जाती – धर्माच्या साखळदंडात बंदिस्त झाली लोकशाही – डॉ. अमोल अन्नदाते

दैनिक दिव्य मराठी रसिक पुरवणी

जाती – धर्माच्या साखळदंडात बंदिस्त झाली लोकशाही

डॉ. अमोल अन्नदाते

आजच्या काळात आपले राजकारण , समाजकारण , निवडणुका , लोकशाही , चळवळी या सगळ्यांना स्पर्श करणारा मुख्य आणि समान सर्वात प्रभावशाली मुद्द्दा म्हंटला तर तो जात आणि धर्म ठरला आहे. देशाच्या भवितव्याला दिशा देणाऱ्या यापैकी अशी एक ही गोष्ट नाही ज्यात जात / धर्म निर्ण्यायक ठरतात. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांना मध्ये शिरस्थ नेत्यांपासून ते सर्व सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत एकही जाहीर भाषण असे नव्हते त्यात जात / धर्माचा संबंध नव्हता. यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शिक्षणाचा स्तर वाढून ही सर्व सामान्य नागरिकापासून ते संघर्ष संपलेल्या व समृद्धीच्या टोकावर असलेला कोणीही जातीच्या जोखडातून बाहेर पडू पाहताना दिसत नाही.
लोकशाही मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून देश जातीच्या मानसिकतेत गेला आणि त्याच्या मनाला, मेंदूला मी किती संख्य – बहुसंख्य कि अल्पसंख्यांक , माझा टक्का किती या वैचारिक सवयीत घट्ट बांधला गेला. याला कारण ही तसेच होते ते म्हणजे स्वातंत्र्याच्या आनंदाला धर्माच्या आधारावर फाळणीच्या निराशेची किनार होती. म्हणून निवडणुकांमध्ये आपल्या जातीची धर्माची मते याकडे लोक संपत्ती, भांडवल , ‘ बार्गेनिंग पावर’ म्हणून पाहू लागले. आधी हे राजकारण केवळ धर्मावर आधारित होत. पण केवळ धर्माचे भांडवल हे लोकांना मतांच्या गठ्ठ्यात बांधण्यास पुरेसे नाही हे लक्षात आले तेव्हा त्यांच्यात जातींची जाणीव पेरली गेली. त्यातून एका धर्माच्या वृक्षाला असलेल्या जातीच्या फांद्यांना अधिक मजबूत केले गेले. त्याच फांद्यांना लटकून आज अनेक घराणे व नेत्यांचे राजकारण पिढ्यांपिढ्या फळले. यात बहुसंख्य हे नेहमी फाजील अति आत्मविश्वासात तर अल्पसंख्यांक हे न्युनगंडात व असुरक्षिततेत ढकलले गेले. पण जातीच्या आधारावर राजकारणात एका निरीक्षणाची कोणीही नोंद घेतलेली नाही. बहुसंख्य जातींची मते ज्या ज्या जातींनी त्यांच्या मतांना जातीच्या निकषावर स्वजातीय नेत्यांच्या मागे वर्षेनुवर्षे उभी केली त्या सर्व जाती आज स्वतःच्या अस्तित्वासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत, आमच्याच नेत्यांनी कसे आम्हाला फसवले याच्या कहाण्या सांगत आहेत व आपल्या पुढच्या पिढीच्या काळजीत आहेत. यात महाराष्ट्रातील मराठा , गुजरात मधील पाटीदार, उत्तर प्रदेश मधील यादव , राजस्थान मधील गुर्जर , हरयाणा मधील जाट अशी राज्या राज्यातील किती तरी उदाहरणे देता येतील . महाराष्ट्रात आजवर १३ मराठा मुख्यमंत्री झाले पण तरी मराठा समाजाचा विकास झाला नाही. राष्ट्रपतीपदा पासून पंतप्रधान पदापर्यंत कितीतरी जातींचे लोक विराजमान झाले पण म्हणून त्या जातींसाठी काही विकासाचा चमत्कार झाला का. ज्या लोकशाहीचा आणि घटनेचा आत्मा समता आहे आणि देशातील घटना प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देणारी आहे त्या देशात एका जातीच्या विकासासाठी त्या जातीची व्यक्ती सत्तास्थानी बसली पाहिजे हा विचारच किती नैतिक दिवाळखोरी दर्शवणारा आहे. देश खऱ्या अर्थाने श्रीमंत करायचा असेल तर जगभर विकासाचे युग सुरु झाले आहे या जाणीवेतून जातीची ही साखळदंड स्वतःच तोडावे लागतील. आपल्या जातीची अस्मिता जरुरू जपावी पण तो मतदानाचा निकष बनवल्यास शिक्षणातून विकासाकडे जाण्याचा जो मंत्र आज अनेक विकसित देशांनी अंगिकारला तो आपल्या देशात कधी आणि कसा निनादणार ?
गेल्या एक हजार वर्षांचा इतिहास आपण तपासून पहिला तर जात धर्माच्या आधारावर ज्या ज्या देशात , खंडात राजकारण चालले ते देश विकासापासून वंचित राहिले व लयाला गेले. पंधराव्या शतका मध्ये तुर्कांनी सतत दहा वेळा युरोप सोबत युध्द केले आणि तुर्कस्तान जिंकले आणि आताचे युरोप व तेव्हाचे रोम बुडाले. तेव्हा एक विचार पुढे आला कि रोम राज्यात वेटीकन सिटी येथे पोप हा देवाचा प्रतिनिधी राहत असून व त्याच्या म्हणण्या प्रमाणे सगळे चालले असताना आपण का हरलो ? त्या नंतर रोमने असे ठरवले कि आता पर्यंतचे जात – धर्माचे युग सोडून आपण विज्ञानाकडे वळू या. तिथून युरोपचे नशीब पालटले व सर्व नवे शोध तिथे लागले. एडिसन , गॅलीलीओ हे सगळे त्या नंतरचे. जात धर्माच्या जोखडाला बाजूला टाकल्याने युरोप प्रगतीशील झाला . अनेक कट्टर पंथी देशांना धर्म एके धर्म हा मंत्र बाजूला ठेवून विश्वासाठी कवाडे उघडी केली तेव्हा ती कित्येक वर्षे पुढे गेली. आज एकविसाव्या शतकात आपण जात – धर्म एवढाच महत्वाचा निकष समजून बसत आहोत तर आपण स्वतःची व आपल्या लोकशाहीची मोठी फसवणूक करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक विचार दिला – अहत तंजावर तहत पेशावर – अवघा मुलुख आपला. त्याच धर्तीवर आज जग बाउंड्रीलेस वर्ल्ड म्हणजे सीमाविरहित जग हा विचार पुढे येतो आहे. असे होत असताना आम्ही लोकशाही मध्ये पंचाहत्तर वर्षे उलटून जात – धर्मावर मतदान करत असू तर विकसाच्या मार्गावर कितीतरी पुढे असलेल्या जगाशी आपण कसे जुळवून घेणार ?

डॉ.अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *