मालेगाव बदलते आहे मालेगावच्या परिस्थिती वर ‘मिशन मालेगाव’ सुचवणारा लेख सकाळ मध्ये लिहिला. यानंतर काहींनी धमक्या दिल्या, काहींनी ट्रोल केले तर वाचकांनी सत्य स्थिति सांगितल्या बद्दल कौतुक केले आणि हिम्मत वाढवली. पण एका व्यक्तिच्या वाचनात हा लेख आला आणि तो क्षण देशाचे वुहान ठरत असलेले कोरोना केंद्र – मालेगावचे भवितव्य बदलणारा ठरला. ती व्यक्ति म्हणजे मालेगाव महापालिकेचे आयुक्त दीपक कासार. २८ एप्रिलला दीपक कासार यांनी मालेगाव महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली आणि ३१ मे ला सकाळ मधील आमचा लेख प्रकाशित झाला . या लेखाकडे कासार यांनी टीकेच्या नजरेतून नव्हे तर संधी म्हणून पहिले. “ डॉक्टर तुम्ही आम्हाला मालेगावचा आरसा दाखवला, मी शपथ घेतो की ही परिस्थिति बदलवून दाखवेल, तुम्ही माझ्या सोबत आहात का?” असा मला दीपक कासार यांचा फोन आला. माझ्या गाठीशी असलेला माझ्या गावातील कोरोना प्रतिबंधाच्या ‘वैजापुर मॉडेल’च्या अनुभवा वरून काही उपाययोजना दीपक कासार यांना सांगितल्या व अणि इतर तज्ञांशी त्यांचा संपर्क करून दिला. वैद्यकीय ज्ञान आणि दीपक कासारांचे प्रशासकीय कौशल्याने कासार यांनी मालेगावचा कोरोना आटोक्यात आणण्याच्या संकल्पपूर्तीला सुरुवात किली.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
घरोघरी जाऊन आढावा
मालेगाव मध्ये लोक तपासणी साठी बाहेर पडत नाहीत, मृत्यूचा आकडा आणि बाधित जास्त आहेत या लेखातील माहितीच्या अनुषंगाने दीपक कासार यांनी घरोघरी आपल्या प्रशासनातील वेगळी व्यवस्था कामाला लावली आणि एक धक्कादायक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. मुस्लीम समाजात मृत्यू झालेल्यांच्या विधवेला फिदानी या धार्मिक नियमा अंतर्गत ४ महिने आणि आकरा दिवस घरातून बाहेर पडण्याची परवानगी नसते. कोरोनाने मृत्यू झालेल्याच्या थेट संपर्कात आलेल्या या महिलांना त्यामुळे लक्षणे आली तरी घरातून बाहेर पडण्याची या प्रथेमुळे सोय नव्हती. म्हणून यांच्या साठी कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करतील व त्यांना गरज वाटल्यास उपचार ही घरीच करण्यात येतील हा विश्वास दीपक कासार यांनी अशा मुस्लीम कुटुंबीयांना दिले. अनेक जण सायलेंट हायपोक्सिया म्हणजे लक्षात येत नसलेले ऑक्सिजणचे प्रमाण कमी होणे याने दगावत आहेत हा मुद्दा मी माझ्या लेखात मांडला होता. यावर चर्चा करून दीपक कासार यांनी घरी असलेल्या कोरोना बाधितांना रोज पल्स ऑक्स तपासणी व अशा प्रत्येकाच्या थेट घरातच ऑक्सिजण सिलेंडर ही उपलब्ध करून दिले.
प्रतिसाद मिळू लागला
मुस्लीम वस्तीत त्यातच महिलांच्या तपासणी साठी मुस्लीम समाजातीलच आशा सेविकांना जबाबदारी दिली. यामुळे घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या स्क्रीनिंगला
आधी मिळत नसलेला प्रतिसाद मिळू लागला. आम्ही लेखात इतर आजार बरे करा तरच कोरोनाचे
मृत्यू टळतील या सूचनेला अनुसरून कोरोना सहित इतर जोखीम वाढवणाऱ्या आजारांचे
स्क्रीनिंग ही कासार यांनी केले.
मालेगाव मध्ये डॉक्टरांची कमतरता
होती. २८३ डॉक्टरांना मालेगाव साठी आदेश निघाले होते. त्यापैकी फक्त ६ डॉक्टर रुजू
झाले. मालेगाव मधील स्थानिक डॉक्टरांची नियुक्ती करायची झाल्यास जाहिरात देण्यास
लॉकडाऊन मुळे काही मार्ग नव्हता. मग कासार यांनी मजीदींच्या भोंग्यावरून डॉक्टर व
आरोग्य कर्मचारी नियुक्तीसाठी जाहिरात द्यायला सुरुवात केली. त्यातून एमबीबीएस
सोबतच आयुर्वेद, होमिओपॅथी व त्यातच
मुस्लीम समाजातील युनानी डॉक्टर रुजू होण्यास तयार झाले. डॉक्टरांसह इतर काम करणाऱ्यां
बरोबर रोज उत्तम प्रतीची राहण्याची सोय, हवे तसे आणि हवे ते जेवण आणि वागणुकीत मान सन्मान, त्यांनी सांगितलेली सूचना
लगेच मान्य करणे यामुळे या पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांचा आत्मविश्वास वाढला.
इतर अनेक ठिकाणी प्रशासन विरुद्ध डॉक्टर वादाची ठिणगी कासार यांनी मालेगाव मध्ये
पडू दिली नाही.
रुग्णांना सकस आहार
कोविड केअर सेंटर गावा बाहेर असल्याने
आम्हाला मुस्लीम समाजाला भीती
वाटते आणि स्त्रियांना अशा ठिकाणी तर
आम्ही मुळीच पाठवू शकत नाही असे मत काहींनी बोलून दाखवले. लगेचच सरकारी लाल फितीचा कारभार
बाजूला ठेवून कासार यांनी जागा बदलून गावाच्या मध्य वस्तीतील कॉलेजेस ताब्यात
घेतली व तिथे अलगीकरण ( आयसोलेशन ) सोय निर्माण केली. तोच तो रोजचा पोहे , उपमा
नाश्ता बंद करून या रुग्णासाठी उच्च प्रथिने युक्त नाश्ता व दिवसाला प्रथिने १
ग्राम प्रतिकिलो गरज पूर्ण होईल असा सकस आहार या रुग्णांना उपलब्ध करून दिला. या
साठी रोज सकाळी या रुग्णांचे डान्सिंग योगा वर्ग घेण्याची जबाबदारी डॉ. उज्वल
कापडणीस यांनी स्वीकारली. दीपक कासार स्वतः या डान्सिंग योगा वर्गात सामील व्हायचे.
संशय दूर केला
मालेगाव बदलते आहे डॉ.सचिन जोशी या पवित्र कोरोनाचे अभ्यासक असलेल्या शिक्षणतज्ञांनी समाजाला कुराणाचे दाखले देऊन प्रतिबंधाचे उपाय समजावून सांगितला. मुस्लीम समाजाचा विश्वास जिंकणे गरजेचे आहे हे आम्ही लेखात नमूद केले होते. त्यासाठी दीपक कासार रोज मौलवींसोबत दुआ मागण्याच्या कार्यक्रमात सामील होऊ लागले. ‘कोरोना ही आमच्या विरोधात साजीश आहे, लॉकडाऊन असताना कोरोना मालेगावात येतोच कसा’ असे गैरसमज कासार यांनी प्रेमाने व समजावून सांगून खोडून काढले. या सगळ्या कामाच्या व्यापात दीपक कासार स्वतः ही कोरोना बाधित झाले. पण सुट्टी न घेता त्यांनी वर्च्यूअल ऑफिस चालू ठेवले. सातव्या दिवशी टेस्ट निगेटिव आल्यावर स्वतःलाच कोरोना मुक्तीचे रोल मॉडेल बनवण्याचे त्यांनी ठरवले. प्रत्येक मोहोल्ल्यात जाऊन त्यांनी मी कोरोना मुक्त झालो, तुम्ही ही पुढे या, प्रशासनाला साथ द्या आणि कोरोना मुक्त व्हा असे छोट्या बैठकांमध्ये सांगायला सुरुवात केली.
खाजगी डॉक्टरांचे सहकार्य
मालेगाव बदलते आहे प्रशासनाच्या समंजस दृष्टीकोणामुळे मालेगाव मधील खाजगी डॉक्टरांनीही उत्तम सहकार्य केले. या दरम्यान रुग्ण वाहिकांचा तीव्र तुटवडा होता. शांतीलाल मुथा यांनी भारतीय जैन संघटने तर्फे ११ रुग्णवाहिका दिल्या. पण रुग्णवाहिकेच्या सर्व चालकांनी नोकरी सोडून दिली होती. त्यासाठी चालकच भेटेना. मग कासार यांनी उर्दू मध्ये चालक पदासाठी जाहिराती दिल्या आणि म्हणेल तितका पगार या तत्वावर तातडीने बेरोजगार तरुण चालकांना सेवेत रुजू करून घेतले. कोरोना मृताची संख्या सुरुवातीला खूप होती. म्हणून या मृतदेहांचे पॅकिंग / त्यांना वाहून नेणे यासाठी माणसेच मिळत नसत. त्यासाठी हे काम करणाऱ्यांना पूर्ण वैयक्तिक सुरक्षेचे कवच, वाढीव मानधन, समुपदेशन करून हा प्रश्न ही सोडवला. या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हजे रोज रस्त्याने लागणारी अंत्ययात्रांची आणि मृतदेहांची रांग कमी होताना दिसू लागली.
८६० रुग्णसंख्या ८२ वर
बघित रुग्णसंख्येचा दुपटीचा काळ ४ दिवसावरून ९४ दिवस झाला . रोजचे ४ मृत्यू हे १ किंवा शून्य वर आले . बरे होण्याचे प्रमाण ८२ % झाले व ८६० रुग्ण संख्या ८२ वर आली. लढा अजून पूर्ण संपलेला नसला तरी अंतिम विजय मात्र नजरेच्या टप्प्यात आला आहे.
सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.