झटके मेंदूतील शॉर्टसर्किट

झटके मेंदूतील शॉर्टसर्किट झटक्यांना आकडी, फिट, फेफरे अशा अनेक नावांनी संबोधले जाते. वैद्यकीय भाषेत याला इपिलेप्सी म्हणतात. झटके येत असण्याच्या प्रक्रियेला सीजर किंवा कन्वर्जनअसे म्हणतात.

1) झटके म्हणजे काय?
झटके म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे, तर मेंदूमध्ये होणारे शॉर्टसर्किट. हे शॉर्टसर्किट कसे होते आणि का होते हे जाणून घेण्यासाठी मेंदू कसा काम करतो हे समजून घ्यायला हवे. 
2) झटके का येतात?
शॉर्टसर्किटसाठी तीन घटक महत्त्वाचे असतात, तसेच झटके येण्यासाठी तीन घटक शोधावे लागतात. हे तीन घटक म्हणजे बिघाड झालेले बटन, वायर किंवा लूज कनेक्शन. म्हणजे मेंदूतून सिग्नल तयार होतात त्या भागात बिघाड होतो किंवा सिग्नल वाहून नेणाऱ्या नसा खराब असू शकतात किंवा हे मेंदूतील सूक्ष्म पेशींच्या पातळीवरील शॉर्टसर्किट असू शकते, जे तपासण्यांमध्ये लक्षात येत नाही.
3) झटके आनुवंशिक असतात का?
झटके शक्यतो आनुवंशिक नसतात व एखाद्या मुलाला झटके येत असल्यास पुढे त्याच्या पाल्यांनाही झटके येतीलच असे नाही. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

नॉर्मल मेंदू कसा काम करतो? 
मेंदू हा शरीराचा रिमोट कंट्रोल असतो. टीव्ही रिमोट कंट्रोलने चालतो, तसे शरीर मेंदूच्या रिमोट कंट्रोलने चालते. रिमोट कंट्रोलप्रमाणेच मेंदूमध्ये बटन व वायर्स असतात. मेंदूचा डावा व उजवा असे दोन भाग असतात. मेंदूचा उजवा भाग डाव्या भागावर व डावा भाग उजव्या भागावर नियंत्रण ठेवतो. आपल्याला डावा हात हलवायचा असल्यास मेंदूच्या उजव्या भागात हाताचे बटन असते, तिथे एक सिग्नल तयार होतो. हात उचलण्याची मनात आलेली इच्छा किंवा विचार हा सिग्नल मेंदूत तयार करते. हा सिग्नल शरीरातील वायरने म्हणजे नसांनी (नर्व्ह) हातापर्यंत येतो आणि हात हलतो. आपल्या नकळत, इच्छेशिवाय आपला हात, पाय किंवा शरीराचा कुठलाही भाग हलत असेल, याचा अर्थ आपल्या नकळत मेंदूमध्ये त्या जागी सिग्नल तयार झाला, म्हणजे तिथे शॉर्टसर्किट झाले आणि हात, पाय किंवा शरीराचा भाग हलायला लागला. यालाच झटके असे म्हणतात.

 बिघाड शोधण्यासाठीच्या तपासण्या
हृदयाच्या लहरी तपासण्यासाठी ईसीजी केला जातो, तसेच मेंदूतून निघणाऱ्या लहरी तपासण्यासाठी ईईजी केला जातो. झटके किंवा इपिलेप्सीच्या निदानासाठी ईईजी म्हणजे मेंदूतून निघणारे सिग्नल जास्त प्रमाणात निघत आहेत का, हे पाहण्यासाठी केले जाते. दरवेळी इपिलेप्सीचे निदान करताना ईईजीमध्ये बिघाड दिसून येईलच असे नाही. तसेच, एमआरआय करून मेंदूमध्ये झटके निर्माण करणारे इतर कुठले कारण आहे का, हे पाहण्यासाठी एमआरआय केला जातो. काही कारण निघाल्यास त्या त्या कारणाचे उपचार करावे लागतात. ‘ईईजी’प्रमाणेच एमआरआय नॉर्मल आला, तरी कुठल्याही करणाशिवाय येणारे झटके, असे निदान करून उपचार केले जातात. 

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *