वास रोखून धरण्याची सवय लोहाचे (आयर्न) योग्य डोसामध्ये तीन ते सहा महिने द्यावे लागते. 
वाढविकास तज्ज्ञ डॉ. अंजली बँगलोर अशा पालकांना समुपदेशन करताना नेमके हे शब्द वापरतात – 
‘तुम्ही फार प्रेमळ पालक आहात आणि तुमचा मुलगा चतुर, हुशार आहे. त्याला घरात राजासारखे वागायचे आहे आणि तुम्हाला प्रजा बनवायचे आहे. तुम्ही आज्ञा पाळली नाही म्हणून मुलाने तुम्हाला दिलेली शिक्षा म्हणजे श्वास रोखून धरणे. तुम्हाला दुर्लक्ष करून घरात कोणीही राजा प्रजा नसून, सर्व सदस्य समान आहेत ही भावना प्रस्थापित करावी लागेल.’ 

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता

स्तनदा मातांसाठी कोरोनाच्या काळात स्तनपानाची मार्गदर्शक तत्वे

स्तनदा मातांसाठी कोरोनाच्या काळात स्तनपानाची मार्गदर्शक तत्वे

स्तनदा मातांसाठी कोरोनाच्या काळात स्तनपानाची मार्गदर्शक तत्वे कुठलीही लक्षणे नसलेल्या व कोरोना नसलेल्या आईने नियमित जसे आपण स्तनपान करतो तसे मास्क न घालता स्तनपान केले तरी चालेल. फक्त बाळाला हाताळताना आधी हात धुणे व मगच बाळाला जवळ घेणे. स्तनदा मातांना इतरां पासून सोशल डीसटन्सिंगचे नियम पाळावे.

आई कोरोना संशयित / कोरोना बाधित असल्यास व लक्षणविरहीत / सौम्य लक्षणे  असल्यास  –

  • बाळांतपण झाल्यावर आई आणि बाळाला एकत्र ठेवता येईल. तसेच लगेचच स्तनपान सुरु करता येईल.
  • तिने नेहमी करत्तात तसे स्तनपान सुरु ठेवावे . आईच्या दुधातून कोरोनाची बाधा होत नाही.
  • स्तनपान करताना आईने मास्क वापरावा . दोन वर्षा पर्यंतच्या मुलांना मात्र मास्क वापरू नये.
  • शक्यतो बाळ व आईचा एखाद्या मदतनीसा शिवाय इतरांशी संपर्क नको.
  • आईला मदत करणाऱ्या मदतनीसाने मास्क, ग्लोव्हज, मेडिकल गाऊन वापरावा व आईशी कमीतकमी संपर्क ठेवावा.
  • आईने दर सहा ते आठ तासांनी मास्क बदलावा.
  • आईला कोरोना असला तरी तिच्या दुधातून बाळाला संरक्षण देणाऱ्या अँटीबॉडीज जातात.
  • बाळाला दर वेळेला स्तनपाना साठी घेताना २० सेकंद तरी साबणाने हात धुवावे व हँड सॅनीटायजरचा वापर करावा.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

आई कोरोना बाधित असून तीव्र लक्षणे असल्यास

स्तनदा मातांसाठी कोरोनाच्या काळात स्तनपानाची मार्गदर्शक तत्वे आईला खोकल्याचा त्रास असल्यास ही ती मास्कचा वापर करून कोणाच्या तरी मदतीने स्तनपान चालू ठेवू शकते. पण अशा स्थितीत आईला स्तनपान चालू ठेवणे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे अशा वेळी परिस्थितीचा अंदाज घेऊन बालरोगतज्ञ, आई व नातेवाईकांनी चर्चा करून दोन पैकी एक निर्णय घ्यावा. पहिला पर्याय आईने वाटी मध्ये दुध काढून द्यावे व ते इतराने बाळाला वाटी चमचणे पाजावे किंवा आईला सोयीस्कर काय आहे व तिची स्थिती बघून पावडरचे दुध अपवादात्मक स्थितीत वापरता येईल. नवजातशिशु व लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला तरी तो सौम्य किंवा लक्षणविरहीत असतो. म्हणून त्यांना धोका नाही. तसेच त्यांच्या कडून इतरांना कोरोन संसर्ग होण्याचा धोका खूप कमी आहे पण यावर अजून संशोधन आवश्यक आहे.

वरील सर्व निर्देश हे जागतिक आरोग्य संघटनेने दिले असले तरी पाश्चिमात्य देशांमध्ये तसेच भारतातील काही नवजात शिशूतज्ञांच्या मते आई कोरोना बाधित असल्यास  स्तनपानाचा निर्णय हा पालकांशी चर्चा करून  मिळून घेतला जावा.

बऱ्याच देशांमध्ये जिथे कमीबाळंतपण होतात आणि सुविधा चांगल्या आहेत, तिथे बाळाला आईच्या संपर्कातून कोरोना होण्याची शक्यते बद्दल सांगितले जाते. जन्मा नंतर आई व बाळाची तपासणी केली जाते. २४ तासात आईचा रिपोर्ट पॉजिटिवअसल्यास आई पासून बाळाला वेगळे ठेवले जाते व  सोबतचे नातेवाईक किंवा रुग्णालयातील परिचारिका बाळाला आई पासून १४ दिवस वेगळे ठेऊन पावडरचे दुध पाजू शकते. बाळाचा रिपोर्ट पॉजिटिवअसल्यास बाळाला पाजणाऱ्यानी वयक्तिक सुरक्षेचे कवच वापरावे. चौदा दिवसा  नंतर बाळाला आई कडे दिले जाऊ शकते. नंतर स्तनपान सुरु करण्यासाठी आईला प्रेरित करावे. हे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेचे  नसले तरी अशा प्रकारे सर्व जोखीम सांगून पालक व डॉक्टरांनी चर्चा करून एकत्रित निर्णय घेतला जावा असे पाश्चिमात्य देशातील वैद्यकीय जर्नल सांगतात.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कारमध्ये हँन्ड सॅनिटायझर वापरणे सुरक्षित!

कारमध्ये हँन्ड सॅनिटायझर वापरणे सुरक्षित!

कारमध्ये हँन्ड सॅनिटायझर वापरणे सुरक्षित मध्यंतरी कार मध्ये हँड सॅनिटायझर  मुळे स्फोट झाल्याच्या बातम्या समाज माध्यमांवर प्रसारित झाल्या होत्या. यामुळे कार मध्ये हँड सॅनीटायजरच्या  वापरा संबंधी भीती पसरली. पण यात काही तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले आहे. हँड सॅनिटायझर  मध्ये अल्कोहोलच्या रूपाने ज्वलनशील पदार्थ असला तरी त्यामुळे कार पेट घेईल असा स्फोट होऊ शकत नाही. सध्या बाजारत उपलब्ध असलेले प्रमाणित हँड सॅनिटायझर  आपण वापरात असाल तर असा कुठला ही धोका नाही. हँड सॅनिटायझर  अग्नी जवळ किचन जवळ नेऊ नये हे खरे आहे. जर अग्नीचा स्पार्क हँड सॅनीटायजरच्या उघड्या बाटलीच्या संपर्कात आली तर पेट घेऊ शकते व हे ज्वलनशील असते पण हातावर सॅनिटायझर  घेऊन तुम्ही किचन मध्ये गेला तर तुमचे हात पेट घेतील हा ही गैर समज आहे. गाडीत हँड सॅनीटायजरने पेट घेण्यासाठी गाडीतील तापमान ६०० डिग्री फॅरनहाइट किंवा ३१५ डिग्री सेल्सियस इतके जास्त असायला हवे जे कधी ही शक्य नाही. गाडी मधील एअर फ्रेशनर, परफ्युम मध्ये ही अल्कोहोल असते . फक्त हँड सॅनिटायझर  गाडीत वापरताना काही काळजी जरूर घ्यावी  –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • हँड  सॅनिटायझर  आडवे ठेवू नये, उभे ठेवावे.
  • हँड  सॅनिटायझर  चा वापर झाल्यावर ते नीट बंद करावे.
  • हँड सॅनिटायझर  समोर बोनेट जवळ किंवा मागे डिक्की मध्ये गरम जागी ठेवू नका. शक्यतो सीटच्या मागे किंवा मागच्या सीट जर जिथे गाडी जास्त गरम होत नाही अशा ठिकाणी ठेवा.
  • शक्यतो गाडी मध्ये हँड सॅनीटायजरच्या १०० ते २०० एमएल च्या छोट्या बाटल्या ठेवा.

कारमध्ये हँन्ड सॅनिटायझर वापरणे सुरक्षित गाडी मध्ये हात धुणे शक्य नसल्याने व अवघड असल्याने गाडीत कामासाठी जाताना, उतरताना , काम झाल्यावर गाडीत बसताना हँड सॅनीटायजरचा वापर करावाच लागेल. म्हणून अशी गाडी पेट घेण्याची कुठलीही भीती न बाळगता गाडीत  हँड सॅनीटायजरचा वापर करा.   

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

अनावश्यक स्थलांतर टाळा

अनावश्यक स्थलांतर टाळा

अनावश्यक स्थलांतर टाळा अनेक वर्षांपासून गरज नसताना तालुक्यातून जिल्ह्याला, जिल्ह्यातून प्रमुख महानगरांना वैद्यकीय कारणांसाठी स्थलांतर सुरु आहे. यातले काही गरजेचे असले तरी बरचसे स्थानमहात्म्यामुळे असते. प्रत्येक गावात एक असा सधन वर्ग असतो जो आकर्षण व स्टेट्स सिम्बॉल म्हणून इतर शहरात जाऊन उपचार घेतो. यामुळे मग इतर ही परवडत नसलेले ही याची नक्कल करतात. पण अनावश्यक प्रवास म्हणजे कोरोनाची जोखीम. म्हणून आपला गावात जर त्याच डिग्रीचे डॉक्टर उपलब्ध असतील तर आधी तिथेच उपचार घेणे सध्या तरी साथीचा जोर असे पर्यंत हितावह असेल. बऱ्याचदा तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सुविधा अनेकांना माहित ही नसतात. म्हणून आपल्या गावात कुठल्या डिग्रीचे किती डॉक्टर आहेत. कुठले तज्ञ आहेत व कुठल्या डिग्रीचे डॉक्टर कशावर उपचार करतात हे मुलभूत ज्ञान व माहिती मिळवावी. अगदी लसीकरणासारख्या गोष्टी ज्या बालरोगतज्ञाला फक्त टोचून द्यायच्या असतात त्यासाठीही पालक तालुक्याहून जिल्ह्याला जाणारे अनेक पालक असतात. पण याने जिल्ह्याची गर्दी तर वाढतेच शिवाय तुम्ही अनावश्यक गर्दीच्या ठिकाणी जाता. म्हणून आपल्या भागातील वैद्यकीय सेवेचा माहिती घेऊन लाभ घ्यावा.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

अनावश्यक स्थलांतर टाळा वैद्यकीय कारणासाठी स्थलांतराचे अजून एक मोठे कारण म्हणजे पहिले बाळ किंवा त्यानंतरचे ही काही बाळंतपण माहेरी झाला पाहिजे हा अट्टहास. यात बाळंतपणाचा खर्च माहेरच्यांवर ढकलणे हे ग्रामीण भागातील एक मोठे कारण असले तरी रिती रिवाज हे ही एक कारण आहे. या अट्टहासा पाई सधन कुटुंबाने डॉक्टर नसलेल्या खेड्यातील माहेरी पाठवून गुंतागुंत ओढवून घेतलेली ही कित्येक उदाहरणे माझ्या बघण्यात आहेत. लॉकडाऊनच्या काळात माहेरी बाळंतपणाच्या अट्टहासामुळे हॉट स्पॉट मधून ग्रीन झोन मध्ये प्रवास केलेले ही अनेक आहेत. आता मात्र बाळंतपण माहेरी हा नियम सोडून जिथे आहे तिथे , शक्यतो सासरीच आणि जिथे एमबीबीएस स्त्रीरोगतज्ञ आणि  बालरोगतज्ञ आहे, गरज पडल्यास सिझेरियन करण्याची व भूलतजज्ञाची उपलब्धता आहे हे तत्व पाळून बाळंतपणा साठी स्थलांतर टाळणे कोरोना रोखण्यासाठी खूप आवश्यक आहे.  सिटी स्कॅन, एम आर आय , डायलिसीस सारख्या सुविधा आपल्या भागात उपलब्ध असतील तर त्या ही तिथेच घ्याव्या.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोनासाठी झिंक महत्वाचे

कोरोनासाठी झिंक महत्वाचे

कोरोनासाठी झिंक महत्वाचे झिंक आपल्या शरीरातील असा सूक्ष्म घटक आहे जो प्रतिकारशक्ती साठी महत्वाचा असतो. कोरोना वर अजून संशोधन सुरु असून झिंक व कोरोना उपचार व प्रतिबंधाचा थेट संबंध सिध्द होण्यास अजून वेळ लागेल. पण मात्र सर्दी, खोकला, न्युमोनिया व इतर सर्व श्वसनाचे जेवढे जंतुसंसर्ग आहेत, ते टाळण्यात झिंकचे महत्व सिध्द झाले आहे. लहान मुलांना मधील जुलाब झाल्यावर दररोज ५ मिलीग्राम असलेले झिंकचे टॉनिक आम्ही बालरोगतज्ञ देतोच. त्यामुळे कोरोना टाळण्यासाठी झिंकचे महत्व आहे. उपचारामध्ये ही झिंकचा वापर सध्या केला जातो आहे. पण कोरोना टाळण्यासाठी झिंकच्या गोळ्या घेण्याची गरज नाही. पुढील अन्ना मध्ये झिंक जास्त प्रमाणात असते. या अन्नाचा नियमित आपल्या जेवणात समावेश असावा.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोनासाठी झिंक महत्वाचे लसून , भोपळा, टरबुजातील बियांच्या मधला भाग ( मगजबी ), वाटणे , पॉलिश न केलेला भात , मशरूम , तीळ , कडधान्ये , पालक , बदाम, चीज, शेंगा व कडधान्यात फायटेट नावाचा घटक असतो ज्यामुळे त्यांच्यातील झिंक शरीरात शोषून घेतले जाऊ शकत नाही. त्यासाठी हे पाण्यात भिजवून, अंकुरित करून घेतल्यास झिंक आतड्यात शोषून घेतले जाते. मासे व अंड्यांमध्ये ही झिंक असते.

रोज ८ ते ११ मिलीग्राम झिंक मानवाच्या शरीराला लागते. पुढील व्यक्तीं मध्ये झिंक शरीरात कमी असण्याची शक्यता असते –

  • वय ६० पेक्षा जास्त असणे
  • गरोदर व स्तनदा माता
  • मद्यपान करणारे
  • कॅन्सर
  • मधुमेह
  • दीर्घकालीन किडनीचे आजार
  • सिकल सेल अॅनीमिया

झिंकचे सप्लीमेंट्स कोणी घ्यावे ?

  • वर दिलेले आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने काही दिवस घेऊ शकता
  • कोरोनाशी संपर्क आला असल्यास किंवा लक्षण विरहीत कोरोना असल्यास शासकीय व्यवस्थेच्या निर्देशाप्रमाणे व तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

त्याच चुका परत नको

त्याच चुका परत नको

त्याच चुका परत नको ७ मे पासून भारतात परदेशात अडकलेल्या भारतीयांना ‘वंदे भारत ‘ या मोहिमे अंतर्गत आणण्यास सुरुवात झाली…

त्याच चुका परत नको ७ मे पासून भारतात परदेशात अडकलेल्या भारतीयांना ‘वंदे भारत’ या मोहिमे अंतर्गत आणण्यास सुरुवात झाली. कोरोनाच्या जागतिक संकटामुळे परदेशात भारतीय मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जवळपास १.५ लाख भारतीयांनी परतण्यासाठी परदेशात नाव नोंदणी केली आहे. आता पर्यंत १५००० भारतीय मायदेशी परतले आहेत आणि वंदे भारतच्या दुसऱ्या टप्प्याला २२ मे पासून सुरुवात झाली आहे. आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्यास काहीच हरकत नाही पण हे नागरिक भारतात व त्यातच मुंबई विमानतळावर उतरल्यावर त्यांच्या आयसोलेशन व क्वारंनटाइनचा जो गोंधळ उडाला आहे तो आधी जानेवारी महिन्यात जागतिक साथ सुरु झाल्याची घंटा वाजत असताना ज्या चुका झाल्या त्याचीच पुनरावृत्ती आहे व ती तत्काळ रोखायला हवी. एवढेच नव्हे तर यापुढे परदेशातून भारतात आणल्या जाणाऱ्या व त्यातच मुंबईत येणाऱ्या प्रवाशांबद्दल काय धोरण असेल हे निश्चित करावे लागेल. एकीकडे मुंबई व महाराष्ट्राच्या इतर भागात कोरोना ज्या झपाट्याने वाढत आहेत, त्यावरून समूह संसर्ग सुरु झाला आहे असे मानण्यास मोठी जागा असताना कोरोना संसर्ग भारता पेक्षा जास्त असलेले देशातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांच्या नियोजनाचा बोजवारा हा जून महिन्यात राज्यात दुसऱ्या कोरोना रुग्णांच्या लाटेला जबाबदार ठरू शकतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

त्याच चुका परत नको सध्या मुंबई विमानतळावर येणाऱ्या या प्रवाशांची मुंबईचे व मुंबई बाहेरील अशी विभागणी केली जाते आहे. यात मुंबईतील रुग्णांना विमानतळा जवळील हॉटेल्समध्ये प्रती दिवस सहा हजारांपासून पुढे आकारून क्वारंटाइनची सोय केली जाते आहे. पण मुंबई बाहेरील प्रवाशांना मात्र गाड्यांनी त्यांच्या गावी जाऊन होम क्वारंटाइन होण्यास सांगितले जाते आहे. यात काहींना नागपूर, अकोला, गोंदिया, कोल्हापूर असा १० ते २० तासाचा प्रवास करून जावे लागले व पुढे ही असे प्रवासी असतील. हे रुग्ण परदेशाहून आले असल्याने त्यातील काही कोरोना बाधित असल्याची दाट शक्यता आहे. पण तरीही वाटेत ते थांबतील तिथे व पोहोचल्यावर ही नेमके कोणाला भेटून व कुठे रिपोर्टिंग करायचे हे न सांगता मध्य रात्रीच अनेकांना गाडीत बसवून मुंबई बाहेर धाडण्यात आले. या पैकी काही क्वारंटाइनसाठी पैसे भरण्याची तयारी असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना हॉटेल मध्ये क्वारंटाइनची परवानगी देण्यात आली नाही. एकदा होम क्वारंटाइनने हात पोळून घेतलेली असताना परत एकदा माहित असलेल्या इंडेक्स केसेस ( निश्चित संसर्ग करतील अशा माहित असलेल्या सुरुवातीच्या केसेस ) बाबतही जोखीम आपण का करत आहोत? मुंबई मध्ये खाटा उपलब्ध नाही आणि आधीच आकडा वाढत असताना मुंबईवरच सर्व केसेसचा ताण नको हे एक वेळ गृहीत धरले . तर मग महाराष्ट्रात सर्व परदेशातून येणारी विमाने मुंबई विमानतळावर उतरवायची कशाला? यासाठी शिर्डी विमातळावर विमान उतरवून शिर्डीला रिक्त असलेल्या भक्त निवासांमध्ये एका वेळेला किती ही लोकांना क्वारंटाइन सुविधा पुरवता येईल. १४ दिवसांचा क्वारंटाइन संपला कि यांना घरी सोडता येऊ शकते. जर कोणाला लक्षणे आलीच तर शिर्डीचे भव्य सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहेच. हा पर्याय शक्य नसला तर नाशिक किंवा इतर कुठल्या ही विमानतळ असलेल्या शहराचा विचार करता येऊ शकतो. या परदेशातून येणाऱ्या भारतीयांच्या विलगीकरणाचे नियोजन गांभीर्याने घेण्याचे कारण म्हणजे परदेशातील अधिक घातक कोरोना स्ट्रेन्स परत राज्यात मिसळण्यास ही संधी ठरू शकते. कोरोनाची संक्रमित होण्याची शक्यता जास्त आहे आणि भारता सारख्या उष्ण देशातील स्ट्रेन ही इतर देशांच्या मानाने कमी घातक ठरल्याचे दिसून येते आहे. अगदी महाराष्ट्र व पंजाब अशा राज्यांतर्गतही स्ट्रेन्स मध्ये फरक आहे. अशात परत परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना इस्टीट्युशनल क्वारंटाइन न करता घरीच क्वारंटाइन करणे परदेशी कोरोनाच्या स्ट्रेन साठी आपले अंगण दुसऱ्यांदा मोकळे करण्यासारखे आहे. एरवी सगळी कडे होम क्वारंटाइन केले जातच असल्याने यासाठी निर्माण केलेल्या सुविधा रिकाम्या आहेत. त्यांचा वापर करून हे धोरण तातडीने शासनाने राबवायला हवे. दुसरी सध्या होत असलेली चूक म्हणजे आता होम क्वारंटाइन सारखे होम आयसोलेशन म्हणजेच तुम्ही कोरोना पोझीटीव असून तुम्हाला सौम्य लक्षणे असल्यास किंवा लक्षण विरहीत असल्यास तुम्ही घरीच राहायचे हे मुंबईत केले जाते आहे. होम क्वारंटाइन अपयशी झाल्याने आज असलेली स्थिती ओढवली मग परत होम आयसोलेशनची चूक कशासाठी? पूर्ण राज्यात सौम्य व मध्यम लक्षणे असल्यास निचित निदान झालेल्या रुग्णांना दहाव्या दिवशी सुट्टी देऊन उर्वरित ७ दिवस घरीच आयसोलेशन हे निकष पाळले जात आहे. आरोग्य सुविधा अपुऱ्या आहेत हे मान्य पण साथीच्या वाढत्या प्रमाणासोबत सुविधांच्या उपलब्धते प्रमाणे निकष मर्यादित करत नेऊन अपुऱ्या सुविधांना अनुरूप निकष आकसण्याची प्रक्रिया सुरु करायची. की निकष अधिक व्यापक करत आरोग्य सुविधा वाढवायच्या हे ठरवावे लागेल. सध्या तरी दिवसेंदिवस निकष आकसत असून त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो आहे. किमान लक्षण विरहीत किंवा सौम्य लक्षणांच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे नाकारताना त्यांनी कधी रुग्णालयात जायला हवे अशा ११ रेड फ्लॅग साईन्स म्हणजे धोका दर्शवणारी लक्षणे कोणती याचे सविस्तर समुपदेशन व लिखित माहिती घरी असलेल्या रुग्णांना दिली जात नाही आहे. यामुळे अनेक ‘सायलेंट हायपॉक्सिया’ किंवा ‘हॅप्पी हायपॉक्सिया’ म्हणजे इतर काहीही लक्षणे नाही पण शरीरातील ऑक्सिजनची पातळी मात्र घसरलेली आढळून आलेल्या व पुढे गंभीर झालेल्या केसेस लक्षात न येण्याचा धोका आहे.त्याच चुका परत नको यासाठी घरी असलेल्या लक्षण विरहीत किंवा सौम्य लक्षणे असून दाखल न करून घेतलेल्या रुग्णांना घरी बोटावर मावणारे पल्स ऑक्सिमीटर वापरून दिवसातून तीन वेळा ऑक्सिजनची पातळी तपासण्यास सांगता येईल का? आरोग्य सुविधा अपुऱ्या आहेत म्हणून रुग्णांना घरी थांबा असे सांगून हा विषय संपवता येणार नाही कारण याची परिणीती मृत्यू दर वाढण्यात होऊ शकते. देशातील एकूण मृत्यू पैकी ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. हा आकडा कमी करण्यासाठी एक तर घरी रुग्ण ठेवणे टाळावे किंवा ठेवत असल्यास होम मॉनीटरींगचे निकष व रोज या रुग्णांशी ऑनलाईन संवाद व निरीक्षण करायला हवे. घरी लवकर पाठवणाऱ्यांच्या बाबतीत ज्यांना होम आयसोलेशन साठी वेगळी खोली आहे की नाही हे वर्गीकरण करणे गरजेचे आहे. अनेक रुग्ण कुटुंबासह एक दोन खोल्यात राहतात. किमान अशांसाठी तरी होम आयसोलेशन चे निकष बदलून त्यांना पूर्ण चौदा दिवस रुग्णालयात ठेवावे. कारण अपुऱ्या खाटांचे कारण पुढे करत रुग्णांना घरी पाठवून त्यांच्या कुटुंबाला बाधा करण्याचा मार्ग मोकळा करून उलट आरोग्य यंत्रणेवरील ताण पुढे वाढणार आहे हे आपल्या लक्षात येत नाही. हा विषाणू नवीन असल्याने साथ व प्रतिबंधाचे नियोजन करताना चुका होणे सहाजिक आहे. पण आधी केलेल्या चुकांमधून अपरिमित नुकसान झालेले स्पष्ट असताना त्याच चुका पुन्हा करणे मूर्खपणाचे ठरेल.

सदरील माहिती आपण  महाराष्ट्र टाईम्स मध्येही वाचू शकता

सलून व नाभिकांकडे जाताना…

सलून व नाभिकांकडे जाताना...

सलून व नाभिकांकडे जाताना ग्रीन व ऑरेंज झोन मध्ये सलून व नाभिकांची दुकाने आता उघडू लागली आहेत. तसेच नंतर नाभिकांकडे जावे लागेलच. त्यामुळे या विषयी नाभिक व केस कापण्यास आलेल्या दोघांनी काळजी घ्याव –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • सलून व नाभिकांकडे जाताना नाभिकांनी शक्यतो पूर्ण पीपीई म्हणजे वयक्तिक सुरक्षेचे कवच वापरावे. पण ग्लोव्हज प्रत्येक ग्राहकांसाठी नवे वापरता येतील असे डिस्पोजेबल प्लास्टीकचे वापरावे. या ग्लोव्हजची किंमत १- २ रु इतकी कमी असते.
  • शक्यतो प्रत्येक ग्लोव्हजसाठी डिस्पोजेबल टॉवेल वापरावा किंवा प्रत्येकाने घरून आपला धुतलेला टॉवेल सोबत घेऊन जावा.
  • सलून व नाभिकांकडे जाताना… जर तुम्ही तुमचे स्वतःचे टॉवेल, अंगावर टाकण्याचा ड्रेप, कात्री, कंगवा, वस्तरा, ब्लेड व स्प्रेयर हे सर्व साहित्य खरेदी केले तरी त्याची किंमत जास्तीत जास्त १००० रुपये असेल. व हे तुम्ही अनेक वर्ष वापरू शकता. म्हणून शक्यतो हे सर्व साहित्य स्वतः खरेदी करावे व वापरावे. याने सलून मधील सर्वांना वापरले जाणारे साहित्य वापरण्याची गरज पडणार नाही.
  • नाभिकांना सलून मध्ये आल्यावर खुर्चीवर बसण्या आधी हात धुऊन व मास्क घालूनच बसण्याची सक्ती करावी. हात धुतल्यावर हँड सॅनीटायजरचा वापर करावा.
  • जर ग्राहकांनी स्वतःचे सामान आणले नसेल तर प्रत्येक कटिंग नंतर साहित्य सॅनीटायजरने धुउन घ्यावे.
  • दर रोज सलून बंद करताना काच , खुर्ची आणि जमीन , काचे समोरचे टेबल १ % सोडियम हायपोक्लोराईटने धुवून घ्यावे.
  • शक्यतो आपला नंबर आल्यावर सलून मध्ये यावे. तो पर्यंत सलून मध्ये गर्दी करून बसू नये. सलून ने वेळ देऊन बोलावण्याची सवय लावावी.
  • कटिंग सुरु असताना आपल्याला काही तरी बोलण्याची , नाभिकाशी गप्पा मारण्याची सवय असते. ग्रामीण भागात तर नाभिकाची खुर्ची म्हणजे गावभरच्या गप्पा, गॉसीपसाठीचे ठिकाण असते. हा मोह टाळावा व शांत बसावे.
  • सलून मध्ये दाढी करणे टाळावे व दाढी शक्यतो घरीच करावी. सलून मध्ये दाढी करत असल्यास त्यासाठी  प्रत्येकाला नवा डिस्पोजेबल खोऱ्या वापरावा.
  • कटिंग किंवा दाढी करताना थोडी जखम झाल्यास त्यावर तुरटी लावू नये. स्वच्छ कापसाने स्पिरीट लावावे.
  • प्रत्येक कटिंग किंवा दाढी झाल्यावर ग्लोव्हज काढून नाभिकाने हात धुवावे.
  • केस कापून झाल्यावर सलून मधून बाहेर पडताना हँड सॅनीटायजर वापरावे व घरी गेल्यावर हात धुवून लगेचच अंघोळ करावी.
  • सर्दी, खोकला, ताप असल्यास सलून मध्ये जाऊ नये, नंतर केस कापावे. तसेच नाभिकाला ही लक्षणे असल्यास त्यांनी बरे वाटे पर्यंत कामावर येऊ नये.
  • ग्रामीण भागात व तालुका पातळीवर नाभिक थोडे अधिक पैसे आकारून घरी येऊन केस कापण्यास तयार असतात. अशी सेवा असल्यास ती घ्यावी व अशा वेळी बाहेर मोकळ्या वातावरणात वरील सर्व काळजी घेऊन केस कापावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मालेगावातील ‘कोरोना’ – हिमनगाचे टोक

मालेगावातील ‘कोरोना’ – हिमनगाचे टोक

मालेगावातील ‘कोरोना’ – हिमनगाचे टोक मालेगावमधील ‘कोरोना’ च्या प्रादुर्भावाबद्दल वैद्यकीय आणि  विज्ञाननिष्ठ चर्चा करायची झाली तर धार्मिक स्पर्श बाजूला ठेवून धीराने मालेगावचा ग्राउंड रिपोर्ट जाणून घेण आणि  त्यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. जसे मुंबई हे महाराष्ट्रच नव्हे तर देशाची कोरोना राजधानी ठरते आहे तशीच मालेगाव ही ग्रामीण व उर्वरित महाराष्ट्राची कोरोना राजधानी ठरण्याच्या मार्गावर आहे. यासाठी सुधारणा करायची  असेल तर या मुद्द्यांकडे जातीय दृष्टीकोनातून न पाहता तातडीने पावले उचलली पाहिजेत.

     डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मालेगावातील ‘कोरोना’ – हिमनगाचे टोक मालेगाव मध्ये कोरोना बाधितांचा अधिकृत आकडा ६९६ व कोरोना मृतांचा आकडा ४४  असला तरी खरा आकडा खूप मोठा आहे. मुस्लीम बहूल मालेगाव मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला ८ एप्रिलला म्हणजे रमजानच्या तोंडावर. क्वारनटाईन व आयसोलेशनची भीती, सणाच्या तोंडावर रुग्णालयात जाणे चांगले नाही अशा अनेक गैरसमजांमुळे इथला मुस्लीम समाज तपासणी साठी फारसा पुढे आला नाही. त्यातच जुन्या मालेगाव मध्ये दाटी वाटीने राहात असलेल्या मुस्लीम वस्त्यांमध्ये सोशल डीस्टन्सिंगचे नियम पाळणे अवघड आहे. यामुळे अधिकृत आकडे आणि  मृत्यू जरी कमी दिसत असले तरी मालेगाव मध्ये गेल्या दीड महिन्यात मृत्यूचे प्रमाण खूप वाढले आहे. मालेगावच्या बडा कब्रस्तान मध्ये एप्रिल महिन्यात ४५७ मृतदेहांचे दहन करण्यात आले आहे व तुलनेत एप्रिल २०१९ मध्ये केवळ १४० मृतददेहांचे दहन जाहले आहे. प्रशासना कडून मात्र मृतांचा आकडा ४४ सांगितला जात असला आणि  इतर मृत्यू हे कोरोना मुळे नव्हे तर इतर कारणांमुळे होत असल्याचे सांगितले जाते आहे. मुळात मालेगाव मध्ये मृतांचा आकडा हा ४०० – ५०० पेक्षा खूप अधिक आहे आणि  शासनाने खरच खरा आकडा शोधून काढला तर मालेगाव मध्ये  प्रती दशलक्ष मृत्यू दर हा मुंबई व न्युयोर्क पेक्षा खूप जास्त निघेल असे मालेगाव मधील डॉक्टर व काही जाणकार नागरिक सांगतात. आज मालेगावच्या बडा कब्रस्थान मध्ये मृतदेह पुरायला जागाच शिल्लक नाही अशी स्थिती आहे. असे असेल तर मृतांचे स्वॅब घेऊन ते कोरोनाचे होते का  हे सिध्द करायला हवे आणि  खरच इतर कारण असतील तर त्या कारणांचा शोध घ्यायला नको का? इतर कारण आहेत हे प्रशासनाचे उत्तर ग्राह्य धरले तरी या इतर आजार असलेले रुग्णच कोरोनाच्या भक्षस्थळी पडतात.

     मालेगावातील ‘कोरोना’ – हिमनगाचे टोक मृतांचा आकडा वाढण्याचे अजून एक कारण म्हणजे साथ सुरु झाल्यावर शासकीय रुग्णालयात रुग्ण हाताळण्यासाठी कुठलीही सक्षम व्यवस्था नव्हती. त्यातच सर्दी खोकल्याचे रुग्ण खाजगी रुग्णालयात पहायचे नाहीत असा नियम असल्याने रुग्णांना शासकीय रुग्णालयात जावे लागायचे. पहिल्या काही दिवसात कोरोनाचे जे मृत्यू झाले ते बहुतांश सायलेंट हायपॉक्सिया मुळे झाले. म्हणजेच रुग्णांना विशेष लक्षणे नाही पण ऑक्सिजनची पातळी मात्र खालावलेली. काही जण खूप उशिरा रुग्णालयात पोहोचत. त्यामुळे साथ सुरु होताच झपाट्याने मृत्यूचा आकडा वाढला. या मुळे शासकीय रुग्णालयात कोरोना चा रुग्ण दाखल झाला म्हणजे मृत्यूच होणार अशी भीती पसरली आणि  या भीती पोटी मुस्लीम समाजात रुग्णालयात दाखल होणे किंवा त्रास होत असल्यास टेस्टिंग साठी पुढे येणे याचे प्रमाण खूप कमी झाले. त्यामुळे केसेस व मृत्यू वाढतच गेले. यासाठी स्थानिक प्रशासन सुस्त असून फारसे काही पाऊले उचलत नाहीत हे दिसल्याने इथल्या मुस्लीम डॉक्टर्सने जन जागृतीचे काम सुरु केले. टेस्टिंग आणि  उपचारासाठी पुढे आला नाहीत तर आपल्यालाच धोका आहे हे समाजाला समजावून सांगितले. आता स्थिती काहीशी नियंत्रणात असली तरी अजून सगळे आलबेल आहे असे म्हणता येणार नाही. मालेगाव मध्ये मुस्लीम लोकसंख्या ८० टक्के असली तरी टेस्टिंग झालेल्यांपैकी केवळ १० % मुस्लीम आहेत. अजून हे प्रमाण वाढलेले नाही. हा प्रश्न धार्मिक पेक्षा अज्ञानाचा आणि  असुरक्षिततेचा आहे. तो दूर करण्यासाठी कुठला हा आराखडा आणि  मोहीम शासनाने आखलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी प्रशासनाला आदेश दिले आणि  तेवढ्या पूर्ती चक्रे हलली पण परत सगळे जैसे थे झाले.

       मालेगाव हे दुसरे धारावी आहे असे मानून शासनाला वेगळे “मिशन मालेगाव“ आखावे लागणार आहे. राज्यात इतरत्र जसे एकसुरी कार्यक्रम राबवला जातो आहे तसे इथे करता येणार नाही. मालेगावचे प्रश्न वेगळे आहेत आणि  त्यात मुस्लीम समाजाला मोठ्या प्रमाणावर विश्वासात घेऊन पाऊले उचलावी लागणार आहेत. मालेगाव मनपा घरोघरी जाऊन होम स्क्रीनिंग ही करते आहे. पण तरी खरे आकडे बाहेर येणे आणि  त्याप्रमाणे कठोर पाऊले अजून उचल गेली पाहिजे . ‘मिशन मालेगाव’ चे अनेक पदर असू शकतात –

  • खाजगी संस्था / स्वयंसेवी संस्थांकडून वेगळे सर्वेक्षण करून वास्तव पुढे आणणे व खरी माहिती जाणून घेणे.
  • मुस्लीम समाजातील धार्मिक गुरु, मौलवी, डॉक्टर, नेते  यांना विश्वासात घेऊन समाजात टेस्टिंग साठी पुढे येण्या बाबत व मृत्यूची करणे, आजार न लपवण्याबाबत समाजात जन जागृती साठी सहकार्य मिळवणे.
  • मालेगाव मध्ये कापड व हँडलूम व्यवसाया मुळे इथे टीबी व फुफुसाची क्षमता कमी करणारे न्युमोकोनीयासीस या आजाराचे प्रमाण खूप जास्त आहे, ज्या कडे आजवर कधी लक्षच दिले गेले नाही. हे सर्व रुग्ण शोधून  त्यांच्यासाठी उपचाराची  स्वतंत्र सोय करणे गरजेचे आहे  कारण या रुग्णां मध्येच कोरोना मुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.
  • मालेगाव मध्ये एका किलोमीटर मध्ये १० ते २०,००० व एका घरात २० त २५ जन राहतात असा मुस्लीम वस्तीचा मोठा भाग आहे. जर ही लोकसंख्येची घनता अशीच दाट राहिली तर भविष्यात मालेगाव मध्ये कोरोनाचा मोठा स्फोट होईल व असंख्य मृत्यू होतील. मालेगावच्या भोवती जागा उपलब्ध आहे. त्यामुळे मालेगावच्या नगर विकासाचा व मुस्लीम वस्त्यांच्या गर्दी व दाटी वाटीने राहण्याचे प्रमाण  कमी होईल अशा रीतीने पुनर्विकास प्रकल्प आखावा लागणार आहे.
  • रोज ३० ते ४० दहनांमुळे मालेगावच्या बडा कब्रस्तान मध्ये आता मृतदेह पुरण्यास जागा उपलब्ध नाही. तसेच कोरोनाचे समोर न आलेले मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांचे दहन संसर्ग पसरू नये यासाठी कसे करायचे याचे नीटसे ज्ञान कोणालाही नाही. म्हणून याविषयी माहिती देऊन कब्रस्तानसाठी वेगळी जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे आणि  मृतदेहांच्या विल्हेवाटी विषयी जागृती निर्माण करावी लागणार आहे.

          मालेगाव व बसवंत पिंपळगाव ही दोन शहरे नाशिकचा आर्थिक कणा आहेतच तसेच इथल्या संपन्न , सधन बाजारपेठा महराष्ट्राच्या ग्रामीण अर्थचक्राचा मोठा आधार आहेत. मालेगाव मध्ये कोरोना प्रतिबंध गांभीर्याने घेतला नाही तर इथला कापड व इतर उद्योग ढासळून , इथे असणाऱ्या व्यापाऱ्यांची आवक थांबून त्याचा नाशिक व राज्याच्या अर्थकारणावर मोठा दुष्परिणाम होईल. म्हणून दडवून ठेवलेला मालेगावचा ग्राउंड रिपोर्ट स्वीकारून तातडीने पाऊले उचलली गेली पाहिजे

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता