विखार नको, विवेक वाढवू… – डॉ. अमोल अन्नदाते

दै. दिव्य मराठी रसिक

विखार नको, विवेक वाढवू…

डॉ. अमोल अन्नदाते

         काळ हे मोठे भ्रम निर्माण करणारे व त्याच्या पोटात काय दडलेय याचा थांग लागू न देणारे एक मिथक असते. ब्रम्हांडातील सार्वकालिक आभास हा स्वतः काळच असतो. माणसाचे जसे वय वाढते तसे त्याचे शहाणपणा वाढीस लागणे अपेक्षित असते. अगदी त्याप्रमाणे काळ पुढे सरकतो तसे तो निर्माण करणारा हा भ्रम ओळखून तो डि-कोड करून त्यातून पुढे येणारी वेळ कशी काल सुसंगत व जगण्यास सुसह्य व्हावी यासाठी एक सार्वत्रिक शहाणपण निर्माण होणे अपेक्षित असते. ही जाणीव ठेवूनच एखादे वर्ष संपत असताना मागे गेलेल्या रस्त्यावर एक नजर टाकून पुढच्या वाटचालीसाठी आपल्या गती आणि मती ला योग्य दिशा देण्याचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर . 
    सरते वर्ष भारत व जगाच्या दृष्टीने अनेक अर्थांनी पारखण्या जोगे वर्ष होते. २०२४ चा जप तर गेली काही वर्षे सुरूच आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे येत्या वर्षात भारत व अमेरिका या दोन्ही सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक गेमचेंजर टप्पा येतो जो त्याचे पुढील काही दशकांचे भवितव्य ठरते. २०२४ ची पहाट फटफटत असताना एवढी जाणीव प्रत्येकाला होणे हीच पहाट सोनेर असण्याची शाश्वती देईल. 
    २०२३ साली चांद्रयान – ३ च्या माध्यमातून भारत चंद्राच्या दक्षिण धृवार पोहोचणारा पहिला देश ठरला. ही प्रत्येक भारतीयासाठी गौरवस्पद गोष्ट असली तरी पियुष मिश्रांच्या या नज्मची आठवण करून देणारी आहे. एक बगल मे चांद होगा, एक बगल मे रोटीयाँ, एक बगल मे नींद होगी, एक बगल मे लोरियाँ,हम चाँद पे रोटी की चादर डाल कर सो जाएँगे. हे आठवण्याचे कारण म्हणजे - भारताचा भूक निर्देशांक २९.१ व जगातिक क्रमवारी १११ आहे जी गंभीर स्वरूपाची समजली जाते . देशात २२५ दश लक्ष लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही व ४० कोटी लोक रात्री उपाशी झोपतात. कोरोनाच्या जागतिक संकटानंतर जागतिक अर्थनीतीला रशिया – युक्रेन व ईजराईल - हमास युद्धाचे जोरदार तडाखे बसले. जगाला युद्धाच्या झळा जाणवत असताना ही भारताचे सकल रष्ट्रीय उत्पन्नात २०२३ साली ७.६ % वाढ होऊन ती आज जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थ व्यवस्था झाली आहे. पण हे आकडे साजरीकरणासाठी पुरेसे नाहीत. भांडवलशाही नव्या युगाच्या हातात हात घालून येते तेव्हा तिला वाढ ही कुठलीही आणि कशाची ही किंमत मोजून हवी असते. ही भांडवलशाही फक्त नव भांडवलशाहीच नव्हे तर त्याचे अजून क्रूर स्वरूप घेऊन २०२४ मध्ये पुढे येऊ पाहते आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात मुल होऊ न देण्यासाठी विशेष भत्ता व महामार्ग बनवताना १७ दिवस अडकलेल्या ४१ कामगारांच्या करुण हतबल आयुष्य ही या समृद्ध अर्थ व्यवस्थेची काळी बाजू २०२४ चे नियोजन करताना विसरता येणार नाही. अर्थव्यवस्थेचा वेग वाढवताना तो प्रगतीच्या वाहनात बसू न शकणार्यांना चिरडणारा असेल व मानवी मूल्यांच्या चिंधड्या उडवणारा असेल तर समृद्धीचे भकास कुरूप चेहरा समोर येऊ नये याचे भान २०२४ साठी तत्पर होताना ठेवावे लागेल.  

२०२३ मध्ये जगात व देशात एक सार्वत्रिक भावना वाहताना दिसते ती म्हणजे नव राष्ट्रवादाची . हा नव या साठी कारण यात फक्त राष्ट्राच्या अस्मिते सोबत फक्त मी आणि मीच आणि माझेच काय ते खरे हा अट्टहास अधिक आहे. पण मात्र मी राष्ट्रासाठी नेमके काय करू शकतो याचा लावलेश दिसत नाही. काझी साब दुबले क्यो तो बोले शहर का अंदेशा अशी एक उर्दू म्हण आहे. आपल्या शहराचे काय होणार म्हणून एका जागी बसून असलेले काझी साहेब अस्थिपंजर होत आहेत अशी अनेक देश वासियांची स्थिती दिसते आहे. तुम्ही स्वतः प्रगत झालात तर देश आपोआप प्रगती करेल . म्हणून फुकाच्या अस्मिता सोडून आधी स्व वर केंद्रित होण्याची गरज २०२४ सुरू होताना जाणवते. २०२३ मध्ये आपण व आपले कुटुंब सर्व आघाड्यांवर किती पुढे आलो याची गोळा बेरीज व २०२४ मध्ये किती मजल मारायची आहे याचे नियोजन जरूर करा . हम चले ना चले देश चल पडा है असे पंतप्रधान म्हणतात . याचा अर्थ आता काही केल्या देशाची प्रगती थांबणार नाही, असा आहे. आपण नागरिक म्हणुन देशासाठी काही करायचे नाही. असा तो अर्थातच नाही.

कला , क्रीडा , सांस्कृतिक आघाडी वर २०२३ हे वर्ष फारसे आशादायी ठरले नाही. ऑलम्पिक पदे घेणाऱ्या महिला कुस्तीपटू लैंगिक छळासाठी कित्येक दिवस रस्त्यावर आंदोलनासाठी बसून होत्या. जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देशातून बोटा वर मोजण्या इतकी ऑलम्पिक पदके मिळत नाहीत यात कशी सुधारणा होईल हे २०२४ चे उद्दिष्ट असायला हवे . लेखक , कवी व माध्यमांच्या स्वातंत्र्यावर आलेली टाच हे २०२३ मधील त्रुटी २०२४ मध्ये दूर व्हाव्या .
२०२३ मध्ये अजून तीन लक्षवेधी वास्तू पूर्ण होताना आपण पहिल्या. वाराणसीचे जगातील सर्वाधिक क्षमतेचे ध्यान मंदिर स्वरवेद मंदिर, सुरत येथील जगातील सर्वात मोठे उद्योग कार्यालय डायमंड ब्रोज व नवे संसद भवन . २०२४ ची सुरुवात अयोध्येच्या राम मंदिर खुले होऊन होणार आहे. याचा अर्थ आपण अध्यात्मिक, धार्मिक, उद्योग व लोकशाही या चार आघाड्यांवर जगातील सर्वात मोठ्या वास्तू बांधून नेतृत्व करू पहात आहोत हे कौतुकास्पद आहे. पण याला जोडून येणारी आव्हाने समजून २०२४ साठी आपल्याला सज्ज व्हायला हवे. नव्या संसद भवनात चार बेरोजगार तरुणांनी सुरक्षा कवच भेदून देशाच्या सर्वात महत्वाच्या वास्तू व लोकशाहीच्या सर्व भौमत्वावर प्रश्न चिन्ह निर्माण केले ते ही हेच २०२३ चे वर्ष. एकीकडे समृद्धी साठी कंबर कसत असताना बेरोजगार तरुण हताश होऊन माथेफिरू व विकृती कडे झुकत चालला आहे हा धडा २०२४ साठी खूप महत्वाचा आहे. म्हणून सर्वात मोठे मंदिर जसे धर्म रक्षण करील तसे जगातील सर्वात दर्जेदार व फक्त शिक्षणच नव्हे तर कौशल्य देणारे शिक्षण देणारे सर्वात मोठे विद्यापीठ ही देशात व्हायला हवे तरच विवेक रक्षण होईल ही भीष्मप्रतिज्ञा २०२४ साठी करणे आवश्यक आहे. उद्योगाच्या प्रगतीचे मानक हे फक्त सकल राष्ट्रीय उत्पन्न नसते तर सकल राष्ट्रीय आनंद निर्देशांकही आर्थिक प्रगतीचे मानक असतो. आरोग्य व त्यातच मानसिक आरोग्याच्या आघाडीवर बरेचसे करायचे राहून गेले असताना २०२४ हे वर्ष याला प्राधान्य देणारे वर्ष म्हणून इतिहासात नोंदेवले जायला हवे.
जशी प्रत्येक दिवसात आपल्या प्रत्येकासाठी एक भावना व्यापून राहते. तशीच एक भावना देशात ही एखाद्या वर्षात दाटून आलेली असते. अनेक हर्षवायू निर्माण करण्याजोग्या गोष्टी घडल्या असल्या तरी मणिपूर मध्ये एका स्त्रीची नग्न धिंड ही हिंसा , द्वेष व हतबलते चे गालबोट २०२३ च्या आनंदाला लावणारे ठरले. प्रत्येक व्यक्तीचे म्हणून जसे एक टेम्परामेंट असते तसे ते एका विशिष्ट काळात देशाचे ही असतें. काळाचे ही असते. त्यामुळे हिंसा , द्वेष , उपद्रव , उन्मत्तपणा अशा अनर्थकारी गोष्टीने वर्चस्व गाजवू नये यासाठी पुढच्या काळात प्रत्येकाला सजगपणे प्रयत्न करावे लागतील.
चिदानंद रुपम शिवो हम, शिवो हम असा उपदेश करताना शंकराचार्य आपल्याला तुझ्यातच विशुद्ध चेतनाचा, शिवाचा अंश आहे. असं सांगतात. व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील आपली स्वयंपूर्णता , स्व प्रेरणा आणि स्व नियमातून या अंशाचे अस्तित्व दिसत असतें. त्यामुळे महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशातील प्रत्येकाने या मूल्यांचे महत्त्व ओळखले पाहिजे. ते समजून घेत पावले टाकली तर व्यक्तिगत, कौटुंबिक सामाजिक नि राष्ट्रीय पातळीवर निश्चितपणे यश मिळेल. उंबरठ्याशी आलेले नवे वर्ष साऱ्यांना अशा प्रगतीचे दान, आनंदाचे वाण अन विवेकाचे भान देणारे ठरो, याच शुभेच्छा…!

डॉ. अमोल अन्नदाते
9421516551

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *