एक डॉक्टर की मौत – डॉ. अमोल अन्नदाते

दैनिक सकाळ

एक डॉक्टर की मौत

डॉ. अमोल अन्नदाते

    कोलकाता येथे घडलेल्या डॉक्टरच्या बलात्कार आणि खुनाच्या घटनेने (९ ऑगस्ट) देशभर संताप व्यक्त होतो आहे. वैद्यकीय क्षेत्राला या घटनेने अधिक असुरक्षित वाटू लागले आहे व  जगभर वैद्यकीय क्षेत्रातून डॉक्टर या घटने विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. राक्षसी अत्याचार झालेली मुलगी डॉक्टर असल्याने या घटनेला जोडून डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येणे सहाजिक आहे. पण ही घटना केवळ डॉक्टरां वर हल्ला इतकी मर्यादित नाही. स्वातंत्र्याच्या ७८ वया वर्षात आपण लोकशाही म्हणून स्वतः ची पाठ थोपटून घेत असताना स्त्रियांवर होणार लैंगिक व इतर अत्याचार, कायद्याची संपलेली भीती , संथ न्यायदान, अशा घटनां बद्दल राजकीय कोडगेपणा , डॉक्टर व इतर बौद्धिक वर्गाला सतत दडपणाखाली व असुरक्षित वाटून वारंवार संपावर जावे लागणे या प्रश्नांना मृत्यू झालेल्या डॉक्टरच्या कुटुंबा इतकाच प्रत्येक नागरिक अस्वस्थ वाटायला हवे. 

                          २०२२ च्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी आयोगाच्या आकडेवारीनूसार देशात दिवसाला ८० बलात्कारांची नोंद होते. एका नोंदी मागे न नोंदवलेले किमान १० बलात्कार असतात. म्हणजे जवळपास प्रत्येक क्षणाला देशात कुठेतरी बलत्कार तरी घडतो आहे किंवा त्याचे नियोजन तरी सुरु असते. कोपर्डी , दिल्लीतील निर्भया किंवा कोलकाताची अभया अशा टोकाचे अत्याचार झालेल्या घटना प्रकाशझोतात येतात व त्यावर काही काळ समाजात तीव्र असंतोष उफाळून येतो व काळ पुढे सरकतो तसा शांत होतो. पण गुजरातच्या बिल्किस बानो प्रकरणातील ११ आरोपी सुटल्यावर त्यांचे जाहीर हारतुरे पेढे देऊन सत्कार झाले तेव्हा या गुन्ह्यांविषयी शासन , कायदा व्यवस्था फारशी गंभीर नाही हा संदेश समाजात खोलवर झिरपतो. कोलकाता घटने विरोधात डॉक्टरांनी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या डॉक्टरांवर ही मोठा समूह चाल करून गेला व त्यातील महिला डॉक्टरांना ही बलात्काराच्या धमक्या देण्यात आल्या . न्याय व्यवस्था आपले काहीही बिघडवू शकत नाही या टोकाच्या राक्षसी आत्मविश्वासातून आज गुन्हेगारांमध्ये जबरदस्त हिम्मत आली आली आहे. दिल्लीचे निर्भया प्रकरण होऊन एक तप उलटले व बलात्कारा संदर्भातील कायद्यात सुधारणा होईल अशा वल्गना झाल्या. पण सामाजिक परिणाम होऊन बलात्काराच्या घटना कमी करणारे कुठले ही बदल झाले नाहीत. स्त्रियांच्या सुरक्षेसाठी  दर वर्षीच्या १०० कोटींच्या निर्भया निधीतून देशात स्त्रियांविरोधातील वर्षाला किमान १०० गुन्हे तरी कमी झाले का या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे. 

                          एका डॉक्टरच्या मृत्यूतून अजून एक भयान वास्तव पुढे आले आहे. इतके राक्षसी कृत्य होऊनही रुग्णालयाच्या प्रमुखांनी महिला डॉक्टरने एकट्याने खोलीत जाणे हीच चूक असल्याचे निलाजरे विधान केले. या घटने नंतर गुन्हा दडपण्याचे , गुन्हेगारांना वाचवण्याचे पुरेपूर प्रयत्न झाले. स्त्रियांविरोधात किती ही अमानुष लैंगिक अत्याचार झाले तरी यात विशेष काही नाही हा संदेश प्रमुख पदावर असणार्या व्यक्तींकडून सातत्याने दिला जातो. कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या लैंगिकतेशी संबंधित छोटीशी कृती असली व ती खपवून घेतली जाते तेव्हा संदेश तोच असतो. यातूनच पुढे कोणाला तरी कोपर्डी, निर्भया, अभया असे स्त्रियांच्या आत्मसन्माना चा घोट घेण्याचे बळ मिळते. 

वैद्यकीय क्षेत्राची हताशा

            या घटनेमुळे डॉक्टरांची सुरक्षा मग ते पुरुष असो कि स्त्री हे शासनाच्या प्राधान्य क्रमावर का नाही ? या प्रश्नाने वैद्यकीय क्षेत्र हताश व निराश झाले आहे. सुरक्षेसह डॉक्टरांच्या अनेक प्रश्नांकडे कोविड सारखे संकट येऊन ही दुर्लक्ष कमी झाले नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आज डॉक्टर येण्यास इच्छुक नाहीत व मनुष्यबळाच्या तुटवड्या मुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था व सर्वसामान्यांचे आरोग्य मृत्यू शय्येवर असून शेवटच्या घटका मोजते आहे.महाराष्ट्राचे उदाहरण द्यायचे झाल्यास आरोग्य विभागात उपकरणे खरेदी , नवी रुग्णालये उभारण्यावर कोट्यवधींचा खर्च सुरु आहे पण डॉक्टरांची २० हजार पदे रिक्त आहेत.  रुग्णालय हे अनेक वृत्तींच्या लोकांना एका गरजेच्या सक्तीतून एकत्र आणणारे सार्वजनिक ठिकाण असते. या वेगळेपणा मुळे त्याची तुलना इतर सार्वजनिक ठिकाणांशी होऊ शकत नाही . रुग्णालय हे स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार व इतर हल्ल्यांसाठी जास्त हिंसा प्रवण व सोपे ठिकाण असते. पण त्या तुलनेत सुरक्षा ही औषधाला ही नसते. दोन वर्षांपूर्वी आसाम मध्ये जोरहाट येथे शासकीय सेवेत सेवा बजावताना एका ज्येष्ठ डॉक्टरची सामुहिक हत्या ( मॉब लीन्चींग ) झाले. पण यावर कुठे ब्र ही निघाला नाही .  १४५ कोटी जनतेसाठी दर वर्षी फक्त १ लाख डॉक्टर शिक्षण घेऊन समाजात येतात. त्यातही काही जणच उपचारांसाठी उतरतात. सूक्ष्म – अल्पसख्यांक ( मायक्रो मायनॉरीटी ) असलेला बोद्धिक वर्ग आपण  असा भयभीत करणार असू तर डॉक्टरांकडून दर्जेदार सोडाच किमान सेवेची अपेक्षा ही पूर्ण होऊ शकणार नाही हा स्वार्थ तरी लक्षात घ्यायला हवा. 

नैतिक खच्चीकरण

सत्तास्थानी असलेल्या एका वर्गा साठी गरजे पेक्षा जास्त सुरक्षेचे कडे व देशाचे अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी असलेले पायदळी हे लोकशाहीच्या अंता कडे प्रवास सुरु करण्याचे पाउल आहे हे समजून घ्यायला हवे. लाख मेले तरी चालतील पण लाखांचे पोशिंदे वाचले पाहिजे हा काळ आता संपला . या लाखात श्रमजीवी व बुद्धीजीवी दोघांच्या जीवाची किंमत महत्वाची आहे. सध्याच्या घटना नेमक्या या दोघांच्या बळी घेण्यार्या आहेत . १९९० साली पंकज कपूर अभिनित ‘एक डॉक्टर कि मौत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सत्तास्थानी असलेले , प्रशासन , समाज सगळेच आपल्या कुटुंबां कडे व स्वतः कडे दुर्लक्ष करून झटणाऱ्या डॉक्टरची शक्य तितकी अवहेलना करून त्याचा करुण शेवट घडवतात. कोलकता येथे ३६ तास सेवा देऊन दोन घटका आराम करण्यासाठी आलेल्या डॉक्टरवर न जाणे किती जणांनी केलेले लैंगिक अत्याचार देशातील प्रत्येक स्त्री व डॉक्टरच्या अवहेलनेच्या हिम नागाचे दिसणारे टोक आहे. स्त्री शिक्षित असो कि अशिक्षित, कुठल्या ही स्त्रीवर अत्याचार हे निंदनीयच आहेत. पण मुलगी शिकली म्हणून ती वाचणार नाही हा शिकणाऱ्या प्रत्येक मुलीचे नैतिक खच्चीकरण करणारा संदेश कोलकाता घटनेतून गेला आहे. स्त्री व बुद्धीवंत या दोघांना ही सन्मानाची वागणूक मिळणार आहे कि नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही डॉक्टर की मौत, ‘एक डॉक्टर कि मौत’ हा चित्रपट विस्मृतीत गेला तसे काही बोध न घेता ही घटना विस्मृतीत जाता कामा नये.

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

www.amolannadate.com

9421516551

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *