केईएम – ब्रँड नव्हे, ‘कल्ट’ ब्रँड

डोंबिवलीकर दिवाळी अंकातून…

केईएम – ब्रँड नव्हे, ‘कल्ट’ ब्रँड

  • डॉ. अमोल अन्नदाते

जसा सौंदर्य या शब्दाचा नेमका अर्थ शब्दात पकडता येत नाही तसाच ब्रँड म्हणजे काय याचा समर्पक अर्थ लावता लावता कॉर्पोरेट जगताने कित्येक क्षण, शब्द, बुद्धी संपदा खर्ची घातली, पण त्याचा अर्थ सहजपणे लावणे कुणालाच शक्य झालेले नाही. मोठमोठे ब्रँड उदयाला आले आणि लयासही गेले तेव्हा ब्रँडच्या व्याख्येच्या मर्यादा लक्षात आल्या आणि मग त्याच्याही पुढे काय असा शोध सुरू झाला. ब्रँडचा अर्थ जिथे संपतो तिथून पुढे सुरू होणारा शब्द म्हणजे ‘कल्ट ब्रँड’. ‘कल्ट ब्रँड’ म्हणजे काय हे समजून घेताना आणि सांगतानाही मोठी दमछाक होते. जो ब्रँड उभा राहताना त्याच्या छताखाली येणाऱ्यांची त्यात खोलवर दीर्घकालीन मानसिक गुंतवणूक असते, ती पिढ्या दर पिढ्या वाढत जाते, ज्याची व्याप्ती शोधताना हा ब्रँड सुरू कुठून होतोय आणि त्याचा शेवटचा धागा आहे कुठे याचा थांगपत्ता लागत नाही , ज्याच्या यशात एक गर्भित गूढता असते आणि जो सार्वकालिक असतो तो ‘कल्ट ब्रँड’. वैद्यकीयच नव्हे तर सर्वच शिक्षण क्षेत्रात कल्ट ब्रँडचे उदाहरण द्यायचे झाल्यास सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ‘केईएम’. केईएम हे मुख्य रुग्णालयाचे नाव असले तरी ज्या मुळे या तीन शब्दांचे गारुड अख्या जगाच्या वैद्यकीय क्षेत्रावर आहे ते केईएमचे मुकुट म्हणजे सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज अर्थात गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज.

कितीही काळ लोटला तरी घरातील हुशार मुलाने डॉक्टर व्हावे ही पालकांच्या मनातील इच्छा अबाधित राहिली आहे. प्रत्येक हुशार मुलाने डॉक्टर, इंजिनिअरच कशासाठी व्हावे अशी भले तुम्ही कितीही टीका करा, पण ही टीका करणाऱ्याच्या घरातही मुलगा चुणचुणीत वाटू लागला तर त्याच्या मनालाही हाच विचार शिवून जातो की या मुलाने डॉक्टर व्हावं. तर अशा सव्वाशे कोटीच्या देशातून प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात, गावात, शाळेतील, घरात पहिल्या येणाऱ्या मुलांना जिथे प्रवेश मिळतो अशी संस्था म्हणजे केईम.

कुठलाही ब्रँड समजून घेताना त्याचे ब्रीद वाक्य समजून घ्यावे लागते . जेव्हा वयाच्या अठराव्या वर्षी तुम्ही पहिली पासून पहिले आलेले असता आणि वैद्यकीय शिक्षण सुरू होताना तुम्ही या वास्तूत प्रवेश करता तिथे एक ब्रीद वाक्य प्रवेश द्वारावर तुमचे लक्ष वेधून घेते. ते ब्रीद आहे Genius alone lives, all else is mortal अर्थात ‘तल्लख विचारशील बुद्धिमत्ता फक्त तेवढी अमर आहे, बाकी सर्व मर्त्य आहे.’ प्रवेश करताना पहिल्या दिवशी पहिल्या क्षणाला या वाक्यापासून केईएम तुमचा नियोजनबद्ध रीतसर बौद्धिक, मानसिक जिनोसाईड घडवून आणतं. तुम्ही मराठी साहित्य शिकायला एखाद्या महाविद्यालयात गेलात आणि तिथे पू. ल. देशपांडे, आचार्य अत्रे , वी. वा. शिरवाडकर, बा. भ. बोरकर हे अध्यपनासाठी असतील तर तुमचे काय होईल? इथे येणाऱ्या विद्यार्थ्याचे तेच होते. ज्या डॉक्टर लेखकांची पुस्तके प्रमाण मानली जातात त्यातील अनेक लेखक इथले शिक्षक होऊन गेले आहेत. म्हणून स्वतःला रथी महारथी समजणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे पहिल्या वर्षात जे बौद्धिक गर्वहरण होते त्यातून ‘भांड भरून घेण्यासाठी ते आधी रीतं कराव लागतं’ ही पहिली जाणीव मिसूरड फुटताना केइएम करून देतं, ती म्हातारपणी दात पडेपर्यंत तशीच राहते. म्हणूनच सतत अनलर्निंग आणि लर्निंग हा या ब्रँडचा महत्त्वाचा भाग. अलौकिक बुद्धिमत्तेचे अनेक विद्यार्थी आणि अनेक शिक्षक एकत्र आल्याने व सोबत एकाहून एक सरस्वतीपुत्रांच्या सहवासातून सूर्याचे तेज याची देही पाहिलेल्यांना कुठल्या ‘एलईडी लाइटच्या’ प्रकाशाचा सोस राहणार ? म्हणून केईएम मधून बाहेर पडलेले कधी कोणाहीमुळे प्रभावित होत नाहीत. त्यायामुळेच ‘केईमाईट्स’ उद्दाम , गर्विष्ठ अशी प्रतिमा तयार होते. मुळात ते उद्दामपणापेक्षा बौद्धिक वैराग्य असते.

कल्ट ब्रँडचा एक विशेष असतो. रजनिकांत , अॅपल , ओशो, सलमान खान अशी काही कल्ट ब्रँडची उदाहरणे बघितली तर एक लक्षात येते की अॅपल वापरणारे आणि न वापरणारे अशी जगाची विभागणीच हे ब्रँड करून टाकतात. तसेच वैद्यकीय क्षेत्रात ‘केईम वाले’ आणि ‘इतर’ असा कॉम्यून १९२६ पासून म्हणजे गेल्या ९६ वर्षांपासून निर्माण झाला आहे. या ब्रँडच्या जन्मामध्येच तो का व कसा उभा राहिला याची कारणे सापडतात. १८४५ साली जेजे रुग्णालय व ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज हे पहिले वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. इथून शिकलेले भारतीय पुढे इंग्लंडमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन भारतात परतले तेव्हा भारतीय प्राध्यापकांना जेजे मध्ये मज्जाव करण्यात आला. शिकायचं तर इंग्रजांकडूनच, हे भारतातील उच्चशिक्षित डॉक्टरांच्या जिव्हारी लागलं. त्यातून भारतीयांनी सुरू केलेले व जिथे भारतीयच शिकवतील असे वैद्यकीय महाविद्यालय हवे म्हणून तेव्हाच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या अखत्यारीत गोरधनदास सुंदरदास या दानशूर कपड्याच्या व्यापाऱ्याने दान दिलेल्या परळच्या जमिनीवर पाहिलं भारतीय वैद्यकीय महाविद्यालय उभं राहीलं – ते म्हणजे केईएम! स्वदेश हा शब्द अजून देशाला माहीत नव्हता तेव्हा १९२५ साली हे घडलं आणि ‘स्वाभिमान’ हा जन्माचा हेतू असलेला गुणाचा अर्क पुढे केईएमशी जोडलेल्या प्रत्येकामध्ये झिरपत गेला. एखाद्या संस्थेचा मूळ गुण अनेक वर्षानीही कसा तळपत राहतो याचा प्रत्यय केईएमच्या प्रत्येक विद्यार्थ्यात येतो. वैद्यकीय परीक्षेत सहसा परीक्षकांशी वाद घालायचा नसतो, तसे केल्यास अनुत्तीर्ण होणे निश्चित असते. पण तरीही एमडीच्या परीक्षेत आपण बरोबर आहोत, हवं तर आता पुस्तक उघडा असा ‘ मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही ‘ पद्धतीचा बाणा दाखवून नापास होण्यास आनंदाने तयार असणारे विद्यार्थी हमखास केईमचेच असतात, ते ९६ वर्षापासूनच्या याच स्वाभिमानाच्या भावनेतून. म्हणूनच परीक्षेत , नवीन ठिकाणी कामावर रुजू होताना , मुलाखतीत ‘ ओ , सो यू आर केईमाईट ? ‘ या प्रश्नामध्ये बराच गर्भितार्थ असतो. परदेशात तुम्ही केईमाईट आहात हा कुठल्याही रुग्णालयात नोकरी मिळवताना कॉलर वरील मोठा स्टार असतो. भारतातील पहिले किडनी प्रत्यारोपण , पहिले ह्र्दय प्रत्यारोपण , पहिले भारतीय इसीजी मशीन, पहिली टेस्ट्युब बेबी असे बरेच ‘पहिले’ या पहिले आलेल्यांच्या संस्थेतून जन्माला आले. म्हणून Be the first one to do it or be the best one to do it- तुम्ही जगात पहिल्यांदा करणारे असला पाहिजेत किंवा जगात सर्वोत्तम करणारे असला पाहिजेत हा विचार केईएम मधून बाहेर पडल्यावर तुमचा कधीच पिच्छा सोडत नाही.

केईएम कॅम्पस मध्ये तुम्ही डोळे , कान उघडे ठेवून काही क्षण वावरलात किंवा या संस्थेच्या एका मध्यवर्ती ठिकाणी एक रात्र काढलीत तर तुम्हाला हा ब्रँड समजून घेता येतो. निवडणुकीच्या काळात जसे राजकीय वातावरण तापून ते तुमच्या अंगाला, श्वासाला स्पर्श करू लागते तसे या आवारात शिक्षणाची , बुद्धिमत्तेची एक वेगळीच धुंदी तुम्हाला स्पर्श करते. इथले तीन मजली पूर्णतः वातानुकूलित वाचनालय हे भारतातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वोत्तम वाचनालय समजले जाते. विशेष म्हणजे ते २४ तास खुले असते आणि त्याहून विशेष म्हणजे दिवसापेक्षा ते रात्री ओसंडून वाहत असते. मध्यरात्री तीन वाजता दोनेकशे मुले वाचनालयात आणि शे पन्नास आवारात अभ्यासाचे अड्डे असलेल्या इतरत्र ठिकाणी मानेवर खडा ठेवून जाडजूड पुस्तके पेलत ज्ञान साधनेत दंग असतात. म्हणून केइएम मध्ये मध्यरात्री एवढे चैतन्य वाहत असते की ती दिवसाची कुठली वेळ आहे हे बाहेरच्या व्यक्तीला सांगता येणार नाही. ‘मुंबई कभी सोती नही’ असे म्हणतात पण ‘केइएम तुम्हे कभी सोने देता नही’ असे म्हणावे लागेल. वयाच्या पंचाहत्तरव्या वर्षी ‘नवीन काय?’ हे वाचणारे माजी विद्यार्थी इथे सर्रास आढळतात. नुकतेच प्रवेश घेतलेल्यांचा ते अजाणतेपणे राज्यभिषेक करून त्यांना ‘केइएम’ या बीज मंत्राची दीक्षा देतात. जसे सिव्हिलियन आणि सैन्यातल्या व्यक्तीची दिनचर्या , जगण्याची पद्धत वेगवेगळी असते. तशी केईएमच्या विद्यार्थ्याची दिनचर्या वेगळीच असते. देश पातळीवरील ऑल इंडिया पीजी एन्ट्रन्स ( पदव्युत्तर परीक्षेत ) भारतात दुसरा आलेला विद्यार्थीही निकाल बघून झाल्यावर चेहऱ्यावरची रेषही हलू न देता पुढच्या क्षणाला वाचनालयात लगेचच अभ्यासाला बसतो. कारण त्याला एम्स किंवा पीजीआय या पुढच्या परीक्षेत पहिला किंवा दुसरा आल्याशिवाय समाधान मिळणार नसते. हा विद्यार्थीच केईएमचा ब्रँड उभा करत आला आहे. कोणी याला वेडेपणा म्हणेल पण stay hungry stay foolish हाच केईएमचा ब्रँड आहे. हा वेडेपणा हीच केईएमची ओळख आहे. एका इंग्रजी वाहिनीच्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे त्वेषाने बोलून गेले होते – आय एम अ मॅड मॅड हिंदू ‘ यामुळेच बाळासाहेब ठाकरे हा ‘कल्ट ब्रँड’ उभा राहिला. केईएम तुम्हाला हाच madness देते आणि तुम्ही बाहेर पडता तेव्हा मॅड मॅड डॉक्टर बनून जाता. केईएम तुम्हाला केवळ हा madness च देत नाही तर तो बिनधास्तपणे मिरवण्याची सदाफटिंग वृत्ती, कला शिकवते आणि हिम्मतही देते. त्यातूनच केईएम अॅटिट्युड हे विशेषण वैद्यकीय विश्वात जन्माला आले. फास्ट लोकलच्या दारात उभं राहिलं की तुम्ही आपोआप आत खेचले जाता, तसेच ‘ब्रँड केईएम’ तुम्हाला आपोआप कवेत घेते.

जसा अॅपल वापरल्यावर तुम्ही दुसरा फोन वापरू शकत नाही तसेच केईएम मधून बाहेर पडल्यावर तुम्ही कुठेच परत तसे अॅडजस्ट होऊ शकत नाही. या ब्रँडचा मोठा धोका म्हणजे ते तुम्हाला त्याचे व्यसन लावते. तुमचे शिक्षण संपले तरी ते तुमच्या मानगुटीवर बसते आणि प्रत्येकजन शिक्षण संपल्यावरही काही तरी कारण काढून काही काळ तरी इथे रेंगाळतोच. केईएमचे शिक्षक , इथली शिक्षणाची पातळी व बौद्धिक झिंग अनुभवल्यावर तुमच्या स्वतः च्या आयुष्यात एक अस्वस्थता येते . ही अस्वस्थतेची टोचणी सतत तुम्हाला गुणवत्ता आणि नैतिकता तुमच्या वैद्यकीय व्यवसायात प्रत्येक रुग्ण तपासताना जाणवत राहते. केईएमचे विद्यार्थी वेगळ्याच विश्वात राहतात आणि अव्यवहारी असतात असा आरोपही बऱ्याचदा होतो. अध्यात्माची एक विशिष्ट पातळी ओलांडली की भोवताली काय होतंय , लौकिक विश्वात काय घडतंय याचं भान तुम्हाला राहत नाही, अस म्हणतात. केईएमचे विद्यार्थी बऱ्याचदा अशाच शैक्षणिक अध्यात्मात ढकलले जातात. हे शैक्षणिक अध्यात्म आणि त्यातून निर्माण होणारे ‘उपभोग शून्य स्वामी’ हाच ‘ब्रँड केईएम’ आहे. पहिले डीन जीवराज मेहता , डॉ पी के सेन , डॉ पुरंदरे , डॉ बालिगा , आर्थर डीसा . डॉ फडके ते डॉ रवी बापट , डॉ शरदिनी डहाणूकर , डॉ अविनाश सुपे आशा अनेक रत्नांची माळच वर्षानुवर्षे या ब्रँड भोवती गुंफली गेली.

केईएम तुम्हाला सरस्वतीचा दास बनवून सोडत असला तरी इतर अनेक क्षेत्रात केईएम तुम्हाला साथ देते. उद्योग , राजकारण , साहित्य , शिक्षण संस्था , कला , प्रशासकीय सेवा अशा अनेक क्षेत्रात केईएमचे विद्यार्थी आहेत. तुम्ही क्षेत्र बदलले तरी केईएमपण आणि सर्वोत्तमाचा ध्यास तुमचा पाठलाग करत राहते. ‘एके काळी इथे असे होते’ अशा नॉस्टॅलजियाला या ब्रँड मध्ये स्थान नाही. ‘इथे कालही असेच होते , आजही तसेच आहे , उद्याही तसेच असेल’, हा आहे ब्रँड केईएम .

आपले विद्यापीठ किंवा जिथून मुख्य शिक्षण घडले त्याला अल्मा मॅटर असा मूळ लॅटीन पण रूढार्थाने इंग्रजी शब्द प्रचलित आहे. या शब्दाचा खोलवर अर्थ आहे, ‘पोषण करणारी आई व तिची समर्पित मुले.’ ‘माझं सगळं घेऊन टाक’ म्हणणारे रामकृष्ण परमहंस आणि त्यातून परमहंसांना कैवल्यज्ञान देणारी आई भवानी यातून पुढे विवाकानंद हा ब्रँड शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेत तळपला . अल्मा मॅटर चा खरा अर्थ हा आहे जो केईएम शिकवते. सूर्य कुठलाही भेदभाव न करता सर्वांना समान उर्जा देतो, तसे देशभरातील गोर गरीब रुग्णांचे उपचार व वैद्यकीय शिक्षणाचे अव्याहत ज्ञान यात स्वतःला समर्पीत करणारी आई आणि ९६ वर्षे तिच्यातून जन्मलेली डॉक्टर मुले, हाच आहे कल्ट ब्रँड – केईएम.

-डॉ. अमोल अन्नदाते
dramolaannadate@gmail.com
www.amolannadate.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *