…जेव्हा डॉक्टरच होतो संस्थाचालक!

...जेव्हा डॉक्टरच होतो संस्थाचालक!

…जेव्हा डॉक्टरच होतो संस्थाचालक! डॉक्टर किंवा स्पेशालिस्ट डॉक्टर हुशारी असूनही संस्था किंवा स्वतःच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय महाविद्यालय काढण्याच्या फंदात सहसा पडत नाहीत. मात्र मराठवाड्यातल्या वैजापूरसारख्या एका छोट्या तालुक्यातला एक तरुण डॉक्टर, आपला भाऊ आणि वडील यांच्या मदतीने थेट नर्सिंग कॉलेज आणि आयुर्वेदिक महाविद्यालय उभारण्याचा निर्धार करतो आणि तो निर्धार वास्तवात आणतो. ही सारी सत्यकथा ‘एका मेडिकल कॉलेजचे बाळंतपण’ या पुस्तकातून कळते.

‘एका मेडिकल कॉलेजचे बाळंतपण’ या पुस्तकातील कथा एका धडपडणाऱ्या तरुण माणसाची जेवढी आहे, तेवढीच नवे काहीतरी करू पाहणाऱ्या, समाजहिताची काळजी करणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाची आहे. सरकारी व्यवस्थेला तोंड देताना सामान्य माणसे अक्षरशः मेटाकुटीला येतात, पण डॉ. अमोल अन्नदाते हा माणूस कुठल्याही अवघड परिस्थितीला शरण न जाता त्या प्रत्येक अडचणींवर मात करतो आणि आपले ध्येय पूर्ण करतो.

हे पुस्तक त्यांच्या सगळ्या प्रयत्नांची माहिती देते. आपल्याकडची सरकारी यंत्रणा नियमाला किती बांधील असते व माणसापेक्षा नियम मोठा आणि नियमाची अंमलबजावणी जास्त महत्त्वाची या मानसिकतेत कशी वावरत असते याचा दर पानागणिक अनुभव देते. या यंत्रणेच्या त्रासाला, या सगळ्या गोंधळाला आणि प्रचंड अशा कागदपत्रांच्या पूर्ततेला माणसे वैतागतात आणि नकोच ते काम करणे किंवा नको ती संस्था उभारणे अशा निष्कर्षाला येतात. इथेच या पुस्तकाचे सगळे वेगळेपण आहे. ही कहाणी आहे ती अन्नदाते यांच्या कष्टाची. आपल्या ध्येयाच्या ते कसे जवळ जातात, त्यांना कशी आणि कुणाची मदत होते त्याची या पुस्तकातून सविस्तर माहिती मिळते.

अमोल अन्नदाते आपली मुंबईतली बड्या हॉस्पिटलमधली चांगली प्रॅक्टिस सोडून आपल्या गावात वडील आणि आपला मोठा भाऊ यांच्याबरोबर काम करण्यासाठी येतात, त्यांच्या रुग्णालयासाठी आणि परिसरातील मुलींना चांगली संधी मिळावी म्हणून ते नर्सिंग महाविद्यालय काढण्याची योजना आखतात. हे करताना त्यांना येणारे अनुभव धक्कादायक आहेत. काही वेळा, ठरवले तर सरकारी अधिकारी एखाद्यासाठी किती चांगल्या पद्धतीने यंत्रणा राबवू शकतात त्याचीही झलक दिसते.

पुस्तक जसजसे वाचत जातो तसे वाचक त्या कथानकात गुंतून पडतो, ही कुठली फॅंटसी नाही किंवा अमिताभ बच्चन यांचा मारधाड पट म्हणजे ॲक्शनपट नाही, याची कल्पना आली तरी वाचक अन्नदाते यांच्या जागी स्वतःला पाहायला लागतो आणि त्यांना कामात यश मिळावे यासाठी प्रार्थना करायला लागतो. हा जो अन्नदाते आणि वाचक यांच्यातला अनुबंध निर्माण होतो हेच अन्नदाते यांच्या कामाच्या प्रामाणिकपणाचे यश आहे आणि त्याच्या कथनशैलीची जादू आहे. पंकज जोशी यांनी पुस्तकाचे संकलन करताना विषयाची जाण ठेवून संकलन केले आहे.

सरकारी यंत्रणा आणि तिथले कर्मचारी कशी अडवणूक करतात याचा पुरेपूर अनुभव साध्या एका झेरॉक्सच्या प्रकरणात येतो. दिल्लीतल्या संस्था कशा वगातात, माणसाला त्या कशा शुल्लक लेखतात आणि परिस्थितीचा कसा गैरफायदा घेतात तेही यातून कळते. अन्नदाते यांना आयुर्वेदिक महाविद्यालय काढायचे असते. त्यासंदर्भातली सुनावणी ज्या कार्यालयात होणार असते, तिथला झेरॉक्सवाला एका प्रतीचे पाचशे रुपये मागतो. कशी लूट केली जाते त्याचे हे एक उदाहरण. या पुस्तकात जसे वाईट अधिकारी आणि कामासाठी पैसे घेणारे दलाल भेटतात तसेच काही चांगले अधिकारी आणि काही चांगले लोकही भेटतात. सुष्ट दुष्टचा हा खेळ एखाद्या टीव्ही मालिकेसारखा सतत सुरू असतो. अन्नदाते यांच्या या पुस्तकावर उत्तम मालिका होऊ शकेल इतके जबरदस्त अनुभवांचे गाठोडे या पुस्तकात दडलेले आहे.

अन्नदाते आपल्या महाविद्यालयासाठी बाक तयार करताना ते आपल्या गावातील स्थानिक उद्योजकाला बळ देऊन त्याच्याकडून काम करून घेतात. त्याचा एक छोटा उद्योजक ते मोठा उद्योजक हा प्रवास अन्नदातेंमुळे पूर्ण होतो. केवळ हे एकच उदाहरण नाही तर मेस किंवा अन्य बाबींसाठी ते स्थानिक माणसाला बळ देतात, ते सारे कौतुकास्पद आहे. अन्नदाते या पुस्तकात जो सकारात्मक सूर लातात, त्यामुळे हे पुस्तक एका लढवय्या माणसाच्या प्रयत्नांची यशोगाथा ठरते. उगीच परिस्थितीला दोष देत, इतरांना जबाबादर धरून आपल्या अपयशाबद्दल ज्याला त्याला नावे ठेवायची असा खाक्या इथे नाही. अडचणीचे, निराशेचे अनेक प्रसंग इथे येतात, पण चिकाटीने अन्नदाते त्यावर मार्ग काढतात. हे पुस्तक डॉक्टरी संघटना म्हणजे ‘आयएमए’ किंवा अन्य पॅथीच्या किंवा स्पेशालिस्ट मंडळीच्या संघटनांनी आवर्जून खरेदी करून आपल्या सदस्यांना वाचायला दिले पाहिजे.

बारावीला सायन्स शाखेतून विक्रमी गुण मिळवून त्याची रेकॉर्ड ब्रेक नोंद करणारे अन्नदाते नंतर मुंबईत महागड्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत असताना आपल्या गावच्या लोकांसाठी परत येतात आणि एक कमिटमेंट म्हणून हॉस्पिटलचा व्याप उभा करतात. ते करताना महाविद्यालयाचीही स्थापना करतात, त्यातही काही मूल्ये कशी रुजायला हवीत याबद्दलही काळजी घेतात, त्यासाठी काही नवे आणि चाकोरीबाहेरचे उपक्रम राबवतात. साधे टॉयलेट स्वच्छ कसे राहील याकडेही ते आवर्जून लक्ष देतात, एक व्यवस्था उभी राहण्याकडे त्यांचा कटाक्ष आहे आणि त्याचबरोबर ती व्यवस्था कर्मकांडात अडकणार नाही याचीही दक्षता घेतात. एक डॉक्टर, एक प्राध्यापक आणि एक धडपड्या संस्थाचालक अशी अन्नदाते यांची अनेक रूपे या पुस्तकात दिसतात. आपला भाऊ, वडील, पत्नी आणि बरोबरचे सारे सहकारी यांचा आपल्या यशात कसा वाटा आहे याचेही श्रेय ते मनमोकळेपणाने देऊन टाकतात.

अनेक अडचणी आणि त्रास सहन करून ते नर्सिंग आणि आयुर्वेदिक कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लावतात. नव्या संकल्पना आणि नवी संस्कृती ग्रामीण भागात ते रुजवू पाहत आहेत. त्यांची ही संघर्षगाथा अर्थातच कुणालाही प्रेरणादायी अशीच आहे.

डॉ. अमोल अन्नदाते
reachme@amolannadate.com

तिसरा टप्पा सुरू : मेरा नंबर कब आयेगा?

कुठली लस चांगली याचे उत्तर  “जी उपलब्ध आहे ती”  एवढे सोपे आहे.  म्हणून  “कुठली घ्यावी”  यापेक्षा  “लस घ्यावी”  हेच महत्त्वाचे !

तिसरा टप्पा सुरू : मेरा नंबर कब आयेगा? कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा राज्यात सुरू झाला असून, पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या अनुभवांवरून हा टप्पा जास्तीत जास्त यशस्वी करण्यासाठी सर्वसामान्य व शासन, प्रशासन अशा सर्व पातळ्यांवर काही सुधारणा आवश्यक आहेत. साठीच्या पुढे व इतर आजारांसह पंचेचाळीशीच्या पुढे असलेल्यांचे लसीकरण आता सुरू झाले असले, तरी पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असलेला टप्पा अजून अपूर्ण आहे. राज्यात पहिल्या टप्प्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या संख्येपैकी केवळ ५० टक्के लसीकरण झाले आहे. दुसरा डोस अनेकांनी घेतलेला नाही. दुष्परिणामांची भीती व लस घेऊनही कोरोनाची लागण होते या दोन गैरसमजांमुळे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. लसीकरणानंतर नैसर्गिक कारणांमुळे झालेले मृत्यू व दुष्परिणामांचे संबंधही लसीशी जोडण्यात आल्याने काही आरोग्य कर्मचाऱ्यांनीही लसीकडे पाठ फिरवली. लस पूर्णपणे सुरक्षित आहे व एक दिवसासाठी अंगदुखी, थोडा ताप, थकवा हे तुरळक परिणाम सोडता लसीचे कुठलेही मोठे दुष्परिणाम नाहीत. या लसीमुळे जीवघेण्या दुष्परिणामांची कुठलीही शक्यता मनात न आणता सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

लसीकरणासाठी जाताना प्रत्येकाने आणखी एकाला लसीकरणासाठी प्रेरित करणे, त्याला सोबत घेऊन जाणे, त्याच्या मनात शंका असतील तर त्या दूर करणे हा सध्या देशसेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. पहिल्या टप्प्यात पहिला डोस घेतल्यावर दुसरा डोस घेण्यास काहीजण उत्सुक नव्हते. दोन डोस शिवाय पूर्ण प्रतिकारशक्ती येणे शक्य नाही. दुसरा डोस न घेणे म्हणजे पहिला डोस वाया घालवण्यासारखे आहे. पहिल्या व दुसऱ्या डोसची तारीख चुकवून ती उद्यावर ढकललेल्यांचे लसीकरण इच्छा असूनही चालढकल केल्यामुळे राहून गेले असे पहिल्या टप्प्यातले निरीक्षण आहे.  आपल्याला ठरवून दिलेल्या दिवशी लस घेणे हे  सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे प्राधान्य आहे असे ठरवून सकाळच्या सत्रातच लस घेण्याचा निश्चय करावा. एखाद्या साथीच्या रोगावर मात करायची असते तेव्हा कमी वेळात जास्त लोकसंख्येचे लसीकरण होणे आवश्यक असते. सध्या देशातील केवळ ०.६ टक्के जनतेचे लसीकरण झाले आहे. लसीकरणाचा वेग संथ आहे. रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांना लसीकरण बंद ठेवून चालणार नाही. शासनाकडून लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या हालचाली तेव्हाच होतील जेव्हा लसीकरण केंद्रावर मागणी वाढेल. म्हणून आपल्याला ठरवून दिलेली तारीख न चुकविणे गरजेचे आहे. 


पहिल्या टप्प्यातील बॅक लॉग पाहता प्रत्येक टप्प्यावर असाच लस न घेणाऱ्यांचा बॅक लॉग राहिला तर  लसीच्या माध्यमातून हर्ड इम्युनिटी म्हणजे कळप/सामूहिक प्रतिकारशक्तीच्या मुख्य हेतूपासून आपण वंचित राहू व सर्व मुसळ केरात जाईल. म्हणूनच प्रत्येकाने आरोग्य साक्षरता दाखवत साथ रोखण्यासाठीची  इच्छाशक्ती सिद्ध करण्याची ही वेळ आहे. लस घेऊनही कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्यांनी विचलित होण्याची गरज नाही. लस ही आजारासाठी कवच कुंडले आहेत, पण तो काही अमरत्व देणारा अमृत कलश नाही. म्हणून इतर प्रतिबंधक उपायांचे महत्त्व याने कमी होत नाही. लस घेतल्यावर कोरोनासंसर्ग होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. झाला तरी तो गंभीर स्वरूपाचा नसेल. म्हणजेच लसीचे मुख्य ध्येय हे मृत्यू टाळणे हे आहे हे समजून घ्यावे. 
कुठली लस चांगली याचे उत्तर “जी उपलब्ध आहे ती” एवढे सोपे आहे. दोन्ही लसी शासनाने सखोल वैज्ञानिक चिकित्सेअंति उपलब्ध केल्या आहेत म्हणून “कुठली घ्यावी” यापेक्षा “लस घ्यावी” हेच सध्या प्राधान्य असले पाहिजे. 
शासनाने लसीकरण धोरणात  काही बदल केला तर लसीची परिणामकारकता वाढवता येऊ शकते. सध्या दोन डोसमधील अंतर चार आठवडे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ५६ टक्के प्रतिकारशक्ती मिळणार आहे. हे अंतर जर ८ ते १२ आठवड्यांपर्यंत वाढवले तर लसीची परिणामकारकता ८० टक्केपर्यंत वाढू शकते. तसे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेनेही दिले आहेत.  म्हणून पहिला डोस घेणाऱ्यांना चार आठवड्यांनी दुसरा डोस देण्यापेक्षा तो इतर लस न मिळालेल्यांना पहिला डोस म्हणून देता येईल (या धोरण सुधारण्यासाठी सूचना आहेत, पण सर्वसामान्यांनी ठरवून दिलेल्या दिवशी म्हणजे चार आठवड्यांच्या अंतरानेच दुसरा डोस घ्यायचा आहे) 
दुसरा डोस लांबविण्याचा शासकीय पातळीवर फायदा असा होईल की पहिल्या डोस नंतरही काही प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण होतेच व जास्तीत जास्त जनतेला कमी वेळात पहिला डोस मिळाला तर संसर्गाचे प्रमाण, मृत्युदर व दुसऱ्या लाटेची शक्यता अशा अनेक गोष्टी कमी होतील.  दुसरा डोस लांबल्याने प्रतिकारशक्तीही जास्त प्रमाणात निर्माण होईल. 
दुसरा डोस लांबवून पल्स पोलिओच्या धर्तीवर जास्तीत जास्त लोकांना कमी वेळात पहिला डोस देण्याचा विक्रम प्रस्थापित करणे हा हर्ड इम्युनिटीसाठीचा राजमार्ग ठरू शकतो. यासाठी निश्चित काळ निर्धारित करून देशात उपलब्ध असलेले ८ लाख डॉक्टर व २० ते २५ लाख आरोग्य कर्मचारी सरकारच्या एका हाकेवर हे शिवधनुष्य नक्कीच पेलून धरतील. 


तिसरा टप्पा सुरू : मेरा नंबर कब आयेगा? फ्रान्समध्ये आधी कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना एकच डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण आधी संसर्ग झाल्याने त्यांच्यासाठी पहिला डोस हा काही प्रमाणात दुसऱ्या बुस्टर डोससारखा काम करण्याची वैज्ञानिक शक्यता आहे. याचाही हेतू जास्तीत जास्त लोकांना पहिला डोस कमी वेळात देण्याचाच आहे. 
लसीकरण धोरण राबविताना  आरोग्य यंत्रणा कमकुवत असलेल्या, कमी मनुष्यबळ असलेल्या ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.  ग्रामीण भागातील  जनता कोविन ॲपवर नोंदणी व प्रवास करून गावातून तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयात येईल ही अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. अगदी गंभीर आजारासाठीही तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची  आर्थिक व मानसिक क्षमता नसलेल्या ‘नाही रे’ वर्गाला लसीकरण मोहिमेत कसे सामावून घेता येईल याचे सूक्ष्म नियोजन अजून आरोग्य खात्याकडे नाही. समाजाच्या या स्तरासाठी लसीकरण गाव-खेड्यात न्यावे लागणार आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

टॉयलेट ट्रेनिंग

टॉयलेट ट्रेनिंग

टॉयलेट ट्रेनिंग मुलांना टॉयलेट ट्रेनिंगची गरज का आहे? स्वतः नीट व स्वच्छतेचे नियम पाळून ‘शी’, ‘सु’ करायला शिकणे हे मुलाला आयुष्यात पहिली अशी गोष्ट असते, जी त्याला स्वावलंबी झाल्याची भावना निर्माण करून आत्मविश्वास वाढवते व इतर गोष्टी स्वतः करण्यास प्रेरित करते. तसेच, ‘शी’, ‘सु’ करण्याचे प्रशिक्षण नीट झाले नाही किंवा हे करत असताना मुलाच्या मनात तणाव निर्माण झाल्यास पुढील आयुष्यात मानसिक समस्या निर्माण होता त.

सुरुवात कधी करावी?
टॉयलेट ट्रेनिंग शक्यतो मूल १८ महिने ते २४ महिन्या दरम्यान ‘शी’ करायला पॉटी सीटवर बसण्यास तयारी दाखवतात. मात्र, हे वय प्रत्येक मुलागणिक बदलू शकते आणि मुलाच्या मानसिक व शारीरिक तयारीप्रमाणे आईने वेळ ठरवावी. 
१८ महिन्यापासून पुढे मात्र या विषयी मुलाशी चर्चा करायला, त्याला याविषयी सांगायला सुरुवात करावी. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मूल प्रशिक्षणासाठी तयार आहे, हे कसे ओळखावे?

  • मूल तुमची नक्कल करू लागते. 
  • खेळणी जागच्या जागी ठेवू लागते. 
  • तुमच्यामागे बाथरूममध्ये येऊ लागते. 
  • स्वावलंबनाच्या खुणा दिसतात; नाही म्हणू लागते. 
  • स्वतः कपडे काढू लागते. 
  • ‘शी’, ‘सु’ आल्याचे सांगू लागते. 

कसे करावे?

  • यासाठी शक्यतो बाजारात मिळणाऱ्या पॉटी चेअरचा वापर करावा. कारण भारतीय शौचालयाचे भांडे मोठे असते व त्यावर मुलांना बसणे शक्य नसते व उभे राहण्यास भीती वाटते. 
  • प्रशिक्षणाचे मुख्य टप्पे असतात – ‘शी’ आल्याचे सांगणे, कपडे काढणे, ‘शी’साठी पॉटी चेअरवर बसणे/उभे राहणे, हात धुणे, कपडे परत घालणे. 
  • पॉटी चेअरचा वापर सुरू करण्याअगोदर ती मुलाला दाखवा, त्याची खरेदी करताना मुलाला सोबत घेऊन जा, त्याला त्यावर बसून खेळून बघू द्या. 
  • ही तुझी खुर्ची’, ‘ ही तुझ्या ‘शी’साठी आहे, असे ‘तुझे’ हा शब्द वापरून पॉटी चेअरची ओळख करून द्या. 
  • हे करताना ही प्रक्रिया सुरू ठेवणे गरजेचे हे मुख्य ध्येय असले पाहिजे, ती पूर्ण यशस्वी करणे नाही. 
  • सुरुवातीला ‘शी’ आलेली नसताना व जेवण झाल्यावर, दूध पिल्यावर मुलाला पूर्ण कपडे घालून फक्त पॉटी चेअरवर बसायला सांगणे. हे बसणे भारतीय पद्धतीने पाय गुडघ्यात दुमडून किंवा पाश्चिमात्य पद्धतीने खुर्चीवर बसल्यासारखे, कसे ही असू शकते. 
  • यासाठी रोज एक वेळ निवडावी व त्या वेळेला बसावे. 
  • बसलेले असताना मुलाशी गप्पा माराव्या. 
  • याची एकदा सवय लागली की ‘शी’ आल्यावर याच्यावर बसायचे का, असे मूल स्वतःच विचारेल. विचारले नाही की दरवेळी ‘शी’ आल्यावर तुझ्या खुर्चीत बसू या का ‘शी’ला, असे आपणहून विचारावे. 
  • बसले म्हणजे पॉटी चेअरमध्येच ‘शी’ करावी असा काही नियम घालून देऊ नये, मुलाचा त्या वेळचा मूड पाहून निर्णय घ्यावा. 
  • डायपरमध्ये ‘शी’ होते तेव्हा ती फेकताना पॉटी चेअरमध्ये टाकावी व हे मुलाला वारंवार दाखवावे 

काही टिप्स

  • टॉयलेट ट्रेनिंग पॉटी चेअर बाथरूममध्येच ठेवली पाहिजे, असा काही नियम नाही, ती मुलाला आवडत्या ठिकाणी ठेवून वापरू द्यावी. 
  • टॉयलेट ट्रेनिंग सुरू असताना शक्यतो ‘शी’ आई किंवा घरातील व्यक्तीनेच धुवावी, मुलाला स्वतःची शी धुण्याचा आग्रह व याची घाई करू नये. यात वडिलांनीही सामील व्हावे. 
  • टॉयलेट ट्रेनिंग दरम्यान बाळाला ‘शी’ कडक होते का, याकडे लक्ष द्यावे. ज्या मुलांना कडक ‘शी’ म्हणजे बद्धकोष्ठता होते, त्यांना टॉयलेट ट्रेनिंग दरम्यान त्रास होतो. म्हणून ही समस्या असल्यास उपचार करावेत.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.

तोतरेपणा किंवा बोलण्यातील समस्या

तोतरेपणा किंवा बोलण्यातील समस्या

तोतरेपणा किंवा बोलण्यातील समस्या अनेक मुलां-मुलीमध्ये तोतरेपणा किंवा बोलतानाच्या समस्या आढळून येतात. मात्र ही व्याधी गंभीर नसल्याने त्याच्या उपचारासाठी फारसे प्रयत्न होत नाहीत. परंतु, ही समस्या बरेच दिवस रेंगाळल्यास त्याचा मानसिकतेवर परिणाम होऊन न्यूनगंड निर्माण होतो. म्हणूनच अशी समस्या असलेल्यांना उपचार व मानसिक आधाराची गरज असते. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

तोतरेपणा व बोलण्याच्या समस्या म्हणजे नेमके काय?
ज्या मुलांमुलीना वाक्य सुरू करण्यास उशीर लागतो, बोलताना उच्चार स्पष्ट करता येत नाहीत, वाक्य सुरू केल्यावर मध्येच अडखळते, एखादा शब्दच उच्चारता येत नाही किंवा एखादा शब्द गरज व इच्छा नसताना पुनःपुन्हा उच्चारला जातो, असे असल्यास बोलण्याची समस्या असल्याचे निदान केले जाते.

कारणे –

  • तोतरेपणा व बोलण्याच्या समस्या आनुवंशिक असू शकतात. 
  • या मागे काहीतरी ताणतणाव असल्याचेही इतिहास नटी तपासल्यास दिसून येते. 
  • काही मुलांना शाळेत परीक्षेच्या काळात किंवा ताणतणाव वाढल्यानंतरच ही समस्या जाणवते. 
  • काही वेळा फक्त मनातील न्यूनगंड किंवा स्वतःला कमी लेखल्यामुळे ही समस्या दिसून येते. यावेळी चांगल्या समुपदेशनाने मुले बरी होतात.
  • नीट तपासणी केल्यावर जीभ खाली जास्त प्रमाणात चिकटली असल्याने ही बोलण्यात तोतरेपणा दिसून येतो. 
  • क्वचितच डोक्याला मार, मेंदूतील गाठ किंवा एखाद्या औषधाचा दुष्परिणाम म्हणून तोतरेपणा दिसून येतो.

तपासण्या व निदान 
डोक्याला मार लागल्याचा इतिहास असल्यास गरज भासल्यास तोतरेपणासाठी सीटी. स्कॅन किंवा एमआरआय या तपासण्या कराव्या लागतात. रेटिंग स्केलवर तोतरेपणाची तीव्रता ठरवली जाते.

उपचार –

  • स्पीच थेरपी हा तोतरेपणा किंवा बोलण्यातील समस्यांच्या उपचारांमधील महत्त्वाचा भाग असला तरी त्याला काही प्रमाणात औषधांची जोड द्यावी लागते.
  • स्पीच थेरपीमध्ये रुग्णांना ते चुकत असलेले शब्द हळू व श्वासावर नियंत्रण ठेवून कसे म्हणायचे हे शिकवले जाते. 
  • याच्या बरोबरीने fluency shaping थेरपीसारख्या पद्धती वापरल्या जातात. 
  • बेन्झोडायझेपिन्स (Benzodiazepines), स्ट्रामोनिअम (stramonium) सारखी औषधे फायदेशीर ठरतात. 
  • याच्या बरोबरीने श्‍वास घेण्याची पद्धत खूप फायदेशीर ठरते.

श्‍वासाचा व्यायाम 
१ ते १० पर्यंत आकडेमोड करत नाकाने हळू श्‍वास आत घ्यावा, डायफ्राम जितका खाली जाईल, तितका जाऊ द्यावा. त्यानंतर १ ते १० पर्यंत मोजत तोंडाने श्‍वास बाहेर सोडवा. असे सलग दहावेळा करावे.

घरगुती उपचार  

  • तोतरेपणा किंवा बोलण्यातील समस्या ओठांच्या भोवती मध लावून जिभेच्या टोकाने ते चाटण्याचा प्रयत्न करावा. 
  • चमचाच्या मागे मध लावून ते तोंडासमोर ठेवून जिभेने त्याचा स्पर्श करावा. मुलगा ते स्पर्श करायचा प्रयत्न करताना तो चमचा दुसऱ्या व्यक्तीने मागे घ्यावा.
  • जीभ दुमडून ती मागे घेऊन टाळूला लावावी व ती थोडी खाली घेऊन ताणलेल्या स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करावा.
  • आवळा चूर्ण, वेखंड व मधाचे चाटण रोज द्यावे.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.

मुलांची अंथरुणात लघवी आणि उपचार

मुलांची अंथरुणात लघवी आणि उपचार

मुलांची अंथरुणात लघवी आणि उपचार ही समस्या चुकीच्या पालकत्वामुळे नाही, तर चुकीच्या शू-शी करण्याच्या प्रशिक्षणामुळे (टॉयलेट ट्रेनिंग) होत नाही किंवा यात मुलाचीही काही चूक नाही, या विषयी समुपदेशन गरजेचे असते.

या उपचारांत पालक , मूल आणि घरातील इतर सदस्यांचे समुपदेशन महत्त्वाचे ठरते. 

ही समस्या चुकीच्या पालकत्वामुळे नाही, तर चुकीच्या शू-शी करण्याच्या प्रशिक्षणामुळे (टॉयलेट ट्रेनिंग) होत नाही किंवा यात मुलाचीही काही चूक नाही, या विषयी समुपदेशन गरजेचे असते. मुलाला असे होतच असते आणि याचे उपचार आपण मिळून करू, हे पालकांना समजावून सांगावे लागते. घरात आजी, आजोबा व इतरांनी या विषयी जाहीर चर्चा किंवा मुलाशी चर्चा करू नये. तसेच या सवयीविषयी मुलाला कधीही रागावू व मारू नये. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  1. संध्याकाळी सहानंतर चहा आणि कॉफी देऊ नये, तसेच संध्याकाळी सहानंतर पाणी पिण्याचे प्रमाण कमी करावे. सहानंतर २५० ते ३०० मिली पाणी पिणे योग्य आहे. रात्री झोपताना पाणी देणे टाळा. दिवसातील ८० % पाणी दुपारी चार वाजेपर्यंत प्यावे व ४ ते ६ वेळांत १९ % व ६ नंतर १ % पाणी पिण्याचे प्रमाण ठेवावे. दिवसा सहा वाजेपर्यंत किमान ६ वेळा लघवीला जावे. 
  2. दिवसा लघवी आल्यावर काही काळ रोखून धरता येते का, याचीही सवय लावावी. जमेल तशी लघवी थोडा वेळ ४ ते ५ मिनिटांपर्यंत रोखून धरल्यास मूत्राशयाची क्षमता वाढण्यास मदत होते. हे बळजबरीने नाही, तर आनंदाने व मुलाच्या स्वयंस्फूर्तीने करून घ्यावे. 
  3. मूल झोपण्याआधी त्याला लघवी करायला आपण सांगतोच, पण अंथरून ओले करणाऱ्या मुलांना झोपण्याआधी लघवी करून आल्यावर परत एकदा लघवी करायला सांगावे. या दोन वेळा लघवी करण्याला ‘डबल वायडिंग’ असे म्हणतात. म्हणजे, सलग दोन वेळा लघवीला जाणे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, कधी कधी सुरवातीला जेवढी लघवी केली होती तेवढीच लघवी तो पुन्हा करतो. याचे कारण असते मुलाच्या मुत्राशयामध्ये रेसिड्यूल युरीन, म्हणजे साठलेली लघवी. दुसऱ्यांदा लघवी केल्यानंतरही ही लघवी बाहेर पडल्याने अंथरूण ओले करण्याचे प्रमाण कमी होते. 
  4. झोपण्याआधी सकारात्मक संकल्प करायला सांगणे. संकल्प हा वतर्मानकाळात असावा. मी आज अंथरून कोरडे ठेवेले आहे, असा सकारात्मक संकल्प करायला सांगणे. आज मी अंथरून ओले करणार नाही, हा नकारात्मक संकल्प ठरतो. 
  5. सहसा मुले लवकर झोपतात आणि आई-वडील त्यांच्यानंतर २ ते ४ तासांने झोपतात. आई-वडीलांनी झोपण्याआधी मुलाला झोपेतून उठवून लघवी करायला उभे करायचे. 
  6. मुलांची अंथरुणात लघवी आणि उपचार स्टार टेक्निक ही एक पद्धत संशोधनामध्ये सिद्ध झाली आहे. एक वेगळे कॅलेंडर घ्यायचे व ज्या दिवशी मुलाने अंथरून ओल केलेले नाही, त्या तारखेला एक स्टार मारायचा. महिन्याच्या शेवटी जितके दिवस मुलाने अंथरून ओल केले नाही, तितके स्टार मोजायचे आणि त्या हिशोबाने त्याला काहीतरी बक्षीस ठरून द्यायचे. तुला या महिन्यामध्ये १० स्टार मिळल्यास तुला तुझ्या आवडीची गोष्ट देऊ किंवा तुला एखाद्या पर्यटनस्थळाला घेऊन जाऊ अशा साध्या गोष्टी बक्षिस म्हणून द्याव्यात. बक्षीस देताना चॉकलेट, व्हिडिओ गेम्स अशा घातक गोष्टी देऊ नका. 
  7. सगळ्यांत महत्त्वाचे, मुलाला याबद्दल रागवू नका व या समस्येबद्दल त्याच्याशी जास्त चर्चा करू नका. तसेच, तुम्ही त्याचे कपडे बदलता, बेडशिट बदलता तेव्हा न रागावता त्याला या कृतींमध्ये सामावून घ्या. त्याची याच्यासाठी मदत घ्या. 
    वरील उपचार ६ महिने सतत केल्यास ही मुले पूर्ण बरी होतात . 

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.

अंथरुणात लघवी करण्याची सवय घालवा

अंथरुणात लघवी करण्याची सवय घालवा

अंथरुणात लघवी करण्याची सवय घालवा मुल अंथरुणात लघवी करत आहे का, हे समजण्यासाठी ३ ते 4 वर्षांदरम्यान रात्री झोपताना डायपर घालण बंद करावे व या सवयीचा अंदाज घ्यावा. भारतात ५ वर्षांपुढील ७.५ ते १६.५ टक्के मुलांना ही सवय आहे. कुमारवयीन मुलांमध्ये हे प्रमाण ३ टक्के आहे, मात्र हे प्रमाण फक्त रुग्णालयात आलेल्यांचे आहे. उपचार न घेणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. मुलांमध्ये हे प्रमाण मुलींपेक्षा जास्त आहे. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

दखल कधी घ्यावी?
मुल सहसा ५ वर्षांपर्यंत अंथरूण ओले करते. यानंतर सलग तीन महिने, महिन्यातून एकदा अंथरूण ओले करत असल्यास त्याची दखल घेऊन उपचार करण्याइतपत ही समस्या आहे, असे समजावे. याला पाचवर्षांपर्यंत उपचारांची गरज नसते. तरीही ५ वर्षांच्या आधीही सवय असल्यास तिसऱ्या वर्षापासून जमेल तसे औषध न देता लघवी करण्याच्या सवयीची शुचिता – संहिता मुलाला समजून सांगण्यास सुरुवात करायला हवी व ही सवय ५ वर्षापर्यंत जाईल यासाठी प्रयत्नशील राहायला हवे.

सवयीचे परिणाम
या सवयीचे मानसिक परिणाम पालक व पाल्य दोघांवर होतात. पालकांची रात्री झोपमोड होऊन चीडचीड व दुसऱ्या दिवशी कामावर परिणाम होतोच. या शिवाय मुलांमध्ये लाज वाटणे, अपराधीपणाची भावना निर्माण होणे, भीती आणि नैराश्य व हतबद्धतेची भावना निर्माण होते. यामुळे त्यांच्या अभ्यासावर व इतर क्षमतांवर परिणाम होतो.संशोधन सांगते, आपल्या पूर्ण आयुष्यात मनाला त्रासदायक गोष्टींपैकी घटस्फोट, आई-वडिलांची तीव्र भांडणे यांनतर अंथरुणात लघवी करणे मोठे कारण असते.

अंथरुणात लघवी करणाऱ्या मुलांचे प्रकार 
यात दोन प्रकारे वर्गीकरण करता येते 

  • जे फक्त रात्रीच अंथरूण ओले करतात.
  • जे रात्री व दिवसाही झोपल्यास अंथरूण ओले करतात.

दुसऱ्या प्रकारात वर्गीकरण करताना 

  • फक्त अंथरूण ओले करण्याची सवय असलेले.
  • या सोबत लघवी मार्गाच्या संसर्गाची लक्षणे व लघवी लागल्यास स्वच्छतागृहात जाईपर्यंत थांबता न येणे, वारंवार लघवी होणे अशी लक्षणे असतात.
  • लहानपणापासून नेहमीच अंथरूण ओले करत होते. – प्रायमरी 
  • आधी ६ महिने अंथरूण ओले करत नव्हते, पण नंतर करू लागले. – सेकंडरी

उपचारापूर्वी
अंथरुणात लघवी करण्याची सवय घालवा एक ते तीन महिन्याची लघवीची डायरी आधी मेंटेन करावी. यात झोपण्याची आणि उठण्याची वेळ , किती दिवस दिवसा व रात्री अंथरुणात लघवी केली, दिवसभर किती पाणी प्यायले, रात्री झोपण्याअगोदर किती पाणी प्यायले, सकाळी उठल्यावर किती लघवी होते, बाळ डायपर घालत असल्यास सकाळी ओल्या डायपरचे व डायपर घालताना कोरड्या डायपरचे वजन याची नोंद ठेवावी. यावरूनच उपचाराची दिशा ठरते.

  • कारणे
  • वाढ व विकासातील अडथळे व समस्या.
  • जनुकीय कारणे – पालक लहानपणी अंथरुणात लघवी करत असतील, तर त्यांच्या मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त असते.
  • मानसिक तणाव – आत्मसन्मान कमी असणे ( सेल्फ इस्टीम ), नैराश्य 
  • जन्मतः मूत्राशयाची लघवी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असणे.
  • लघवी होऊ नये म्हणून शरीरात स्रवणारा संप्रेरक अँटी डाययुरॅटीक हार्मोनची कमतरता.
  • झोपेच्या समस्या  
  • अतिचंचलता
  • बद्धकोष्टता
  • टॉन्सील व अॅडीनॉईड मुळे झोपताना श्वास अडखळणे
  • जंत असणे

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.

कोरोना बाधित रुग्णाचे आहार

कोरोना बाधित रुग्णाचे आहार

कोरोना बाधित रुग्णाचे आहार कोरोना संसर्ग झाल्यावर प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी संसर्ग काळात ही आहार चांगला ठेवणे गरजेचे असते. या विषयी फिजिशियन व आहार तज्ञ डॉ. चंद्रकांत कणसे यांनी एक आहार तक्ता सुचवला आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • या तक्त्यातील मुलभूत  नियम –
    शरीराला रोज १ ग्राम प्रतिकिलो वजना प्रमाणे प्रथिने रोज आहारात असणे गरजेचे आहे. साधारण ६० किलो हे सरासरी आहार पकडून ६० ग्राम प्रतिन रोज मिळायला हवे. वजन जास्त असल्यास त्यापेक्षा जास्त. साधारण एका अंड्यात ६ ग्राम, १०० ग्राम पनीर / मांसाहारी अन्नात २२ ग्राम प्रोटीन मिळते. याप्रमाणे विविध अन्नाचे प्रथिनांचे प्रमाण तपासून दिवसात ६० ग्राम तरी प्रथिने शरीरात जातंय का हे तपासून पहावे.
  • सर्व पालेभाज्या , फळभाज्या , धान्ये / कड धान्ये चालतील.
  • सर्व प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ  , गोड , साखर, गुळ, मध, मैदा,तळलेले, साबुदाणा , भात , बिस्किटे , पोहे , बेकरीचे पदार्थ टाळावा.
  • गव्हाची चपाती टाळावी व ज्वारी / मका / नाचणीची भाकरी खावी.
  • दिवसभरचा आहार
  • सकाळी बिना साखरेचा / कमी साखरेचा चहा / कॉफी
  • नाष्ट्या साठी – आदल्या दिवशी रात्री पाण्यात भिजवलेले ४- ५ बदाम ( पचतील तसे ) / अक्रोड / शेंगदाणे / खोबरे + अंडा / पनीर भुर्जी
  • दुपारी जेवण
    भाकरी – ज्वारी / नाचणी / मका + भाजी + फळे + दही / पातळ ताक
  • संध्याकाळी – चहा / कॉफी
  • रात्री – उसळ + भाकरी / थालीपीठ / पनीर पराठा + भाजी ? मांसाहार + कोशिंबीर
  • झोपताना भूक असल्यास – १ कप दुध

पाणी – कोरोना बाधित रुग्णाचे आहार तहान लागेल तसे पाणी प्यावे , पाणी खूप कमी किंवा खूप जास्त ही पिऊ नये आपल्याला दर दोन तासाने लघवी होईल व लघवीचा रंग पिवळा नसून पांढरा राहायला हवे या प्रमाणे पाणी पिणे स्वतःच कमी जास्त करावे. पिवळी लघवी होत असल्यास पाणी वाढवावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

एन ९५, व्हॉल्वचा मास्कबाबत गोंधळ नको

एन ९५, व्हॉल्वचा मास्कबाबत गोंधळ नको

 एन ९५, व्हॉल्वचा मास्कबाबत गोंधळ नको नुकतच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्हॉल्व असलेला एन ९५ मास्क व इतर व्हॉल्व असलेल्या मास्क वर बंदी घातली व वापरू नये असे निर्देश दिले आहेत. पण या बद्दल वार्तांकन करताना व याचा अर्थ लावताना अनेकांनी एन ९५ मास्क वर बंदी किंवा एन ९५ मास्क निरुपयोगी असा लावला. पण बंदी व वापर बंद करायला हवा तो व्हॉल्व असलेल्या कुठल्या ही मास्कचा एन ९५ मास्कचा नव्हे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

एन ९५ व मास्कचे प्रकार व कुठला योग्य –

  • एन ९५, व्हॉल्वचा मास्कबाबत गोंधळ नको एन ९५ चा अर्थ आहे ९५ % श्वास कण फिल्टर करणारा मास्क. यात व्हॉल्व असलेला आणि नसलेला असे दोन मुख्य प्रकार असतात. पण व्हॉल्व असलेल्या मास्क मधून श्वास कण बाहेर पडू शकतात म्हणून व्हॉल्व नसलेला मास्क वापरायला हवा. या व्यक्तिरिक्त आकार आणि कुठल्या देशातील मास्क आहे यावरून ही एन ९५ मास्कचे काही प्रकार समजून घ्यायला हवे.
  • भारतीय बनावटीचा – मास्क वर तुम्ही नीट निरीक्षण केल्यास त्यावर छोट्या अक्षरात NIOSH असे लिहिलेले असते. अर्थात हा नॅशनल इंन्स्टीट्युट ऑफ ऑक्यूपेशनल हेल्थ अँड सेफ्टी ने प्रमाणित केलाला भारतीय बनावतीचा मास्क. व्हॉल्व नसलेला व NIOSH N95 असा लिहिलेला मास्क वापरण्यास योग्य N95 मास्क समजावा.
  • चीनी बनावटीचा – ज्या मास्क वर K N95 लिहिलेला आहे तो चीनी बनावतीचा आहे व तो चीनी व्यक्तींना समोर ठेवून बनवला गेला असल्याने भारतीयांनी वापरण्यास योग्य नाही. तसेच त्याचा दर्जा ही भारतीय मास्क एवढा चांगला नाही.
  • कोरियन मास्क – कोरिया ने कॉपरचा मास्क बनवला आहे जो धुता येण्या सारखा व धुवून रोज वापरता येईल असा एकमेव N95 मास्क आहे. पण हा मास्क फार महाग आहे ( किंमत – ५०० रुपये प्रती मास्क ) . तसेच हा मास्क अजून मुबलक प्रमाणत उपलब्ध नाही. या मास्कचा एकच दोष आहे कि त्याला नाकावर फीट होतो तिथे क्लिप दिली नसल्याने तो नाकावरून खाली सटकतो. ही सुधारणा केल्यास व परवडत असल्यास क्लिप असलेला कोरियन मास्क बाजारात आल्यावर वापरण्यास हरकत नाही.

आकारावरून एन ९५ मास्कचे प्रकार –

  • पहिल्या प्रकारात कानात अडकवण्याचा एन ९५ मास्क आहे पण हा सतत कानावर अडकवल्याने कानाच्या मागे अडकवण्याचे इलॅस्टिक काचते.
    दुसरा आकार आह ज्याला डक ( बदका सारखा ) मास्क असे नाव पडले आहे . हा मास्क लावताना काना मागे लावावा लागत नाही व इलॅस्टिक मागे डोक्याला अडकते म्हणून ते काचत नाही व जास्त वेळ ठेवण्यास त्रास होत नाही. म्हणून हा एन ९५ मास्क वापरण्यास जास्त योग्य आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

लसीचे काय ?

लसीचे काय ? ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीचे सकारात्मक अहवाल हाती आल्याने लसी विषयी सर्वांच्याच आशा उंचावल्या आहेत पण या यशाचे संशोधनात्मक दृष्टीने विश्लेषण करायला हवे.
आदर्श लस म्हणजे काय ?
ज्या लसीचे कमीत कमी डोस घ्यावे लागतात, शेवटच्या डोस सहा महिने तरी प्रतिकारशक्ती टिकून राहते आणि कमीत कमी दुष्परिणाम होतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

लस चाचणीच्या चार फेज कुठल्या असतात ?
फेज १ – २० – ८० मानवांवर चाचण्या
फेज २ – काही शे म्हणजे १००० पर्यंत लोकांपर्यंत मानवांवर चाचणी
फेज ३ –  काही हजार लोकांवर चाचण्या
फेज ४ – लस बाजारात आल्यावर येणारे रिपोर्ट

ऑक्सफर्ड लसीचे यश किती ?
सध्या लँन्सेट मध्ये प्रकाशित झालेला ऑक्सफर्ड लसीचा  अहवाल हा फेज १ व २ चे आहेत व यात दोन डोस नंतर ५६ दिवसांना प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते असे दिसून आले आहे. यात प्रतिपिंड – अँटीबॉडी सहित टी सेल ही दीर्घ काळ टिकणारी प्रतिकारशक्ती आढळून येणे सकारत्मक आहे. पण ही प्रतिकारशक्ती किती काळ टिकून राहते याचे अंतिम निष्कर्ष हाती येण्यास किमान ६ महिने तरी वाट पहावी लागणार आहे

भारतासाठी या लसीचे महत्व काय ?
लसीचे काय ? कुठल्या ही परदेशी लसीच्या यशाने हुरळून जाण्या आधी  भारतीयांनी जरा धीराने घ्यावे. कारण भारतातील कोरोनाची स्ट्रेन आणि परदेशांत लसी साठीच्या कोरोनाच्या स्ट्रेन वेगळ्या असू शकतात. हीच गोष्ट फ्लू लसीच्या बाबतीत ही घडते. तसेच आपली भारतीयांची प्रतिकारशक्ती परदेशी लसीच्या चाचण्यात परदेशी व्यक्तींवर केलेल्या प्रयोगात जसा प्रतिसाद मिळतो तसाच प्रतिसाद मिळेल हे निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणून कुठल्या ही परदेशी लसीचे भारतीयांवर प्रयोग यशस्वी झाल्या शिवाय या परदेशी लसीवर पूर्ण विश्वास ठेवता येणार नाही

भारतीय लसीचे काय ?
भारतात सध्या ७ कंपन्या लसीवर काम करत आहेत. ऑगस्टच्या पहिल्या महिन्यात फेज १ मानवी चाचण्या सुरु होणार आहेत.

लस आली तरी पुढे काय ?
लस आली व सर्वांनी ती घेतली तरी काही काळ तरी सोशल डीस्टन्सिंग , मास्क व हात धुण्याचे महत्व अबाधित राहणार आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

प्लाझ्मा दान कोण करू शकत ?

प्लाझ्मा दान कोण करू शकत ?

प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमके काय ? कोरोना मधून बरे झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्मा  या रक्तातील भागात कोरोना विरोधात प्रतिकारशक्ती दर्शवणारे अँटीबॉडीज – प्रतिपिंडे असतात. ही प्रतिपिंडे म्हणजे कोरोना विरोधात लढण्यास शरीराने रक्तात तयार केलेले सैनिकच असतात. कोरोना बाधित रुग्णाला कोरोना तून बरे झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून प्लाझ्मा  मधून हे आयते सैनिक देणे म्हणजे प्लाझ्मा  थेरपी.

सध्या प्लाझ्मा  देण्याचे नियम काय ?

  • एखाद्याने रुग्णाच्या प्रेमा पोटी इच्छा व्यक्त केल्यास ( कंपॅशनेट बेसिस )
  • संशोधन प्रकल्पाचा भाग म्हणून
  • शासकीय रुग्णालयात

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

हा प्लाझ्मा  वेगळा कसा केला जातो ?
या प्रक्रियेला अफेरेसीस असे म्हणतात. या प्रक्रियेत अफेरेसीस करण्याचे मशीन उपलब्ध असलेल्या रक्त पेढीत रक्तातून – लाल पेशी , प्लेटलेट व प्लाझ्मा  वेगळा केला जातो.

प्लाझ्मा  दान कोण करू शकते –

  • प्लाझ्मा दान कोण करू शकत ? रुग्ण व दात्याचे एबीओ व आर एच रक्त गट सारखाच असावा.
  • रुग्ण पूर्ण बरा होऊन पहिले सारखे दिसले तेव्हा असून २८ दिवस झालेले असावे.
  • रक्तातील आय जी जी म्हणजे दीर्घकाळ टिकून राहणारी प्रतिकारशक्ती दर्शवणारे  अँटीबॉडीज – प्रतिपिंडांचे प्रमाण १: १६० असायला हवे.
  • कोरोना झाला होता याचे निदान आर टी पीसीआर या तपासणी ने निचित झालेले असावे.
  • दात्याच्या  एचआयव्ही, कावीळ बी, कावीळ सी व वीडीआर एल म्हणजेच सिफिलीस या टेस्ट निगेटिव्ह असाव्या.
  • शक्यतो पुरुष व अजून गरोदर न झालेल्या व सध्या गरोदर नसलेल्या स्त्रियांनीच प्लाझ्मा  दान करावे. कारण नंतर शरीरात काही प्रतिपिंडे निर्माण होऊ शकतात जी त्रास दायक ठरू शकतात.
  • दात्याला दान करताना ताप नसावा.
  • श्वास घेण्यास त्रास नसावा व ऑक्सिजनची पातळी नॉर्मल असावी.
  • आर टी पीसीआर निगेटिव्ह असल्याचे बघून रुग्ण पूर्ण बरा झाला आहे याची खातरजमाकरून घ्यावी.

एकदा प्लाझ्मा  दान केल्यावर परत किती दिवसांनी दुसर्यांदा करता येते –
एका वेळेला २०० ते ६०० एमएल प्लाझ्मा  दान करता येते. एकदा दान केल्यावर २ महिन्यांनी दुसऱ्यांदा दान करता येते.

कोरोनातून बरे झालेले कुठे प्लाझ्मा  दान करू शकतात –
प्लाझ्मा दान कोण करू शकत ? दिल्लीच्या धर्तीवर अजून खास प्लाझ्मा  डोनेशन बँक महाराष्ट्रात सुरु झालेली नाही. तसेच याची निश्चित माहिती नाही. पण अशा इच्छुकांनी दान करण्यासाठी जिल्हावार जागा ठरवून त्याची यादी शासनाने जाहीर करावी. सध्या १७ वैद्यकीय महाविद्यालयात याचा प्रयोग सुरु आहे. पण कुठल्या भागात नेमके कुठे जाऊन दान करायचे याची माहिती अजून उपलब्ध नाही.

प्लाझ्मा  कोणाला गरजेचे आहे ?
प्लाझ्मा  लाक्षाणविरहित , सौम्य व मध्यम स्वरूपाच्या कोरोना रुग्णाला गरजेचा नाही. फक्त गंभीर रुग्णालाच प्लाझ्मा  गरजेचा आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.