प्रश्न मोकळ्या श्वासांचा – डाॅ. अमोल अन्नदाते

प्रश्न मोकळ्या श्वासांचा

डाॅ. अमोल अन्नदाते

जगातील ५० सर्वाधिक वायू प्रदूषण असलेल्या शहरांपैकी ३९ शहरे ही भारतातील असल्याची बातमी वाचली. स्विस फर्म या संस्थेने केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष २०२३ सालच्या मार्च महिन्यात समोर आला. देशातील १३१ शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत. त्यातील सर्वात जास्त शहरे महाराष्ट्रातील आहेत. त्यापैकी १९ शहरे तर अधिकच धोकादायक पातळीच्या प्रदूषणाचा सामना करीत आहेत. या शहरांना नॅशनल क्लीन एअर प्रोग्राममध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. प्रदूषित शहरापैकी बहुतांशी शहरांची लोकसंख्या ८० लाखाहून अधिक आहे. अकोला, अमरावती, संभाजीनगर (औरंगाबाद) , बदलापुर, चंद्रपुर, जळगाव, जालना, कोल्हापुर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, ठाणे, वसई विरार आणि उल्हासनगर ही महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहरे बनली आहेत.आरोग्यावर दुष्परिणाम होणारे इतर बरेच घटक हे दृश्य स्वरूपात आढळतात व त्यावर बरेच संशोधन व चर्चा होते. पण वायू प्रदुषणा हा अनेक आजारांचा धोका निर्माण करणारा व असलेल्या समस्यां वाढवणारा अदृश्य शत्रू असल्याने त्याची थेट दाखल घेतली जात नाही. लसीकरणामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होत असला तरी प्रदुषणा फुफुसांची घसरत चाललेली क्षमता आणि कमी होत चाललेल्या प्रतिकारशक्ती मुळे आरोग्य क्षेत्रातील प्रगतीला धक्का देत सापशिडीच्या खेळा प्रमाणे थेट खाली घेऊन जाण्याचा दंश वायूप्रदूषण करते आहे.
वायू प्रदूषणातून निघणारे कण इतके बारीक असतात की आपल्या श्वसनमार्गातून सहज फुफ्फुसात जाऊ शकतात. ते रासायनिक किंवा केमिकल कणांच्या स्वरूपात असतात. हवेतील PM10 (10 मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी व्यासाचे कण) हे कण घसा आणि नाकातून फुफ्फुसात जाण्यासाठी पुरेसे लहान असतात. एकदा श्वास घेतल्यावर, हे कण हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम करू शकतात. त्यातून रक्त भिसरणावर ही परिणाम करतात व आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. वाहनांचे उत्सर्जन, नैसर्गिक वायू, उत्पादन आणि वीज निर्मितीचे उप-उत्पादने, विशेषत: कोळसा-इंधन ऊर्जा प्रकल्प , कचर्याची व प्लास्टिकची सदोष विल्हेवाट लावतात हवेत मिसळणारे वायू कण, रासायनिक उत्पादनातून येणारे धूर व बांधकामातून निर्माण होणारी धूळ हे मानवनिर्मित वायू प्रदूषणाचे प्राथमिक स्त्रोत आहेत. मानवाच्या बाबतीत बोलायचे झाले तर प्रमुख रोग हे श्वसन मार्गाला आणि फुफ्फुसाला होतात. प्रदूषित शहरात राहणार्यांवर हा परिणाम त्वरित न दिसता मुंगीच्या पावलाने होतो व काही वर्षात याची लक्षणे दिसू लागतात. फुफ्फुसाची क्षमता कमी होणे, रेंगाळणारा खोकला, कर्करोग हे प्रमुख आजार यामुळे होतात, तर, घसा खवखवणे, डोळयांतून पाणी येणे इ. विकार होतात. भारतात वायुप्रदूषण पसरवणाऱ्या सूक्ष्म कणाची पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांपेक्षा खूप जास्त आहे.

 हवेतील प्रदूषण कण शरीराच्या पेशींशी साधर्म्य नसणारे असतात म्हणून शरीर त्यांना प्रतिसाद (फिजिओलॉजीक रिस्पॉन्स) देते. हा प्रतिसाद ॲलर्जीच्या स्वरूपात असतो. गेल्या काही वर्षात शहरी भागात सर्व प्रकारच्या  अलर्जीच्या रुग्णां मागे प्रदूषण हे एक कारण आहे. हे कण फुफ्फुसात जात असल्यामुळे सौम्य दम्याच्या रुग्णांना  तीव्र स्वरूपाचा दमा होतो. सौम्य दमा काळजी घेऊन आटोक्यात राहणारा असतो, तो वायू प्रदूषण कणांची भर पडल्याने साध्या औषधांना दाद देत नाही. शहरी भागात जिथे प्रदूषण जास्त आहे तिथे दम्याचे जीवघेणे  ॲटॅक येण्याचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा जास्त आहे. त्यातच यात दिवाळी व इतर साजरीकरणाच्या सणांदरम्यान फटाक्यांमुळे भार पडते व कमी वेळेत प्रदुषणात विक्रमी वाढ होते.  आधीच्या काळी टीबीसाठी सॅनिटोरियम हा पर्याय होता, तसेच आता शहरी भागातल्या दमा व फुफुसाचे आजार असणार्यांनी  ग्रामीण किंवा कमी प्रदूषणाच्या भागात जाऊन राहणे, हा उपचाराचा अपरिहार्य भाग होतोय की काय, इतपत आता महाराष्ट्रातल्या मेट्रो शहरांतल्या हवेची पातळी आता धोक्याच्या पातळीबाहेर गेली आहे. हिवाळा आणि प्रदूषण हे आरोग्यासाठी  हवामानाचे  एक घातक  समीकरण ठरते.  हिवाळ्यात एअर करंट म्हणजेच हवेचा प्रवाह किंवा हवा पुढे सरकण्याची गती कमी असते. हवेचा थर पृथ्वीच्या जवळून वाहतो, प्रदूषण कण जास्त खाली उतरतात. त्यामुळे फुफुस , त्वचा व डोळे यांचा प्रदूषण कणांशी संपर्क जास्त येतो. खरेतर हिवाळा हा आधी आरोग्यदायी ऋतू समजला जायचा. पण प्रदुषणामुळे आता नेमक्या हिवाळ्यात बऱ्याच आरोग्य समस्या बळावताना दिसतात.

सध्यस्थितीत आहार, जीवनशैली, कमी व्यायाम, प्रथिनांचे प्रमाण कमी असेल तर प्रतिकारशक्ती घसरते आहे. त्यातही कोविडनंतर सौम्य कोविड झालेल्या लोकांचीही फुफ्फुस नाजूक झाली आहेत. काहींना मध्य ते तीव्र स्वरूपाचा कोविड होऊन गेला, त्यांच्या फुफुसांच्या क्षमतेतही काहीसा फरक पडलेला आहे. यात जेव्हा प्रदूषणाची भर पडते तेव्हा प्रतिकारशक्ती अजून खालावते. वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होण्याचे प्रमाण, घसा खवखवणे, टॉन्सिल्सचा त्रास, ॲलर्जीची सर्दी, टॉन्सिल्सचा त्रास, स्वरयंताचा संसर्ग, घशाच्या वरच्या भागातील संसर्ग, फुफ्फुसाचा संसर्ग हे सगळे आजार प्रदुषणामुळे वाढीस लागतात. या सगळ्यात शहरी भागात लहान मुलांमध्ये वारंवार सर्दीखोकला होण्याचे प्रमाण प्रदुषणामुळे वाढले आहे. जे संसर्ग प्रतिजैविकांशिवाय बरी व्हायची त्यांना प्रतिजैविके द्यावी लागतात. तसेच बरे होण्याचा काळ ही प्रदुषणामुळे लांबतो . लहान मुलांमध्ये दमा व त्वचेच्या अॅलर्जी मध्ये वाढ होते. डोळ्यांची ॲलर्जी, डोळे चुरचुरणे या सगळ्यात वाढ होते. नियमित श्वसनाद्वारे होणारी ऑक्सिजनची फुफ्फुसातील मात्रा कमी होऊन थकवा येतो. त्याला क्रॉनिक फटीग सिंड्रोम म्हणजेच दीर्घकालीन थकव्याचा आजार म्हणतात. फुफुसांच्या क्षमतेवर परिणाम झाल्याने शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीवरही अप्रत्यक्ष परिणाम होतो. त्यातून थकवा येणे, काम करावेसे न वाटणे, या सगळ्या गोष्टीतून कार्यक्षमता व उत्पादकतेवर थेट परिणाम होतो.
वायु प्रदुषणामुळे पृथ्वीभोवतीच्या वायुमंडलाची घनता वाढत जाते. सूर्य उगवल्यापासून दहा-अकरापर्यंतच्या कालावधीतली सूर्यप्रकाशाची किरणे व्हिटॅमीन डी, मनःस्थितीचा समतोल राखणे आणि झोपेचं नियमन- नियंत्रण करणे यासाठी आवश्यक असतात. सूर्यकिरणातून मिळणाऱ्या व्हिटॅमिन डी हाडे आणि स्नायूंची बळकटी व रक्तातील साखरेचे नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे संशोधनात अधोरेखित झाले आहे. वायुमंडलाची घनता वाढल्याने, शरीराला कमी प्रमाणात सूर्यकिरणे पोहोचत असल्याने सूर्यप्रकाशाची गुणसत्वे मिळत नाहीत. कमकुवत सूर्यप्रकाशा मुळे हाडांचा ठिसूळपणा, स्नायूंची कमजोरी, रक्तदाब, हृदयरोग यांची वाढ होते . रक्तातील साखरेच्या नियंत्रणात सूर्यकिरणातून मिळणाऱ्या ड जीवन सत्वाचे महत्व सिद्ध झाले आहे. औषध स्वरूपात ड जीवनसत्व दिले जात असले तरी नैसर्गिक ड जीवन सत्वांची तूंत औषध पूर्ण भरून काढू शकत नाही. म्हणूनच वायू प्रदूषण हे मानवी आरोग्या वर दुरागामी दुष्परिणाम करणारे ठरणार आहे.

                          प्रदूषण ही व्यक्तिगत पातळीवरची तसेच सामाजिक पातळीवरचीही गोष्ट आहे. म्हणूनच प्रत्येकाने शक्य तितका ई गाड्यांचा वापर करणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करणे, वाहतुकीसाठी विजेवरील ई बसेस वा इतर वाहनांचा वापर करणे, कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. औद्योगिकीकरणातून निर्माण झालेले प्रदूषण ही पूर्णपणे शासनाच्या आखत्यारीतली बाब असल्याने संपूर्ण मानवी आरोग्याचा विचार करता सरकारने त्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी कचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली वेगवेगळा कचरा द्या असे दाखवले तरी प्रत्यक्षात तो एकत्र होताना दिसतो. तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांनी गंभीरपणे कृती आराखडा तयार करून तो अमलात आणला पाहिजे. प्रदूषण नियंत्रण बोर्ड, व्यक्तिगत पातळीवर उपाययोजना या दोन्ही पातळ्यांवर प्रयत्न व्हायला हवा.

वैयक्तिक पातळीवर मास्क वापरायला हवा. कोविडमध्ये मास्कची लागलेली सवय प्रदूषणासाठी चांगली आहे. तसेच जलद गतीने चालणे, धावणे, पोहणे, दीर्घ श्वसनाचे व्यायाम, सायकलिंग, खेळ अशा एरोबिक व्यायामुळे प्रदुषणा मुळे फुफुसांवर होणारा दुष्परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो. प्रथिनेयुक्त सकस आहारातून प्रदुषणातून घसरलेली प्रतिकारशक्ती शाबूत राहण्यास मदत होईल. थंड हवेच्या गजबजलेल्या ठिकाणी, ट्रॅफिक जॅममध्ये सुट्ट्या घालवण्या पेक्षा ग्रामीण भागातील निसर्गरम्य, शांत, मोकळ्या हवेच्या ठिकाणांना पसंती द्यायला हवी. थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध असलेली महाराष्ट्रातील काही ठिकाणे हे सुट्ट्यांमध्ये शहरां इतकीच किंबहुना अति गर्दी मुळे त्या पेक्षा जास्त प्रदूषित असतात हे भान हौशी पर्यटकांना राहिलेले नाही.

डॉ. अमोल अन्नादते
dramolaannadate@gmail.com
www.amolannadate.com
9421516551

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *