गोवर.. तरीही साथ येतेच कशी

१९८५ साली देशात सार्वत्रिक मोफत १९ लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला. तेव्हाच गोवरचा त्यात समावेश होता. ३७ वर्षे जी लस मोफत दिली जाते आहे आणि जी अत्यंत प्रभावीही आहे. तरीही या आजाराची साथ येत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. याचे कारण अजूनही मोफत लस सर्व मुलांपर्यंत पोहोचवण्यास सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला आलेले अपयश. नॅशनल फॅमिली हेल्थ सव्र्हें 3 (NFHS 3) यात १ ते २३ महिन्यांदरम्यानच्या बालकांमध्ये बीसीजी, गोवर, ट्रिपल आणि पोलिओ यांचे एकत्रित लसीकरणाचे प्रमाण हे शहरी भागात ५८.८ टक्के आणि ग्रामीण भागात ४९.८ टक्के असल्याचे दिसून आले. फक्त गोवर लस गृहीत धरल्यास महाराष्ट्रात हे प्रमाण  केवळ ६० टक्के आहे. मुंबईत ते ४३ टक्के आणि पुण्यात ४६ टक्के एवढे कमी आहे. सहज टाळता येणाऱ्या आजाराच्या मोफत लसीचे प्रमाण एवढे कमी असणे हे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पालक या दोघांच्या दृष्टीने मोठे अपयश आहे.

गोवरची साथ येण्याला कोविड १९चा संसर्गही कारणीभूत ठरला. कोविडची साथ नियंत्रित करण्यासाठीच्या लसीकरण मोहिमेदरम्यान नियमित लसीकरणावर दुष्परिणाम झाला. २०२० आणि २०२१ मध्ये २० दशलक्ष मुले गोवर लसीकरणापासून वंचित राहिली. कोविड ११ची साथ आटोक्यात आल्यानंतरही लहान मुलांचे घसरलेले नियमित लसीकरण वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. गोवरसारखे आजार डोके वर काढण्यास ही बाब प्रामुख्याने जबाबदार आहे.

१९८५ पासून देशात बालकांना गोवरची लस नवव्या महिन्यात देण्यात येते. पण ही लस केवळ नवव्या महिन्यात देणे चुकीचे आहे. ही लस पुढे १४ महिने व मूल ४ वर्षांचे झाल्यावर देणेही आवश्यक आहे. मात्र तज्ज्ञांचे हे मत ऐकून त्यात बदल करण्याची सवड आणि संवेदनशीलता शासन पातळीवर दिसून येत नाही. गोवरची साथ आणि सध्या होत असलेले मृत्यू पाहता तातडीने शासनाने शासकीय लसीकरण वेळापत्रकात बदल करायला हवेत. मोफत लसीकरण हे शासकीय रुग्णालयात निश्चित वेळेत आणि निश्चित दिवशीच केले जाते. खरे तर उपचारासाठी २४ तास. पण आजाराच्या प्रतिबंधासाठी मात्र मर्यादित वेळ हे गणित आजार टाळण्यासाठी योग्य नाही. म्हणून मोफत लसीकरण हे रोज आणि पूर्णवेळ असायला हवे.

पालकांनी काय करावे?

आपल्या मुलांचे ९ महिने १५ महिने आणि ५ वर्षे या वयात नियमित लसीकरण करून घ्यायला हवे. १५ महिने आणि ५ वर्षे या काळात दिल्या जाणाऱ्या लसी मोफत मिळत नसल्या तरी या लसी खासगी रुग्णालयात पैसे देऊन घ्यायला हव्यात. या लसी अत्यंत स्वस्त आणि प्रत्येकाला परवडणाऱ्या अशाच आहेत. मूल इतर आजारांनी बाधित झाल्यास त्याची प्रतिकारशक्ती घसरते आणि ते मूल गोवरसारख्या विषाणूजन्य आजारांसाठीचे सोपे सावज ठरते. म्हणून पहिल्या ५ वर्षांत मुलासाठी उपलब्ध सर्व लसी पालकांनी मुलांना द्यायला हव्यात. सरकारी रुग्णालयातील सर्व मोफत लसी घेतल्या म्हणजे लसीकरण संपले असे पालकांना वाटते. पण सरकारी रुग्णालयात केवळ १० टक्के लसी मोफत मिळतात. इतर बऱ्याच आजाराच्या लसी या खासगी रुग्णालयात जाऊनच घ्याव्या लागतात. म्हणून आपल्या बालरोगतज्ज्ञांशी चर्चा करून खासगी रुग्णालयात मिळणाऱ्या सर्व लसी वेळच्या वेळी आपल्या मुलांना द्यायला हव्यात.

*आहार आणि पोषण महत्त्वाचे!*

  •  गोवर हा आजार शरीरातील अ जीवनसत्त्वाची | पातळी शून्यावर आणतो आणि त्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर, दृष्टीवर दुष्परिणाम होतो. म्हणून मूल ९ महिन्याचे झाल्यापासून ५ वर्षांपर्यंत दर ६ महिन्यांनी अ जीवनसत्त्वाचे डोस देणे गरजेचे आहे. तसेच गोवर झाल्यावर अ जीवनसत्त्वाचा डोस तातडीने देणे गरजेचे आहे.
  • गोवर हा मुख्यतः कुपोषित बालकांना होणारा आजार आहे. दर तीन महिन्यांनी मुलाच्या | वाढीचा तक्ता बालरोगतज्ज्ञाकडून भरून घ्यायला हवा. कुपोषण टाळणे हे गोवर साथ रोखण्यासाठी महत्त्वाचे आहे.

*गोवरचा संसर्ग झाल्यास…*

  • गोवरचा संसर्ग झाल्यास साथ असलेल्या भागात बालकाला ताप आल्यास गोवरच असू शकतो. असे गृहीत धरून मुलाला शाळेत पाठवू नये.
  • शाळेतही मुलाला ताप, पुरळ आढळल्यास शिक्षकानी पालकांशी त्वरित संपर्क साधावा. गोवर हा आपोआप बरा होणारा विषाणूजन्य आजार आहे. पण बालरोगतज्ज्ञांकडून वेळेत तपासणी आणि योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.
  • ताप, सर्दी, खोकला, टाळूवर लाल डाग आणि डोक्यापासून खाली पायाकडे सरकणारा लाल पुरळ हे या आजाराचे व्ययवच्छेदक लक्षण आहे. सहसा हा आजार सात दिवसात बरा होतो. त्यावर जर आजार लांबत असेल तर गुंतागुंत निर्माण होते आहे असे ओळखून तातडीने बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • गोवर बरा झाल्यावर वजन झपाट्याने घसरु शकते. म्हणून गोवर बरा झाल्यानंतरचा महिना बालकाच्या आहाराच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा असतो.

त्यासाठी थोडे थोडे जास्त वेळा खाऊ घालणे आणि प्रत्येक जेवणात खोबऱ्याचे तेल (खाण्याचे] किया गायीचे तूप घालावे. बालकांच्या आहारात दूध भुकटीचा समावेश करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

*- डॉ. अमोल अन्नदाते*

dramolaannadate@gmail.com

www.amolannadate.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *