गोवराने वाजवली धोक्याची घंटा

दै. महाराष्ट्र टाईम्स

डॉ. अमोल अन्नदाते

_सध्याची गोवराची साथ ही करोनाच्या पोटातून जन्माला आलेली आहे. तिचा प्रभावी सामना करावयाचा तर राज्यातील शंभर टक्के मुलांचे लसीकरण वेगाने व्हायला हवे. त्यासाठी, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने झडझडून कामाला लागायला हवे. तसे चित्र सध्या दिसत नाही…_

राज्यात गेल्या दशकातील गोवराची सगळ्यात मोठी साथ आली असून जवळपास ५२ ठिकाणी गोवराचे रुग्ण आढळून आले आहेत. या साथीचे नोंद घेण्याजोगे वेगळेपण म्हणजे गोवर सहसा वय वर्षे एक नंतरचा आजार समजला जायचा. पण या साथीत मात्र नऊ महिन्याच्या खालचे नऊ टक्के रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ७१ टक्के बालकांना गोवराचा एकही डोस मिळालेला नाही. हे दोन्ही आकडे चक्रावून टाकणारे तसेच गोवर व इतर संसर्गजन्य आजारांच्या साथीविषयी धोक्याची घंटा ओळखून मोठे धोरणात्मक निर्णय तातडीने घेण्याची गरज दर्शवणारे आहेत.

गोवर हा आजार नवा नाही. तसेच, याची लसही १९८५ पासून भारतात मोफत उपलब्ध आहे. कुठल्याही आजाराची प्रभावी लस उपलब्ध असणे, ही त्या आजाराच्या उच्चाटनासाठी आदर्श स्थिती असते. उच्चाटन ही पुढची पायरी गाठणे अवघड असेल तर किमान निर्मूलनाचे तरी उद्दिष्ट साध्य करणे शक्य होते. डिसेंबर २०२३ पर्यंत भारताने गोवर निर्मूलनाचे ध्येय ठेवले होते. पण सध्या आलेल्या साथीमुळे हे उद्दिष्ट गाठणे अवघड आहे व गोवर धोरणाची नव्याने मांडणी करणे गरेजेचे आहे. देशातील ९५ टक्के मुलांना गोवराचे दोन डोस मिळाले तर गोवर निर्मूलन करणे शक्य होते. पण महाराष्ट्रात दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाण ६० टक्के मुंबईत ४३ टक्के व पुण्यात ४६ टक्के एवढे कमी आहे. देशाचा विचार केल्यास पहिल्या डोसाचे प्रमाण ८९ टक्के व दुसऱ्या डोसाचे प्रमाण ८२ टक्के आहे. करोनाच्या दोन वर्षांत इतर रोगांच्या नियमित लसीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक बालके गोवर लशीपासून वंचित राहिलेली दिसतात. केंद्र सरकारने आता ज्या भागात १० टक्के केसेस या नऊ महिन्याच्या असतील तेथे पहिला डोस हा नवव्या महिन्याला न देता सहाव्या महिन्यातच देण्याची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच, साथ आलेल्या भागात नियमित लसीकरण सोडून गोवराचा एक जादा डोस तातडीने देण्याचे सुचवले आहे. पण बैठका तसेच लाल फितीच्या कारभारात अडकलेल्या राज्यात याची अंमलबजावणी चपळाईने होताना दिसत नाही. राज्यातील गोवरबाधा झालेल्या बालकांची संख्या एका महिन्यात दहा हजारांचा टप्पा ओलांडत असताना पालक स्वतःहून लस व उपचारासाठी रुग्णालयात येतील, अशी वाट पाहत बसल्यास साथ झपाट्याने राज्याच्या इतर भागात पसरेल. त्यामुळे घरोघरी जाऊन बालकांनी गोवर लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत का, नसल्यास ते त्वरित देणे असे उद्दिष्ट ठेवून लसीकरण १०० टक्के करणे गरजेचे आहे. नऊ महिन्यांच्या पहिल्या डोसानंतर १५ टक्के मुलांना लस घेऊनही गोवर होऊ शकतो. त्यासाठी १५व्या महिन्याच्या दुसऱ्या डोसचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणून दुसऱ्या डोससाठी ‘मिशन एमर-२’ ही वेगळी मोहीम आखणे गरजेचे आहे. निवडणुकीच्या आधी विविध राजकीय पक्ष, नेते मतदारांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतात व निवडणुकीची रणनीती ठरवतात. सध्या सहज टाळता येण्यासारख्या आजाराने १४ बालकांचा मृत्यू झाला आहे व त्याच्या लढ्याची रणनीती तयार आहे. अशावेळी किमान सत्ताधारी पक्षाने तरी घरोघरी जाऊन लसीकरण, आजाराचे सर्वेक्षण यासाठी निवडणुकीसारखा हुरूप दाखवायला हवा. विरोधी पक्षांना सत्तेत नसतानाही लोकसेवा व कर्तव्य बजावण्याची ही उत्तम संधी आहे. कारण अशा साथीमध्ये झपाट्याने तसेच कमीत कमी वेळेत लसीकरण गरजेचे असते.

करोना आजारात पहिल्यांदा जनतेला ‘आयसोलेशन’ म्हणजे एकांतवास हा वैद्यकीय क्षेत्रातील ठेवणीतला शब्द खऱ्या अर्थाने कळला. गोवर हा सुद्धा संसर्गजन्य आजार आहे. म्हणूनच करोना एवढे सक्तीचे नसले तरी इतर निरोगी बालकांपासून गोवर झालेल्या बालकाला लांब ठेवणे गरजेचे आहे. ताप आलेल्या मुलांना शाळेत पाठवले नाही तरी इतर मुलांना संसर्ग टाळणे शक्य होईल. गोवराचा धोका मोठ्यांना नसल्याने घरात केवळ इतर मुलांना जमेल तितके दूर ठेवावे. गोवर रुग्णांची संख्या वाढत चालल्याने शासकीय रुग्णालयांमध्ये या मुलांना दाखल करण्यास वेगळी खोली असावी. गोवरामध्ये रुग्ण उशिरा दाखल करणे व कुपोषण हे मृत्यू होण्याला पोषक स्थिती निर्माण करतात. गोवर काही करोनासारखा अंधारात चाचपडण्याचा प्रांत नव्हे. म्हणून एकही मृत्यू होऊ न देणे हे या साथीच्या नियोजनात सर्वांत मोठे उद्दिष्ट असायला हवे. त्यासाठी कोणाला रुग्णालयात दाखल करावे या मार्गदर्शक तत्त्वाविषयी शासकीय रुग्णालये तसेच खाजगी डॉक्टरांमध्ये पुरेशी स्पष्टता नाही. गोवरामध्ये मृत्यूला मुख्यतः न्यूमोनिया व मेंदूज्वर ही संभाव्य गुंतागुंत जबाबदार ठरते. सात दिवसांपेक्षा जास्त आजार लांबत असेल तर गुंतागुंत निर्माण होते आहे, हे पालकांनी ओळखावे. आजार सात दिवसांपेक्षा जास्त लांबणे, श्वासाचा वेग ४० पेक्षा जास्त व वजन कमी असलेले कुपोषित बाळ असल्यास रुग्णालयात दाखल करून उपचार करणे ही सूत्रे पाळल्यास बरेच मृत्यू टाळता येतील.

प्रत्येक साथीच्या पोटात अनेक आरोग्यसमस्या जन्म घेत असतात. गोवरही करोनाच्या पोटातूनच जन्माला आलेली साथ आहे. तसेच, गोवराची साथ सरून गेल्यावरही लहान मुलांमध्ये काही आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. गोवरामुळे भूक कमी होते व त्यातूनच झपाट्याने वजन घटते. म्हणून गोवर बरा झाल्यावर जास्त उष्मांकाचा आहार बाळाला देणे गरजेचे असते. याचा सोपा मार्ग म्हणजे प्रत्येक आहारात नारळाचे तेल / गाईचे तूप टाकणे आणि बाळाचे वजन आहे तितके चमचे दूध भुकटीची पावडर रोजच्या आहारात मिसळत राहणे. गोवरानंतर प्रतिकारशक्ती घसरल्यामुळे या बालकांना क्षयाचा म्हणजे टीबीचा धोका जास्त असतो. त्यामुळे, राज्यात निद्रिस्त असलेला लहान मुलांचा टीबी नियंत्रण कार्यक्रम धडाडीने हाती घ्यावा लागेल. गोवरानंतरचा सर्वांत मोठा प्रश्न ‘इम्यून अॅम्नेझिया’ या फारशा माहीत नसलेल्या वैज्ञानिक प्रक्रियेमुळे निर्माण होऊ शकतो. इम्यून अॅम्नेझिया म्हणजे गोवर झाल्यावर आधी होऊन गेलेल्या आजारांबाबतच्या प्रतिकारशक्तीचा शरीराला विसर पडणे. हे करोनाबाबत घडून गोवर झाल्यावर लहान मुलांमध्ये परत करोनाचा संसर्ग वाढल्याचे काही देशांत दिसले आहे. लहान मुलांमध्ये करोना लक्षणविरहीत असला तरी तो मोठ्यांनाही होऊन गोवर साथीनंतर मोठ्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढल्यास आश्चर्य वाटायला नको. म्हणूनच झपाट्याने १०० टक्के मुलांचे लसीकरण, गोवर झालेल्या मुलांना शक्य तितके स्वतंत्र ठेवणे व लवकर उपचार करून एकही मृत्यू होऊ न देणे या उद्दिष्टाने कमी वेळेत मोठे फील्ड वर्क व्हायला हवे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागासमोर आज हे आव्हान आता उभे आहे.

-डॉ. अमोल अन्नदाते
dramolaannadate@gmail.com
www.amolannadate.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *