दृष्टीकोन बदलू… भविष्यही बदलेल!

दै. दिव्यमराठी

-डॉ. अमोल अन्नदाते

हैदराबाद मुक्तीसंग्रमाला ७४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मराठवाड्याच्या अनेक वर्षे रखडलेल्या प्रगती विषयी बऱ्याच चर्चा झडल्या. पण केंद्रातून संयुक्त महराष्ट्राचा सुवर्ण कलश आल्या पासून राज्याच्या प्रगतीचा आलेख आणि भूभागातील लाभ व विकासाची विभागणी केली तर मुंबई, पुणे , नाशिक हा सुवर्ण त्रिकोण व पश्चिम महाराष्ट्र, काही प्रमाणात अहमदनगर जिल्हा सोडला तर मराठवाड्या सोबत कोकण , खानदेश , विदर्भाचा नागपूर सोडून इतर सर्व भाग अजून विकासापासून वंचित राहिला आहे. खरे तर आहे रे आणि नाही रे असे हे महाराष्ट्राचे दोन भाग तयार होतात. राज्याच्या नेतृत्वात खरे तर पुणे , मुंबई , नाशिक ला म्हणावी तशी संधी मिळालेली नाही. चार मुख्यमंत्री तर एकट्या मराठवाड्याने दिले , विकासाच्या मागच्या बाकावरच्या मराठवाडा, विदर्भ , कोकणाला हे  नेतृत्व करण्याची संधी वारंवार मिळाली. मुंबई ला तर मनोहर जोशीं नंतर थेट उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या रूपाने आता कुठे संधी मिळाली आहे. यावरून एखाद्या भूभागाला राजकीय नेतृत्वाची संधी मिळाली तरच तिथे विकास होतो हे  गृहीतक खोटे ठरते. चांगले स्थानिक नेतृत्व हे बारामती , आकलुज प्रमाणे एखाद्या विशिष्ट गावाच्या , भागाच्या प्रगती मध्ये उत्प्रेरकाचे काम जरूर करतात पण प्रगतीचा महामेरू त्या भागातील जनतेला व त्यांच्या मानसिकतेला पेलून धरावा लागतो. तसेच आपले अस्तित्व जिथे  उभे आहे , आपण राहात आहोत त्या भागाच्या विकासाची जबाबदारी व त्याचे उत्तरदायीत्व आपले आहे ही मानसिकता जेव्हा बहुतांश जनतेच्या मनात निर्माण होते तेव्हा तो भूभाग प्रगतीची कात टाकण्याच्या प्रक्रियेत अपोआप शिरतो आणि दशक भरात एक नवे गाव, नवा भाग फुललेला दिसतो. मराठवाडा विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्रा नेमका याच मानसिकतेच्या रुळावरून काहीसा घसरलेली दिसतो .

                          जसा व्यक्तीला इंटेलिजन्स कोशंट ( बुध्यांक ) , इमोशनल कोशंट ( भावनिक बुध्यांक ) असतो  तसा त्या भागात राहणाऱ्या सर्व जनतेचा कलेकटीव विझडम अर्थात सामुहिक विचारबुद्धी व प्रोग्रेस कोशंट म्हणजे विकासाची व्यक्तिगत व सामुहिक भूक असते.  ही मोजण्याची पद्धत नसली तरी त्या भागात तुम्ही प्रवास करत असताना चहाच्या टपरी पासून , तिथल्या रूग्णालया पासून ते टोलनाका , पर्यटन स्थळे इथे तुम्हाला त्या भागातील ही विचारबुद्धी जाणवते , स्पर्श करते. या प्रक्रियेत विकास म्हणजे केवळ आर्थिक विकास नव्हे तर त्या भागातील लोकांचे जीवनमान , त्या भागातून लोकांना इतरत्र स्थलांतरीत होण्याची इच्छा न होणे , इतर भागातून लोकांना येऊन कुटुंबासह येऊन स्थिर व्हावे वाटणे व उद्योगांना आकर्षित करणारे चुंबक बनणे अशा अनेक गोष्टी अंतर्भूत असतात हे समजून घेणे गरजेचे आहे. म्हणून यात आर्थिकच नव्हे तर शैक्षणिक , सांस्कृतिक, आरोग्य, पर्यटन अशा सर्वच  गोष्टींना स्पर्श करणारी साधने उभी करण्याची मानसिकता अंतर्भूत आहे.

                                     आता प्रश्न उरतो एखाद्या भागाचे दातृत्व स्वीकारून ही साधने उभी कोण करणार व त्या भागाचे पाल्यत्व स्वीकारून या उभारलेल्या साधनांचा उपभोग घेत ती अभंग ठेवणे , तीचे पालन पोषण कोण करणार व ही विभागणी त्या जनतेने कशी करायची व स्वीकारायची ? अर्थात याची पहिली पायरी आर्थिक विकास, त्या भागातील नागरिकांचे दर डोई उत्पन्ना व त्यांची वस्तू / सेवा विकत घेण्याची क्षमता वाढणे ही असते. ही क्षमता घरात बसून , पारावर बसून , नेत्यांमागे हिंडून किंवा समाज माध्यमांवर वाद घालून येत नाही. जगात एकूण लोकसंख्ये पैकी केवळ २० % लोकांना आपल्या आयुष्यात बदल व्हावा व आपण पुढे जावे असे वाटत असते. ७५ % लोकांना आहे तिथेच राहणे किंवा मागे गेलो तरी त्याचे फारसे शल्य किंवा भान नसते व ५ % लोक काही न करता इतरांच्या, कुटुंबाच्या जीवावर जगत असतात. एखादा भाग मागे आसतो तेव्हा हे प्रमाण अधिकच असंतुलित होते. बदल व्हावा असे वाटणारे २० % पैकी १५ % इतर विकास झालेल्या भागात पलायन करतात व या पैकी राहिलेले ५ % स्थानिकांची साथ मिळत नाही म्हणून हताश असतात व पलायन करण्याच्या मानसिकतेत असतात . म्हणून आशा भागात ९५ % लोक हे नॉन प्रोडक्टीव म्हणजे अनुत्पादक आयुष्य जगत असतात. यावरून आपल्याला मराठवाडा , विदर्भातील भूमिपुत्र पण  गावाकडे फक्त जुने घर व ह्लाखातील चुलत मालत नातेवाईक असलेले अनेक आंत्रप्रीनर जगभर विखुरलेले दिसतात. अशांनी कृतज्ञता म्हणून जन्म झाला व मुळे आहेत अशा  त्यांच्या भागात संस्था , उद्योग सुरु केले तरी तिथे नोकरीला व मोठ्या हुद्द्यावर बाहेरचीच मंडळी दिसतात. म्हणजे आपल्या भागाचा विकास हा मुळात प्रत्येक नागरीकाच्या प्रमाणिक मेहनत व कष्ट करण्याची क्षमता, उद्योजकता आणि आपल्या कामाशी प्रमाणिक राहून देत असलेल्या सेवेत दर्जा व सातत्यातून येते. स्वतः चे कर्तव्य बजावत असताना आपल्या सोबत इतर दर्जेदार सेवा ही आपल्या भागात टिकल्या पाहिजे व त्यास आपण मदतीचा हात दिला पाहिजे , आपल्या कृत्यातून उभ्या राहत असलेल्या प्रगती पूरक गोष्टींचे नुकसान होता कामा नये ही भावना निर्माण होणे ही पुढची पायरी . ही भावना जातीच्या अस्मितेवर दिसते व आपल्या जातीचा म्हणून तो आपल्याला आपलासा वाटतो पण आपण अशी अस्मिता भूभागाच्या बाबतीत मात्र दिसत नाही. ही भावना प्र राज्यात, प्रदेशात येते पण सोबत राहत असताना मात्र येत नाही.  आपला भूभाग व त्याची प्रगती हीच आपली जात हे मानणारा एक समूह निर्माण व्हायाल हवा.

                 प्रश्न उभा राहतो की या भावनेची शिकवण कोण देईल व ती कोण जोपासेल. आपल्या प्रगती साठी पलायन करणे हा आपला अधिकार आहे पण बदल घडवण्याची क्षमता असणार्या २० टक्क्यां पैकी काहींना पलायन न करता  हा विडा उचलावा लागेल. सतत मना वर बिंबवून या २० टक्क्यांचे प्रमाण आपल्या भागात कसे वाढेल यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावे लागतील. It is very difficult to be good when goodness is not in demand असा एक इंग्रजी वाक्प्रचार आहे. काही करू न इच्छिणाऱ्या गावा गावातील समूहांनी काही करायचे नसेल तरी ठीक . पण किमान आपल्या भागातील ही चांगली  उर्जा जगू दिली तरी त्यांचे आयुष्य बदलू शकते हे समजून घ्यायला हवे. एखाद्या घरात कोणी गुणी मुलगा / मुलगी जन्माला येते तेव्हा त्या घराला फक्त त्या व्यक्ती मागे उभे राहण्याची गरज असते, मग त्या कुटुंबाची प्रगती अपोआप होते. भूभागाच्या विकासाचे ही तसेच असते. 

                        विकासाच्या या प्रक्रियेत अजून एक सवय मागास भागातील नागरिकांना लावून घ्यायला हवी. या प्रक्रियेत कुठेही स्थानिक राजकीय नेत्यांची मध्यस्थी एकमेकांना मध्ये नको व प्रगतीची वाट आपल्याला थेट इक्का दुक्का अशी सोबत हातात हात घेऊन गाठायची आहे हे मनाशी पक्के करायला हवे . याचे कारण सध्याचे राजकारण हे विकसनशील नसून सत्ताकेंद्रित व निवडणुकी पुरते मर्यादित आहे. म्हणून उलट रेंगाळत राहिलेला विकास व मागासलेपण हे बहुतांश नेत्यांच्या राजकारणाचे साधन असल्याने त्यांना हवेहवेसे आहे. म्हणून त्यांचे उदात्तीकरण थांबवणे हा ही विकासाच्या प्रक्रियेतील एक महत्वाचा टप्पा आहे. जितका भाग मागास तितके स्थानिक नेत्यांचे उदात्तीकरण जास्त हे निश्चित असते. एकदा ते थांबले कि या नेत्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव व आपल्या भागासाठी विकासासाठी जनरेटा निर्माण करणे आवश्यक आहे. विकासाच्या प्रक्रियेत राजकीय नेतृत्वाची भूमिका काय ? विकासासाठी रस्ते , वीज , पाणी , आरोग्य या पूर्व अटी पूर्ण करणे एवढे त्यांनी केले तरी पुरे. पश्मिम महाराष्ट्र व मराठवाड्याला राज्य व केंद्राच्या राजकारणात समान संधी मिळाली आहे. किंबहुना केंद्रात मराठवाड्याला कांकणभर जास्त वाटा मिळाला असे म्हणण्यास हरकत नाही. पण पश्चिम महराष्ट्रात जनतेने नेत्यांकडून विकास प्रकल्प , धरणे , उद्योग , रस्ते हे सगळे काम करवून घेतले. लोकां मधून तसा दबाव असल्याने नेत्यांनी हे ओळखून विकास घडवला. मागासलेपण गेले तर आपल्या अस्तित्वाचे काय हे असुरक्षितता त्यांच्या मनात आली नाही हा या नेत्यांचा मोठेपणा.  जेव्हा जेव्हा राजकीय अस्थिरता निर्माण होते तेव्हा तेव्हा मागास, शोषित , बहुजन आशा सर्व दुर्लक्षित घटकांना उसळी मारण्याची संधी असते.  स्थानिक नागरिकांची मानसिकता , त्या भागातील काही करण्याची क्षमता असलेल्यांनी आपल्या भूभागाचे दातृत्व हून स्वीकारणे व राजकीय सत्तेवर दबाव आणून त्यांना या प्रक्रियेचे उत्प्रेरक होण्यास भाग पडण्यासाठी संघटीत होण्याची मराठवाडा , विदर्भ, कोकण , उत्तर महराष्ट्राला या राजकीय अस्थैर्याच्या निमित्ताने उत्तम संधी चालून आली आहे. या भूभागाने  या संधीचे सोने करायला हवे.

डॉ . अमोल अन्नदाते
dramolaannadate@gmail.com
www.amolannadate.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *