स्क्रीन टाईम – लहान मुलांसाठीचे नवे कोकेन

कुठल्या हि घरात गेलो कि अगदी सहा महिन्यांपासून ते पाच वर्षा पर्यंतची मुले शांततेत मोबाईल स्क्रीनशी एकरूप झालेली आपल्याला दिसून येतात. घरातच नव्हे तर हॉटेल मध्ये आई – बाबा शांततेत जेवण करत आहेत आणी दुसर्या टेबल वर लहान भाऊ – बहीण फोनवर एखादे कार्टून बघत आहेत हि हे नेहमीच आपल्या नजरेला पडते . स्क्रीन टाईम म्हणजे दिवस भरात लहान मुले किती तास स्क्रीन समोर असतात हा आज प्रत्येक घरातील एक कळीचा मुद्दा झाला आहे. अशा गोष्टींचे दुस्प्रीनाम मुंगीच्या पावलाने , अगदी नकळत होत असले तरी काही वर्षात उत्क्रांतीत माणसाची शेपूट गायब झाल्या सारखे मानसिकतेत, मेंदूच्या रचनेत, कार्यात हमखास दिसून येतील. नव्हे यातील बरेच अप्रत्यक्ष दुष्परिणाम आता आम्हा बालरोगतज्ञांना दिसायला सुरुवात झाली आहे.

Read English Translation of this article on Screen Time

स्क्रीन टाईम
स्क्रीन टाईमचे धोके

स्क्रीन टाईम विषयी औरंगाबाद येथील बालरोगतज्ञ डॉ. अभय जैन यांनी एक आपल्या कडे येणार्या रुग्णांचा शास्त्रीय अभ्यास केला. त्यात प्रामुख्याने काही गोष्टी आढळून आल्या. अगदी सहा महिन्यापासूनच स्क्रीनची सवय मुलांना लावण्यास सुरुवात होते. सहा महिन्यानंतर बाळाला वरचे अन्न सुरु केले जाते. आईच्या दुधाकडून वरच्या अन्नाकडे वळताना प्रत्येक बाळ थोडे फार त्रास देतेच . पण त्यावर तोडगा म्हणून व बाळ नीट खात नाही म्हणून सगळ्यात आधी आई मोबाईलचा वापर करते. इथेच आई आणी बाळ दोघे हि स्क्रीनच्या जाळ्यात अडकतात . या अभ्यासात असे हि दिसून आले कि शिकलेले पालकांच्या मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. अर्थात स्मार्ट फोनच्या बाबतीत आता शहरी – ग्रामीण असा काही भेदभाव राहिलेला नाही व ग्रामीण भागात हि मोबाईल ला चीटकलेली मुले हे दर्शणीय दिसतेच. पण अशिक्षित पालकांमध्ये , गृहिणी असलेल्या ग्रामीण भागातील आईच्या मुलांमध्ये हे प्रमाणा पेक्षा जरा कमी आहे. तसेच स्क्रीन टाईमचे प्रमाण टी. व्ही. पेक्षा मोबाईल चा वाटा जास्त असल्याचे हि या अभ्यासात दिसून आले.

आमचा मुलगा रात्री लवकर झोपत नाही. रात्री १ , २ वाजले तरी तो खेळतच असतो. आमची मुलगी खूप जास्त चिडचिड करते , खूप हट्टीपणा करते. एका गोष्टी वर लक्ष केंद्रित करत नाही. अशा समस्या घेऊन जेव्हा पालक आम्हा बालरोगतज्ञांकडे येतात तेव्हा कुठले हि मोठे आजाराचे निदान करण्या आधी आम्ही त्यांना साधा प्रश्न विचारतो. तो किती वेळ टीव्ही किव्हा मोबाईल समोर असतो. या प्रश्नातच सगळ्या समस्यांचे निदान होते. ‘झोपेचे कर्ज’ हि संकल्पना आपल्या अजून नीट पचनीच पडलेली नाही. मोठ्या व्यक्तींमध्ये हे कामाच्या व्यापामुळे असते. तसे आता लहान मुले स्क्रीन टाईम मुळे ‘झोपेचे कर्ज’ घेऊनच कुमार वयात प्रवेश करत आहेत . त्यामुळे आरोग्याच्या व अनेक मानसिक समस्या निर्माण होत आहेत. याचाच समबंध पुढे कुमार वयीन मुला मुलींमधील नैराश्याच्या वाढत्या प्रमाणाशी आहे. या सर्व कडीला सांधणारा मोबाईल व स्क्रीन टाईम हा महत्वाचा दुवा आहे. 
स्क्रीन टाईमचा थेट संबंध हा लहान वयापासून सुरु होणार्या लठ्ठपणाशी व लहान वयातील खाण्या पिण्याच्या सवयीशी आहे. लहानपणी आई जेव्हा बाळाला भरवते तेव्हा त्याच्या मागे फिरत , गप्पा मारत , गाणे म्हणत भरवण्याची जुनी पारंपारिक पद्धत होती. त्याही आधीची पद्धत म्हणजे खाल्ले नाही तर आईचे धपाटे खात खाण्याची पद्धत तर कधीच इतिहासजमा झाली . आता कामात व्यस्त असलेली आई किव्हा स्वतःला हि मोबाईल पाहण्याची इच्छा असलेली आई बाळासमोर मोबाईल फोन धरला कि तो कार्टून बघत पटापट खाण संपवतो. खाण म्हणण्या पेक्षा तो फक्त ते गिळत असतो. त्यामुळे त्याच्या साठी खाण्याची चव , जेवणाचा रंग, भाजीचा सुवास हे बाळासाठी उत्तेजना नसते तर मोबाईल वरील रंग ,कार्टून मधील पत्र हेच बघत ते खात असते. त्यातच सगळ्या संवेदना मोबाईल स्क्रीन वर केंद्रित झाल्या मुळे पोट भरलेले कळत नाही व पोट भरले तरी मुल खातच राहते. त्याशिवाय स्क्रीन समोर जास्त वेळ बसून राहिल्याने बाहेर खेळ आणी अंगमेहनत होत नाही आणी मुले लठ्ठ होत जातात. वयापेक्षा मोठी आणी लठ्ठ दिसणारी अनेक मुले मॉल मध्ये फास्ट फूड चेन वर रांगा लावलेली तुम्हाला दिसतील पुढे नैसर्गिक अन्नाची चवच विकसित न झालेली हि स्क्रीन समोरची मुले फास्ट फूड वरच आपल्या उदरभरणाचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात.

जागतिक आरोग्य सघटनेने प्रथमच या वर्षी स्क्रीन टाईमचे धोके ओळखून त्यासाठीची मार्गदर्शक तत्वे जारी केली. त्या प्रमाणे २ वर्षा पर्यंत लहान मुलांमध्ये स्क्रीन टाईम शून्य असावा . २ वर्ष ते पाच वर्षा पर्यंत तो १ तासापेक्षा जास्त नसावा . तसेच २ वर्षा नंतरचा पूर्ण स्क्रीनटाईम हा घरातील मोठ्या व्यक्ती किव्हा पालकांसोबत असावा जेणे करून मुल काय बघत आहेत याची आपल्याला माहिती मिळेल. आमचा एक वर्षाच मुल स्वतः स्क्रीन लॉक उघडत , स्क्रीन स्वाईप करून स्वतः युट्युब लावत हे बर्याचदा पालक कौतुकाने इतरांना व कधी डॉक्टरांनाहि सांगतात. खरतर मुळीच कौतुक करायची नाही तर सवय लागत चालल्याची चाहूल आहे. तसेच मोबाईल वरून आम्ही त्याला ए, बी. सी,डी किव्हा इतर बालगीते शिकवतो असे भाबडे समर्थनही बर्याचदा पालक करतात . सतत व रोज मोबाईल स्क्रीन बघून हळूहळू त्याचे रुपांतर अॅडीक्षण म्हणजे सुटायला अवघड जाणर्या सवयीत होते. जितकी लवकर हि सवय लागते तितकी ती तोडायला अवघड. दारू, सिगरेट किव्हा कोकेन घेतल्यावर मेंदूत जे रासायनिक बदल होतात तेच हळूहळू मोबाईल स्क्रीन दिल्यावर लहान मुलांच्या मेंदूत होतात. म्हणून आपण मोबाईल स्क्रीन हातात देतोय म्हणजे लहान मुलाच्या हातात मद्याची बाटली देतोय आणी स्क्रीन टाईम म्हणजे कोकेनच आहे लक्षात घ्यायला हवे.

सदरील लेख लोकप्रभाच्या आरोग्यविशेष अंकात २८ जून २०१९ रोजी प्रकाशित झालेला आहे Lokprabha

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *