‘नीट’ परिपूर्ण आहे का ? – डॉ. अमोल अन्नदाते

दैनिक महाराष्ट्र टाइम्स

‘नीट’ परिपूर्ण आहे का ?

_ डॉ. अमोल अन्नदाते

एमसीक्यू म्हणजे बहुपर्यायी प्रश्न सोडवण्याच्या १९९९ सालापासून सुरु झालेला परीक्षा पद्धतीला आता दोन तप उलटून गेली आहेत. या वर्षी निकाल लागल्यापासून विद्यार्थी – पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे . वैद्यकीय क्षेत्रासाठी व प्रवेशा साठी आवश्यक असलेली कौशल्ये व नीट परीक्षेत ज्या गुणांची चाचणी होते याची सांगड घालण्याचा प्रयत्न केल्यास परीक्षा पद्धत म्हणून नीट परीक्षा वैद्यकीय प्रवेशा साठी संयुक्तिक आहे का ? हा विचार करण्याची वेळ आली आहे. जगभर वैद्यकीय प्रवेशाचे निकष काय आहेत व परीक्षा पद्धत व त्या देशातील डॉक्टरांचा गुणात्मक दर्जा यांचा अभ्यास ही या निमित्ताने होण्याची गरज आहे.


नीट परीक्षा पद्धतीचा अभ्यास केल्यास लक्षात येते कि एक चांगला डॉक्टर बनण्यासाठी आवश्यक गोष्टी आणि नीट मधील यश याचा अर्थाअर्थी संबंध नाही. नीट परीक्षेत २०० मिनिटात १८० प्रश्न सोडवण्याचे आव्हान असते . म्हणजे एक प्रश्न १ मिनिट ९ सेकंदात सोडवायचा असतो. त्यातही प्रश्नाचे उत्तर मार्क करण्यास ९ सेकंदांचा वेळ सोडला तर एका प्रश्नाला १ मिनिट या प्रमाणे अत्यंत वेगाने सर्व विषयांचे प्रश्न सोडवायचे असतात. त्यातही यातील काही प्रश्न हे गणिती पद्धतीने ( कॅल्क्युलेशन करून ) उत्तरे शोधण्याची असतात व बहुतांश प्रश्न हे स्मरणशक्ती वर आधारित असतात. म्हणजे नीट मध्ये यश मिळवण्यासाठी पहिली गोष्ट आवश्यक असते तो म्हणजे वेग आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्मरणशक्ती. या सर्व पद्धतीत विचार करणे , व्यक्त होणे व भावनिक स्तर तपासणे या गोष्टींचा कुठेही अंतर्भाव नाही. वैद्यकीय क्षेत्र मेहनत , संयमासह विचार करून व्यक्त होणायचे व एकच कौशल्य परत परत वापरण्याचे क्षेत्र आहे. नीट परीक्षा मात्र मेहनत हा निकष सोडला तर या सर्व गोष्टींपासून विद्यार्थ्यांना लांब नेणारी गोष्ट आहे. रुग्ण तपासणी करताना वेग हा खूप कमी वेळा व शांतपणे विचार करून , वेळ घेऊन विश्लेषण करण्याची बहुतांश वेळा गरज असते . म्हणून वैद्यकीय प्रवेश देण्यासाठी आवश्यक निकष व तपासले जाणारे निकष यात नीट ही मोठी तफावत निर्माण करणारी परीक्षा आहे.


अशी नसावी तर वैद्यकीय प्रवेशासाठी ची परीक्षा कशी असावी ? वैद्यकीय प्रवेशा ला परीक्षा घेताना सर्वात मोठे आव्हान आहे या परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांची संख्या व कमी जागा. या वर्षी १ लाख जागांसाठी २३ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले व येणाऱ्या काळात ही संख्या वाढतच जाणार आहे. सर्व देशासाठी एक समान परीक्षा आवश्यक आहे हे मान्य असले तरी ही परीक्षा २०० मिनिटात व फक्त बहु पर्यायी प्रश्न या एकाच निकषावर आधारित असण्याचा हट्ट सोडायला हवा. सर्वात महत्वाचे या परीक्षेत बहु पर्यायी प्रश्नांसोबत काही भाग विचार करून उत्तरे लिहिण्याचा असायला हवा . तसेच काही भाग हा मुलांचा भावनिक बुध्यांक तपासण्या वर असायला हवा. नीट मुळे अकरावी, बारावीचे महाविद्यालयीन वर्ग पूर्ण निकालात निघाले आहेत. तसेच नीट मुळे अकरावी , बारावी ला प्रात्यक्षिक करताना एक ही विद्यार्थी आता दिसत नाही. मुळात वैद्यकीय क्षेत्र हे प्रात्यक्षिकांशी निगडीत असल्याने हा बदल घातक आहे. आता बर्याच कोचिंग क्लासेसने स्वतःचे कॉलेज उघडून तुम्ही फक्त नीट साठी तीन विषयांचा तेवढा अभ्यास करा , आम्ही अकरावी , बारावीचे काय ते बघून घेतो अशा योजना सुरु केल्या आहेत. बरेच विद्यार्थी नावासाठी एखाद्या महविद्यालयात प्रवेश घेतात व मोठ्या शहरातील क्लासेस मध्ये कोचिंग घेतात. यासाठी अकरावी व बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे महत्व परत पुनुरुज्जीवीत करून त्याचे मार्क ही प्रवेशा साठी गृहीत धरले जाणे गरजेचे आहे. एवढ्या मोठ्या विद्यार्थी संख्ये साठी यात समानता कशी आणता येईल हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो . त्या साठी तंत्रज्ञान , कृत्रिम बुद्धीमत्ता व व्हिडीओ द्वारे चाचणी असे किती तरी पर्याय असू शकतात. दीर्घ उत्तरे तपासण्यास एकेकाळी प्रवास व मनुष्यबळाचा तुटवडा होता. आता मात्र एमबीबीएस परीक्षेचे पेपर ही परीक्षक संगणकावर सहज तपासतात व कुठला परीक्षक कोणाचे पेपर तपासतो आहे हे कोणाला ही माहिती नसते. त्यामुळे तंत्र ज्ञान एवढे विकसित झाले असताना परीक्षा पद्धत बदलली तरी कमी वेळेत जास्त विद्यार्थांचे मुल्यांकन शक्य आहे.
सध्या वापरात असलेल्या बहु पर्यायी प्रश्नांमध्ये ही त्यांचा दर्जा समाधानकारक नाही. म्हणजे किमान काही प्रश्न तरी तर्क व विचार शक्ती (लोजिकल रिझनिंग ) तपासणारे असायला हवे. प्रश्नांमध्ये दोन प्रकार असतात – काही प्रश्न हे पास व नापास होणार्या विद्यार्थ्यांना वेगळे काढणारे असले पाहिजे व काही प्रश्न हे चांगला, हुशार व अत्यंत हुशार विद्यार्थी यांच्या मध्ये चाळणी लावणारे असले पाहिजे. हे बहु पर्यायी प्रश्नांचे विज्ञान समजून , त्याचे अभ्यास करून प्रश्न पत्रिका बनवण्यावर तज्ञांचा समूह काही अभ्यास करतोय असे दिसत नाही. परदेशातील त्यातच अमेरिका व ब्रिटन मधील वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षांचे प्रश्न असे विचारपूर्वक विचारलेले असतात.


नीट परीक्षा अनेक वेळा देऊन प्रयत्न करणारे विद्यार्थी ही बरेच असतात. त्यातून ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाते. यातून विद्यार्थी व पालक हताश होतात व चांगले मार्क मिळवून एमबीबीएस मध्येच प्रवेश मिळाला तर सर्व आलबेल होईल हा आभास व सामाजिक दबाव असतो. जर ४०० – ४५० च्या पुढे मार्क असतील तरच मार्कांमध्ये दुसर्या वर्षी बदल होतो. त्या खाली मार्क असल्यास आहे त्या परिस्थितीशी जुळवून पालक व विद्यार्थ्यांनी पुढे जावे.
जग भरातील वैद्यकीय प्रवेशांची पद्धत बघितल्यास कुठेही कमी वेळेत बहु पर्यायी प्रश्न सोडवून प्रवेश देण्याची पद्धत नाही. मुळात फक्त एकाच परीक्षेच्या आधारावर प्रवेश देण्याची पद्धत ही कुठल्या ही विकसित देशात नाही . अमेरिकेत वैद्यकीय प्रवेश देताना मुलाची सर्वांगीण व्यक्तिमत्व चाचणी केली जाते. यात शाळेतील ग्रेड्स , अभ्यास सोडून इतर उपक्रम , प्रवेश परीक्षा व वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत विचारावर निबंध असे निकष असतात. ब्रिटन मध्ये दहावी नंतर विद्यार्थी २ वर्षांचा वैद्यकीय अभ्यासक्रमाशी निगडीत नेमके अभ्यासक्रम व प्रशिक्षण घेतात व त्यानंतर एका परीक्षेतून त्यांना विविध विद्यापीठात प्रवेश मिळतो. या प्रवेश प्रक्रिया त्या त्या देशातील आर्थिक व सामाजिक परिस्थिती प्रमाणे योजलेल्या आहेत. भारतातील परीक्षा इथल्या गरजा गृहीत धरून बनवल्या जाऊ शकतात.
नीटच्या आधी व नंतर ग्रामीण भागातील व आर्थिक दृष्ट्या मागास वर्गातून येणाऱ्या विद्यार्थ्यां मध्ये काही फरक पडला आहे का ? यावर अजून कुठला ही शोध अभ्यास व विदा ( data ) उपलब्ध नाही. हे काम नॅशनल टेस्टिंग एजन्सीचेच आहे. कारण वैद्यकीय क्षेत्रा सारख्या उदात्त क्षेत्रात हा समतोल राखला जाणे देशाच्या शारीरकच नव्हे तर सामाजिक आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे. याचे कारण नीटचे स्वरूप हे मोठ्या शहरात जाऊन महागडे क्लास लावण्यास भाग पाडणारे आहे.


जर स्पर्धा व काठीण्य पातळीचा विचार केल्यास भारतीय प्रशासकीय सेवा व वैद्यकीय प्रवेश या एकाच पातळीची क्षेत्रे आहेत. पण तुलनेने युपीएससी ची परीक्षा ही प्रिलीम्स ( पूर्व परीक्षा ) , मेन्स ( मुख्य परीक्षा ) व वयक्तिक मुलाखत अशा तीन टप्प्यात होणारी व दर टप्या गणिक चांगल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य चाळणी लावणारी परीक्षा आहे. अजून ही जिल्हा परिषद शाळेत शिकलेला विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे स्वप्न बघू शकतो. नीटचे मात्र तसे नाही.
वैद्यकीय क्षेत्र ही कला आहे कि विज्ञान हा युगानुयुगे चालत आलेला वाद आहे. पण या क्षेत्रात विज्ञान हे बाप असले तर कला ही आई आहे व तर्कसंगत विचार ( rationality ) , कौशल्य व उत्कृष्टता ही त्याची अपत्ये आहेत. विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश परीक्षा देतो तेव्हा पूर्ण देशच परीक्षा देत असतो कारण प्रत्येकाच्या जगण्या मरण्याशी ही परीक्षा निगडीत आहे. म्हणून मानवी अस्तित्व जितके गांभीर्याने घेतो तितकी ही परीक्षा पद्धत गांभीर्याने घेऊन तिची पुनर्रचना तातडीने आवश्यक आहे. तुम्हाला उत्तरे काय मिळतात त्या पेक्षा तुम्ही प्रश्न काय विचारता हे महत्वाचे असते.

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *